'पाकशी खेळताना काही बदलत नाही'

पीटीआय
गुरुवार, 25 मे 2017

मुंबई - पाकिस्तानविरुद्धची लढत असताना आमच्यासाठी काहीही फारसे बदलत नाही. त्यासाठी काही वेगळी तयारीही करीत नाही, असे सांगत भारतीय कर्णधार विराट कोहलीने भारत-पाक लढतीबाबत तयार होत असलेला झंझावात रोखण्याचा प्रयत्न केला; मात्र त्याचवेळी पाकिस्तानविरुद्ध सध्याच्या परिस्थितीत खेळणे योग्य आहे का, या प्रश्नावर तो चिडला.

मुंबई - पाकिस्तानविरुद्धची लढत असताना आमच्यासाठी काहीही फारसे बदलत नाही. त्यासाठी काही वेगळी तयारीही करीत नाही, असे सांगत भारतीय कर्णधार विराट कोहलीने भारत-पाक लढतीबाबत तयार होत असलेला झंझावात रोखण्याचा प्रयत्न केला; मात्र त्याचवेळी पाकिस्तानविरुद्ध सध्याच्या परिस्थितीत खेळणे योग्य आहे का, या प्रश्नावर तो चिडला.

चॅंपियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघ आज रवाना होईल. या स्पर्धेत ४ जूनला भारत-पाकिस्तान लढत आहे. दोन देशांतील तणाव वाढत असल्यामुळे या सामन्याची जास्तच चर्चा सुरू आहे. सध्याच्या परिस्थितीत पाकिस्तानविरुद्ध खेळणे योग्य आहे का, हा प्रश्न विचारल्यावर कोहली चिडला. तुम्हाला काय वाटते, तुम्ही येथे अपेक्षित उत्तर मनाशी धरूनच आला आहात, अशी सुरवात कोहलीने केली. आपला मान ठेवूनच सांगतो, जे काही सुरू आहे, त्याचा फारसा विचारही करू शकत नाही. फलंदाजी करीत असताना सहकाऱ्याबाबतही विचार करता येत नाही. आम्हा क्रिकेटपटूंसाठी आमचा आवडता खेळ खेळणे महत्त्वाचे असते. त्यात कधीही बदल होत नाही. भारत-पाक लढतीबाबत चाहत्यांत कायम औत्सुक्‍य असते. त्यावेळचे वातावरणही वेगळे असते; पण आम्हा क्रिकेटपटूंसाठी ती केवळ एक लढत असते. त्याबाबत खूपच हवा तयार होते; पण ते काही आमच्या हातात नाही. आम्ही अन्य लढतींसारखीच या लढतीसाठी तयारी करतो. स्टेडियममधील वातावरण वेगळे असते; पण आमच्यासाठी काहीही बदललेले नसते. ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळतो तसेच पाकविरुद्धची  लढत खेळतो.

गतविजेते असल्याचे विसरणार
भारताने चार वर्षांपूर्वी झालेली चॅंपियन्स स्पर्धा जिंकली आहे, याकडे लक्ष वेधल्यावर कोहली म्हणाला, आपण गतविजेते आहोत, हा विचार न करणे हेच आव्हान आहे. गतस्पर्धेच्यावेळी आम्ही खेळाचा पुरेपूर आनंद घ्यायचा ठरवले. विजेते झालो त्याचबरोबर आतापर्यंत हुकूमत गाजवणारा संघही घडला. माझा दृष्टिकोन स्पष्ट आहे. मैदानात खेळाचा पुरेपूर आनंद घ्या. यामुळेच तर आम्ही अव्वल आहोत. त्याचबरोबर कोणालाही दयामाया नाही, हेही आम्ही ठरवले आहे. आम्ही हाच दृष्टिकोन ठेवून खेळणार. त्यामुळे अपेक्षित निकालही साधता येतील.

धोनी, युवराज आधारस्तंभ
धोनी, युवराजचा कसा उपयोग करणार, या प्रश्नावर कोहली चटकन म्हणाला, मी त्यांचा काहीच उपयोग करून घेणार नाही. ते दोघेही अनुभवी आहेत. त्यांना त्यांचा खेळ करण्याचे स्वातंत्र्यच द्यायला हवे. ते संघातील सर्वांत अनुभवी आहेत. डावाची उभारणी कशी करायची, हे ते जाणतात. प्रतिकूल परिस्थितीतही जिंकून देऊ शकतात. ते यापूर्वीच्या मालिकेत मुक्तपणे खेळले. त्यामुळे संघातील वातावरण चांगले होते. संघाचे स्वरूपच बदलते. ते आमच्या संघाचे भक्कम आधारस्तंभ आहेत.

Web Title: There is no change in playing with pakistan