तिसऱ्याच दिवशी विजयाची औपचारिकता 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 7 October 2018

राजकोट : वेस्ट इंडीज संघाचा भारत दौरा निश्‍चित झाला, त्या वेळी भारत कसोटीत कसा विजय मिळवणार याचेच औत्सुक्‍य होते. वेस्ट इंडीजने तिसऱ्याच दिवशी भारताविरुद्धची विक्रमी हार पत्करली. भारताला विजयाची औपचारिकता पूर्ण करण्यासाठी ऑक्‍टोबर हीटमुळेच घाम गाळावा लागला. 

राजकोट : वेस्ट इंडीज संघाचा भारत दौरा निश्‍चित झाला, त्या वेळी भारत कसोटीत कसा विजय मिळवणार याचेच औत्सुक्‍य होते. वेस्ट इंडीजने तिसऱ्याच दिवशी भारताविरुद्धची विक्रमी हार पत्करली. भारताला विजयाची औपचारिकता पूर्ण करण्यासाठी ऑक्‍टोबर हीटमुळेच घाम गाळावा लागला. 

विंडीज दोन्ही डावांत मिळून 100 षटकेही खेळले नाहीत. तिसऱ्या दिवशी दोन सत्रांत त्यांचे 14 फलंदाज परतले. विंडीज फलंदाजांत पॅव्हेलियनमध्ये परतण्यात सुरू असलेली स्पर्धा पाहूनच भारतीयांनी जवळपास 40 अंश तापमान असूनही फॉलोऑन दिला होता. विंडीजच्या दिशाहीन आणि निष्प्रभ फलंदाजीमुळे तीन शतकांची नोंद भारतीय डावात झाली होती आणि आता कच खाल्लेल्या विंडीज फलंदाजीमुळे कुलदीप यादवला विक्रमी कामगिरी करता आली. 

किएरॉन पॉवेलचा पाऊण शतकी प्रतिहल्ला सोडल्यास विंडीज फलंदाजांसाठी पाव शतकही दुरापास्त झाले होते. अर्थात पॉवेललाही सुरवातीस नशिबाची साथ लाभली. सुरवातीस क्षेत्ररक्षकांच्या डोक्‍यावरून चेंडू भिरकावलेल्या पॉवेलच्या अनेक धावा बॅटला स्पर्श करून झाल्या होत्या; पण जम बसल्यावर त्याने चांगला हल्ला केला होता. रोस्टन चेस आणि किमो पॉल यांनी सकाळच्या सत्रात प्रतिकार केल्यावरही विंडीजचा पहिला डाव उपाहारापूर्वी 48 षटकांत संपवला होता. 

चेस आणि पॉलने दिवसभरात काय घडणार याचे संकेतच दिले होते. कसोटी वाचविण्यासाठी बचाव हे विंडीजच्या रक्तातच नाही. त्यांनी हल्लाच सुरू केला होता. कधी बॅटच्या मधून तर कधी बॅटला स्पर्श करून चेंडू भलतीकडेच जात होता. अखेर दिवसातील पहिल्या उसळत्या चेंडूवर विंडीजची जोडी फुटली. त्यानंतर अश्विनने विंडीजच्या मनातील फिरकीची धास्ती जास्तच वाढवली. त्याच्या कॅरम बॉलवर काय करावे हेच विंडीज फलंदाजांना समजत नव्हते. 16 बाईज देणारा आणि दोन झेल सोडलेल्या रिषभ पंतने अखेर झेल घेत विंडीजचा पहिला डाव संपवला. 

ऑस्ट्रेलिया दौरा लक्षात घेऊन भारतीयांनी दुसऱ्या डावात कुलदीपला जास्त संधी दिली. त्याने त्याचा पुरेपूर फायदाही घेतला. पॉवेलच या पडझडीत टिकत होता. अखेर शतकानजीक असताना तोही परतला; पण त्याने विंडीजची कसोटीतील सर्वांत मोठी हार या सामन्यात तरी होणार नाही, याची खबरदारी घेतली होती. हल्ला करूनच धावा होत नाहीत, त्यासाठी विकेट वाचवावी लागते याची जाणीव विंडीज फलंदाजांना नव्हती. त्यांचे 20पैकी केवळ सहा फलंदाजच बचावात्मक खेळताना बाद झाले होते. अन्य फलंदाजांनी दोन दिवसांचा ब्रेक निश्‍चित केला होता. 

धावफलक 
भारत 9 बाद 649 घोषित : विंडीज पहिला डाव 6 बाद 96 वरून पुढे 
रोस्टन चेस त्रि. गो. अश्‍विन 53, किमो पॉल झे. पुजारा गो. उमेश 47, देवेंद्र बिशू नाबाद 17, शेर्मन लुईस त्रि. गो. अश्‍विन 0, शॅनन गॅब्रिएल यष्टि. पंत गो. अश्‍विन 1, अवांतर 18, एकूण 48 षटकांत सर्वबाद 181 
गडी बाद क्रम : 7-147, 8-159, 9-159 
गोलंदाजी : महंमद शमी 9-2-22-2, उमेश यादव 11-3-20-1, आर. अश्‍विन 11-2-37-4, रवींद्र जडेजा 7-1-22-1, कुलदीप यादव 10-1-62-1 
विंडीज दुसरा डाव : 
क्रेग ब्रेथवेट झे. शॉ गो. अश्‍विन 10, किएरॉन पॉवेल झे. शॉ गो. कुलदीप 83 (93 चेंडू, 8 चौकार, 4 षटकार), शई होप पायचित गो. कुलदीप 17, शिमरन हेटमेयर झे. राहुल गो. कुलदीप 11, सुनील ऍम्ब्रीस यष्टि. पंत गो. कुलदीप 0, रोस्टन चेस झे. अश्‍विन गो. कुलदीप 20, शेन डावरिच नाबाद 16, किमो पॉल झे. उमेश गो. जडेजा 15, देवेंद्र बिशू झे. पंत गो. अश्‍विन 9, शेर्मन लुईस पायचित गो. जडेजा 4, शॅनन गॅब्रिएल झे. कुलदीप गो. जडेजा 4, अवांतर 7, एकूण 50.5 षटकांत सर्वबाद 196. 
गडी बाद क्रम - 1-32, 2-79, 3-97, 4-97, 5-138, 6-151, 7-172, 8-185, 9-192. 
गोलंदाजी : महंमद शमी 3-0-11-0, अश्‍विन 18-2-71-2, उमेश यादव 3-0-16-0, कुलदीप यादव 14-2-57-5, रवींद्र जडेजा 12.5-1-35-3. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Third day wins formality