रोहितच्या शतकाने भारताचा इंग्लंडमध्ये मालिका विजयाने श्रीगणेशा

Monday, 9 July 2018

जॅक बॉलला दोघा फलंदाजांनी मिळून तीन चौकार ठोकले आणि धावगती आवाक्यात आणली. संघाला दिमाखात विजयी करताना रोहितने १०० तर हार्दिक पंड्याने ३३  धावा केल्या. ५५चेंडूत शतक पूर्ण करणार्‍या रोहित शर्माला सर्वच्या सर्व प्रेक्षकांनी उभे राहून टाळ्या वाजवत मानवंदना दिली. तब्बल ८ चेंडू राखून भारतीय संघाने विजय हाती घेतला. 

ब्रिस्टल : ब्रिस्टलच्या मैदानावर तिसर्‍या निर्णायक टी२० सामन्यात रविवारच्या सुट्टीचा फायदा घेत खचाखच भरलेल्या प्रेक्षकांना सामना चालू झाल्यापासून चौकार षटकारांची बरसात अनुभवायला मिळाली. खेळपट्टी फलंदाजीला पोषक होती आणि मैदानही काहीसे छोटे होते ज्याचा पुरेपूर फायदा फलंदाजांनी घेतला. जेसन रॉयने अंगात वारे संचारल्याप्रमाणे तुफानी फटकेबाजी करून इंग्लंडला १९८चा धावफलक उभारून दिला. संघाला गरज असताना रोहित शर्माने नितांत सुंदर फलंदाजी केली. नाबाद खेळी करणार्‍या रोहित शर्माने ब्रिस्टलच्या सामन्याबरोबर टी२० मालिका भारतीय संघाला जिंकून दिली. अर्थातच रोहित शर्माला सामन्याचा मानकरी ठरवण्यात कोणाला कठीण गेले नाही.

मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा झाल्यास चांगली सुरुवात व्हावी लागते. शिखरने ती करून दिली पण नंतर लगेच बाद झाला. लोकेश राहुलचा ख्रीस जॉर्डनने अविश्वसनीय झेल पकडला. रोहित शर्माला आज झकास लय सापडली होती. पट्टीचा वादक तबल्यातून जसा आवाज काढतो तसा आवाज रोहितच्या बॅटमधून फटका मारल्यावर ऐकायला मिळत होता. रोहितने अर्धशतक कधी पूर्ण केले समजलेच नाही. एव्हाना फलंदाजीला आलेल्या विराट कोहलीचा जम बसू लागला होता. रोहितचे काही षटकार असे होते की विराट चक्रावून गेला. 

बरोबर १० षटके पूर्ण होताना भारताच्या धावांचे शतक फलकावर लागले. षटकामागे १०धावांची सरासरी राखायला विराट - रोहितला फारसे कठीण जात नव्हते. ८९ धावांची सुंदर भागीदारी करून विराट जॉर्डनला ४३ धावांवर बाद झाला. सुरेश रैना आणि धोनी अगोदर हार्दिक पंड्या मोक्याच्या क्षणी फलंदाजीला आला. ४ षटकात ४४ धावा अजून करायच्या बाकी होत्या. 

जॅक बॉलला दोघा फलंदाजांनी मिळून तीन चौकार ठोकले आणि धावगती आवाक्यात आणली. संघाला दिमाखात विजयी करताना रोहितने १०० तर हार्दिक पंड्याने ३३  धावा केल्या. ५५चेंडूत शतक पूर्ण करणार्‍या रोहित शर्माला सर्वच्या सर्व प्रेक्षकांनी उभे राहून टाळ्या वाजवत मानवंदना दिली. तब्बल ८ चेंडू राखून भारतीय संघाने विजय हाती घेतला. 

त्याअगोदर नाणेफेक जिंकून विराट कोहलीने गोलंदाजी करायचा निर्णय घेतला. अंतिम ११ जणांच्या यादीतून भुवनेश्वर कुमार आणि कुलदीप यादवला वगळले होते हा निर्णय धक्कादायक होता. जेसन रॉय आणि जोस बटलरने अशक्य हल्ला गोलंदाजांवर चढवला. पाचव्या षटकात संघाचे अर्धशतक फलकावर लागले. जेसन रॉयने हार्दिक पंड्याला पहिल्या षटकात ४-४-६-६-१-१ असे फटकावले ज्याला क्रिकेटच्या भाषेत स्थानिक फोन नंबर लिहून देणे म्हणले जाते. 

२३ चेंडूत अर्धशतक करणारे जेसन रॉय नावेचे वादळ ६७ धावा करून शमले. पहिल्या षटकात २२ धावा देणार्‍या हार्दिक पंड्याने दुसर्‍या टप्प्यात गोलंदाजीला आल्यावर एकाच षटकात कप्तान मॉर्गन आणि धोकादायक ठरू बघणार्‍या अलेक्स हेल्सला बाद केले. त्यानंतर पंड्या थांबला नाही त्याने बेन स्टोकस् आणि ब्रेअर्स्टोला बाद केले. सतत  फलंदाजांना बाद करण्यात यश आल्याने अखेर ९ बाद १९८वर धावा रोखता आले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Third T20 India vs England Bristol Rohit Sharma century India wins