कसोटीच्या तयारीला वेळ मिळेल - रहाणे

वृत्तसंस्था
Wednesday, 30 May 2018


अजिंक्‍य रहाणे म्हणतो... 

-इंग्लंडविरुद्ध इंग्लंडमध्ये खेळणे नेहमीच आव्हानात्मक 
-पाकिस्तानचा खेळ चांगला झाला. पण, आपल्या मालिकेसाठी अजून वेळ आहे 
-लहानपणापासून लाल चेंडूचेच आकर्षण राहिले आहे आणि आजही ते कायम 
-एकदिवसीय क्रिकेटपण खेळायचे आहे. सध्या तरी लक्ष्य कसोटी 
-पुढील वर्षी निश्‍चित एकदिवसीय क्रिकेट खेळेन 

कोलकता - भारतीय क्रिकेट संघाच्या आगामी इंग्लंड दौऱ्यात एकदिवसीय संघातून वगळलेल्या अजिंक्‍य रहाणेला त्याची खंत नाही. तो म्हणाला, ""वगळल्याचे वाईट नाही. उलट आता कसोटी सामन्याच्या तयारीला मला अधिक वेळ मिळेल. 

रहाणे अफगाणिस्तानविरुद्धच्या एकमात्र कसोटी सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. मात्र, त्याचा एकदिवसीय सामन्यांसाठी विचार करण्यात आलेला नाही. रहाणे म्हणाला, ""यामुळे तुम्हाला तयारीसाठी पूर्ण वेळ मिळतो हे विसरता कामा नये. दुसरे म्हणजे जेव्हा तुम्हाला केवळ कसोटी सामन्यासाठी निवडण्यात आले आहे, तर मग अन्य सामन्यांचा विचार कशाला करायचा. अफगाणिस्तान आणि इंग्लंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी मला पुरेशी विश्रांती मिळणार आहे.'' 

राहणेला एकदिवसीय सामन्यासाठी वगळण्यात आल्यानंतर निवड समितीच्या निर्णयावर अनेकांनी नाके मुरडली होती. मात्र, अजिंक्‍यने याविषयी एक चकार शब्द काढला नव्हता. आजही तो निवड समितीचा निर्णय मान्य करतो. तो म्हणाला, ""मला वगळण्याची खूप चर्चा झाली. प्रत्यक्षात या निर्णयाने मी प्रेरित झालो आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्यासाठी मी आतापासूनच तयारीला सुरवात करेन. माझे सारे लक्ष कसोटी क्रिकेटकडे असले, तरी मी एकदिवसीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करेन यावर माझा विश्‍वास आहे.'' 

इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यास अजून वेळ आहे. सध्या तरी माझे सारे लक्ष अफगाणिस्तानच्या सामन्याकडे आहे. तो म्हणाला, ""अफगाणिस्तानला निश्‍चित कमी लेखणार नाही. त्यांच्याकडे चांगले खेळाडू आहेत. आतापर्यंत त्यांना संधी मिळाली नव्हती. आता ती मिळणार आहे. त्यांचा फिरकी गोलंदाज रशीद खानला तर अवघ्या क्रिकेट विश्‍वाने डोक्‍यावर घेतले आहे. त्यामुळेच कुणालाही ग्राह्य धरायचे नसते. कसोटी दर्जा मिळाला ही अफगाणिस्तानसाठी मोठी बाब आहे. ते अननुभवी आहेत म्हणून त्यांच्याविरुद्ध गाफील राहून खेळणे आम्हाला पटत नाही. अन्य संघांविरुद्ध खेळतो तसेच या सामन्यातही आम्ही स्वतःला झोकून देऊ.'' 

अजिंक्‍य रहाणे म्हणतो... 

-इंग्लंडविरुद्ध इंग्लंडमध्ये खेळणे नेहमीच आव्हानात्मक 
-पाकिस्तानचा खेळ चांगला झाला. पण, आपल्या मालिकेसाठी अजून वेळ आहे 
-लहानपणापासून लाल चेंडूचेच आकर्षण राहिले आहे आणि आजही ते कायम 
-एकदिवसीय क्रिकेटपण खेळायचे आहे. सध्या तरी लक्ष्य कसोटी 
-पुढील वर्षी निश्‍चित एकदिवसीय क्रिकेट खेळेन 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Time for preparation of Test says Rahane