विदर्भाच्या 16 वर्षीय मुलांनी घडविला इतिहास 

नरेश शेळके
रविवार, 29 जानेवारी 2017

"विजेतेपदाने खुप हायसे वाटले. जणू काही मोठं ओझं उतरलं की काय असं वाटते आहे. क्रिकेटपटू म्हणून राष्ट्रीय विजेतेपदाचे स्वप्न पाहिले होते. ते पूर्ण होऊ शकले नाही. मात्र प्रशिक्षक म्हणून स्वप्नपुर्ती झाली. विजयात प्रत्येक खेळाडूनेच शंभर टक्‍के योगदान दिले. कोणत्याही क्षणी सामना हातून निसटणार नाही, याची काळजी घेत सर्वांनी जिद्‌दीने व एकजूटीने खेळ केला. विदर्भ क्रिकेटसाठी ही खरोखरच खुप मोठी उपलब्धी म्हणावी लागेल. या विजयामुळे प्रेरित होऊन इतरही गटात विदर्भ चांगली कामगिरी, अशी आशा करायला हरकत नाही.'' 
- रणजित पराडकर (प्रशिक्षक, विदर्भ संघ)

नागपूर - रविवार, 29 जानेवारी हा दिवस विदर्भ क्रिकेट संघटनेच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिल्या गेला आहे. विदर्भाच्या 16 वर्षांखालील मुलांनी विजय मर्चंट करंडक जिंकून नवा इतिहास घडविला. बीसीसीआयच्या राष्ट्रीय स्पर्धेचे विजेतेपद जिंकण्याची विदर्भाची ही पहिलीच वेळ होय. विजेत्या विदर्भाला करंडकाशिवाय रोख चार लाखांचा पुरस्कार देण्यात आला. 

इंदूर येथे रविवारी संपलेल्या अंतिम सामन्यात विदर्भाने उत्तर प्रदेशचा 171 धावांनी धुव्वा उडवून विजेतेपदाला गवसणी घातली. विदर्भाने निर्णायक विजयासाठी उत्तर प्रदेशला 332 धावांचे लक्ष्य दिले होते. लक्ष्याचा पाठलाग करताना उत्तर प्रदेशचा दुसरा डाव अवघ्या 160 धावांतच आटोपला. 

5 बाद 64 या धावसंख्येवरून सुरूवात करणाऱ्या उत्तर प्रदेशला विजयासाठी 268 तर, विदर्भाला पाच बळींची आवश्‍यकता होती. विदर्भाच्या गोलंदाजांनी अपेक्षेप्रमाणे उपहारापूर्वीच उत्तर प्रदेशचे उरलेले पाच गडी बाद करून ऐतिहासिक विजयावर शिक्‍कामोर्तब केले. मध्यमगती गोलंदाज प्रेरित अग्रवालने 59 धावांत सहा गडी बाद करून विजयात निर्णायक भूमिका वठविली. हर्ष दुबेने 38 धावांच्या मोबदल्यात तीन बळी टिपले. 

विदर्भाने हे विजेतेपद युवा प्रशिक्षक व माजी रणजी कर्णधार रणजित पराडकर यांच्यासाठी मार्गदर्शनाखाली मिळविले, हे उल्लेखनीय. क्रिकेटपटू म्हणून विदर्भ क्रिकेटची दहा वर्षे सेवा केल्यानंतर पराडकर यांनी गतवर्षी 16 वर्षांखालील संघाच्या प्रशिक्षकपदाची धुरा हाती घेतली होती. यापूर्वी विदर्भाच्या 19 वर्षांखालील संघाने प्लेट गटात विजेतेपद पटकाविले होते. मात्र, कोणत्याही वयोगटात बीसीसीआयतर्फे आयोजित स्पर्धेत राष्ट्रीय पातळीवर करंडक जिंकण्याची ही पहिलीच वेळ होय. 

संक्षिप्त धावफलक 
विदर्भ पहिला डाव : 310. उत्तर प्रदेश पहिला डाव : 176. विदर्भ दुसरा डाव : 197. उत्तर प्रदेश दुसरा डाव : 60.2 षट्‌कांत सर्वबाद 160 (विकास सिकरवार 47, आर्यन शर्मा 41, समीर रिझवी 31, प्रेरित अग्रवाल 6-59, हर्ष दुबे 3-38, मंदार महाले 1-20). 

"विजेतेपदाने खुप हायसे वाटले. जणू काही मोठं ओझं उतरलं की काय असं वाटते आहे. क्रिकेटपटू म्हणून राष्ट्रीय विजेतेपदाचे स्वप्न पाहिले होते. ते पूर्ण होऊ शकले नाही. मात्र प्रशिक्षक म्हणून स्वप्नपुर्ती झाली. विजयात प्रत्येक खेळाडूनेच शंभर टक्‍के योगदान दिले. कोणत्याही क्षणी सामना हातून निसटणार नाही, याची काळजी घेत सर्वांनी जिद्‌दीने व एकजूटीने खेळ केला. विदर्भ क्रिकेटसाठी ही खरोखरच खुप मोठी उपलब्धी म्हणावी लागेल. या विजयामुळे प्रेरित होऊन इतरही गटात विदर्भ चांगली कामगिरी, अशी आशा करायला हरकत नाही.'' 
- रणजित पराडकर (प्रशिक्षक, विदर्भ संघ)

"विदर्भ मुलांनी कामगिरी खरोखरच ऐतिहासिक, अद्वितीय आणि अविस्मरणीय आहे. त्यांनी व्हीसीएच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला. संघाच्या कामगिरीचा व्हीसीएलाच नव्हे, विदर्भातील तमाम क्रिकेटप्रेमींना अभिमान आहे. हे युवा क्रिकेटपटू भविष्यातील "स्टार' असून, व्हीसीए त्यांची विशेष काळजी घेणार आहे. नागपुरात परतल्यानंतर व्हीसीएतर्फे संघाचा पुरस्कार देऊन जंगी सत्कार करण्यात येईल.'' 
- ऍड. आनंद जैस्वाल (अध्यक्ष, विदर्भ क्रिकेट संघटना)

Web Title: U16 vidarbha cricket team wins vijay merchant trophy