ऑस्ट्रेलिया सर्वबाद 216; भारताला विजयाची संधी

वृत्तसंस्था
Saturday, 3 February 2018

भारताने आत्तापर्यंत महंमद कैफ (2002), विराट कोहली (2008) आणि उन्मुक्त चंद (2012) यांच्या नेतृत्वाखाली विजेतेपद मिळवले आहे. गतवर्षी उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.

माउंट मौंगनुई (न्यूझीलंड) : गोलंदाजांच्या चकमदार कामगिरीच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियाचा डाव अवघ्या 216 धावांत संपुष्टात आणला. एकोणीस वर्षांखालील विश्वकरंडक स्पर्धा चौथ्यांदा जिंकण्याची संधी भारतीय संघाला आहे.

ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या स्पर्धेत जबरदस्त कामगिरी करणाऱ्या ईशान पोरेलने या सामन्यातही आपल्या गोलंदाजीतील धार कायम ठेवताना ऑस्ट्रेलियाच्या सलामीवीरांना बाद केले. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार जेसन सांघा याला बाद करून नागरकोटीने ऑस्ट्रेलियाला तिसरा झटका दिला. मर्लो आणि उप्पल यांनी अर्धशतकी भागीदारी करत ऑस्ट्रेलियाचा डाव 150 धावांपर्यंत पोचविला. या स्पर्धेत भारताच्या फिरकीपटूंची कामगिरी उत्तम झालेली आहे. या सामन्यातही हीच कामगिरी आपल्याला पहायला मिळाली. अखेरच्या फळीतील फलंदाजांना ठरावित अंतराने बाद केल्याने ऑस्ट्रेलियाची मोठी धावसंख्या उभारण्याची इच्छा धुळीस मिळविली. मर्लोने अर्धशतक पूर्ण करत 76 धावांची खेळी केली. भारताकडून पोरेल, शिवासिंग, नागरकोटी आणि अभिषेक रॉय यांनी प्रत्येकी दोन बळी मिळविले. तर, शिवम मावीने एक बळी मिळविला.

विजयी अश्‍व चौफेर उधळून अपराजित राहत चौथ्यांदा विश्‍वविजेतेपदाला कवेत घेण्यासाठी पृश्‍वी शॉच्या नेतृत्वाखाली खेळणारा आणि राहुल द्रविड यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेला भारतीय संघ सज्ज आहे. भारताने आत्तापर्यंत महंमद कैफ (2002), विराट कोहली (2008) आणि उन्मुक्त चंद (2012) यांच्या नेतृत्वाखाली विजेतेपद मिळवले आहे. गतवर्षी उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: U19CWC INDvsAUS Australia U19 all out for 216 runs India need 217 runs to win the