उमेश यादव हा 'आदर्श फिल्डर' : प्रशिक्षक

वृत्तसंस्था
मंगळवार, 18 ऑक्टोबर 2016

जडेजा आणि विराट या दोघांचेही 'थ्रो' खूपच ताकदवान असतात. मैदानातून कुठूनही हे दोघे अचूक 'थ्रो' करू शकतात. उमेश यादवचाही 'थ्रो' अचूक असतो. जानेवारीत ऑस्ट्रेलियामध्ये उमेशने 80 मीटर अंतरावरून फलंदाजाला धावबाद केले होते

नवी दिल्ली: 'न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात कोरे अँडरसनचा अफलातून झेल घेणाऱ्या उमेश यादवने देशातील वेगवान गोलंदाजांसमोर क्षेत्ररक्षणाचा नवा आदर्श उभा केला आहे,' अशा शब्दांत भारतीय क्रिकेट संघाचे क्षेत्ररक्षणाचे प्रशिक्षक आर. श्रीधर यांनी त्याचे कौतुक केले. धरमशाला येथील सामन्यात उमेशने सुरेख सूर मारत झेल टिपला होता.

श्रीधर म्हणाले, "उत्तम क्षेत्ररक्षक असलेले वेगवान गोलंदाज संघात असणे, हा मोठा फायदाच असतो. उमेश चांगला क्षेत्ररक्षक आहे. सीमारेषेवरून त्याचा 'थ्रो'ही अचूक असतो. महंमद शमीदेखील क्षेत्ररक्षण उत्तम करतो. काही काळापूर्वी संघात असलेला मोहित शर्माही क्षेत्ररक्षणामध्ये चांगला होता. पण या सर्वांत उमेश यादव उजवा ठरतो तो त्याच्या चपळतेमुळे! त्याने यापूर्वीही अनेक अफलातून झेल टिपले आहेत. 'वेगवान गोलंदाजाने क्षेत्ररक्षण कसे करावे' याचा वस्तुपाठच उमेशने घालून दिला आहे.''

'सध्याच्या भारतीय संघातील कोणत्या खेळाडूचा सीमारेषेवरून अचूक 'थ्रो' येतो' असा प्रश्‍न विचारला असता श्रीधर यांनी विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांचा उल्लेख केला. 'जडेजा आणि विराट या दोघांचेही 'थ्रो' खूपच ताकदवान असतात. मैदानातून कुठूनही हे दोघे अचूक 'थ्रो' करू शकतात. उमेश यादवचाही 'थ्रो' अचूक असतो. जानेवारीत ऑस्ट्रेलियामध्ये उमेशने 80 मीटर अंतरावरून फलंदाजाला धावबाद केले होते,' असे श्रीधर म्हणाले.

कुठल्याही एकाच जागी उत्तम क्षेत्ररक्षण करण्यापेक्षा मैदानात कुठेही चांगले क्षेत्ररक्षण करणाऱ्या खेळाडूंची जास्त गरज आहे, असे कर्णधार महेंद्रसिंह धोनीचे ठाम मत आहे. यानुसार, अजिंक्‍य रहाणे आणि विराट कोहली संघातील सर्वोत्तम क्षेत्ररक्षकांपैकी एक आहेत, असे श्रीधर यांचे निरीक्षण आहे. हे दोघे कुठल्याही जागेवर तितक्‍याच चपळाईने क्षेत्ररक्षण करू शकतात. 'एकदिवसीय क्रिकेटमध्ये फलंदाजांना सहज धावा न देण्यात क्षेत्ररक्षकांची महत्त्वाची भूमिका आहे. मनीष पांडे, विराट, अजिंक्‍य, अक्षर पटेल हे क्षेत्ररक्षक धावा अडवून फलंदाजांवर दडपण आणतात,' असे श्रीधर यांनी सांगितले.

Web Title: Umesh Yadav's fielding is benchmark for others, says Coach R Sridhar