कर्मयोगी द्रविडने प्रथमच जिंकला विश्‍वकरंडक! 

Saturday, 3 February 2018

अलीकडच्या काळातील तो सर्वोत्तम तंत्रशुद्ध फलंदाज होता आणि आहे..! संघासाठी त्यानं अक्षरश: शक्‍य ते सगळं केलं.. पण क्रिकेट जगतातील प्रतिष्ठेचा विश्‍वकरंडक त्याला कधीच जिंकता आला नव्हता.. खेळाडू म्हणून जे शक्‍य झालं नाही, ते त्यानं प्रशिक्षक म्हणून करून दाखवलं..! राहुल द्रविड..! खरंच सलाम!! 

अलीकडच्या काळातील तो सर्वोत्तम तंत्रशुद्ध फलंदाज होता आणि आहे..! संघासाठी त्यानं अक्षरश: शक्‍य ते सगळं केलं.. पण क्रिकेट जगतातील प्रतिष्ठेचा विश्‍वकरंडक त्याला कधीच जिंकता आला नव्हता.. खेळाडू म्हणून जे शक्‍य झालं नाही, ते त्यानं प्रशिक्षक म्हणून करून दाखवलं..! राहुल द्रविड..! खरंच सलाम!! 

आजच्या अंतिम सामन्यामध्ये विजयी धावा केल्यानंतर सगळे खेळाडू सुसाट वेगानं मैदानावर धावत गेले.. जल्लोष सुरू झाला.. पण यात राहुल द्रविड नव्हता.. सगळ्यांच्या जल्लोषाचा सुरवातीचा भर ओसरल्यानंतर 'राहुल सर' मैदानात आले.. मैदानात उपस्थित असलेल्या प्रेक्षकांनी लाडक्‍या राहुलची छबी पाहताच जल्लोष केला आणि या सगळ्या 'अटेंशन'मुळे नेहमीप्रमाणेच राहुल द्रविड थोडासा बुजला.. 

'हे थोडसं एम्बॅरसिंग आहे. माझ्यावरच सगळ्यांचा फोकस आहे. पण हे सगळं श्रेय खेळाडू आणि सपोर्ट स्टाफचं आहे..' नेहमीच्याच न्रमतेनं राहुल विजयानंतर बोलत होता.. आनंद अर्थातच त्यालाही झालाच असणार.. पृथ्वी शॉच्या संघातील प्रत्येकाने प्रथमच विश्‍वकरंडक जिंकला आहे.. अगदी राहुल द्रविड सकट सगळ्यांचा.. 

खेळाडू म्हणून राहुल द्रविड 1999 पासून विश्‍वकरंडक स्पर्धेत विजयाच्या आशेने खेळत होता. त्या पहिल्या स्पर्धेत भारत 'सुपर सिक्‍स'च्या पातळीवरच पराभूत झाला. नंतर 2003 मध्ये भारतीय संघ अंतिम फेरीत पोचला होता. पण ऑस्ट्रेलियाकडून आपल्याला पराभव स्वीकारावा लागला होता. या स्पर्धेत द्रविड उपकर्णधार होता; पुढच्या 2007 च्या स्पर्धेत तो कर्णधार होता. विश्‍वकरंडक उंचावण्याची ही त्याची अखेरची संधी होती. पण साखळी स्पर्धेतच आपला तो संघ पराभूत झाला आणि द्रविडचं स्वप्न अपूर्ण राहिलं. 

मितभाषी आणि कामावर प्रचंड फोकस असणाऱ्या द्रविडनं निवृत्तीनंतर देशातील नव्या पिढीला घडविण्याची जबाबदारी स्वीकारली. 19 वर्षांखालील संघाचे आणि भारतीय 'अ' संघाचे प्रशिक्षकपद स्वीकारल्यानंतर त्याने शास्त्रशुद्ध पद्धतीने नवे खेळाडू तयार करण्याची भूमिका घेतली. त्यावेळी भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी त्याचाच मित्र अनिल कुंबळे होता. या दोघाही मित्रांनी ज्युनिअर संघ ते वरिष्ठ संघ अशी भारताची भक्कम फळी उभारण्यात मोलाचा वाटा उचलला. 

2016 मध्ये भारतीय संघ 19 वर्षांखालील विश्‍वकरंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोचला होता. तेव्हाही पराभव स्वीकारावा लागला आणि विश्‍वकरंडक जिंकण्यासाठी द्रविडला आणखी प्रतीक्षा करावी लागली. आता पृथ्वी शॉच्या या संघाने भन्नाट कामगिरी करत संपूर्ण स्पर्धेत अपराजित राहण्याचा पराक्रम केला आणि विश्‍वकरंडक उंचावला.. त्यांच्या लाडक्‍या 'राहुल सरां'चं स्वप्न त्यांनी पूर्ण केलं..

या स्वप्नपूर्तीनंतरही त्याच्यातला 'प्रशिक्षक' खेळाडूंना पुढच्या वाटचालीसाठी सावध करत होता. 'या विजयाच्या पायावर आता पुढची वाटचाल करायची आहे' असे त्यांना बजावत होता.. आणि क्रिकेटजगत 'राहुल द्रविड' या कर्मयोग्याला वंदन करत होते..!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Under 19 Cricket World Cup Final India versus Australia Rahul Dravid