बडोदा, तमिळनाडू उपांत्य फेरीत

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 मार्च 2017

नवी दिल्ली - बडोदा आणि तमिळनाडू संघांनी सफाईदार विजय मिळवून विजय हजारे करंडक वन-डे क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. बडोद्याने कर्नाटकचा सात, तर तमिळनाडूने गुजरातचा पाच गडी राखून पराभव केला.

नवी दिल्ली - बडोदा आणि तमिळनाडू संघांनी सफाईदार विजय मिळवून विजय हजारे करंडक वन-डे क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. बडोद्याने कर्नाटकचा सात, तर तमिळनाडूने गुजरातचा पाच गडी राखून पराभव केला.

विजयासाठी 235 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना कृणाल पंड्याच्या 79 चेंडूंतील 70 धावांच्या खेळीमुळे बडोद्याचा विजय सुकर झाला. त्यापूर्वी केदार देवधर आणि आदित्य वाघमोडे यांनी 64 धावांची सलामी देत बडोद्याला चांगली सुरवात दिली होती. आदित्य बाद झाल्यावर केदार आणि कृणाल यांनी 92 धावांची भागीदारी करून विजय सुकर केला. केदारने 98 चेंडूंत 78 धावा केल्या. हे दोघे बाद झाल्यावर दीपक हुडा (34) आणि युसूफ पठाण (10) यांनी नाबाद राहताना 25 चेंडू राखूनच बडोद्याच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

त्यापूर्वी, पवन देशपांडे (54), रवी कुमार समर्थ (44) आणि मयांक अगरवाल (40) यांच्या फलंदाजीने कर्नाटकाला समाधानकारक आव्हान ठेवता आले. त्यांचा डाव 48.5 षटकांत 233 धावांवर संपुष्टात आला. कृणाल पंड्याने तीन गडी बाद केले.

राजू चमकला
दुसऱ्या सामन्यात गोलंदाजांची एकत्रित अचूक कामगिरी आणि जी. एस. राजूच्या 85 धावांच्या खेळीमुळे तमिळनाडूने सहज विजय मिळविला. गुजरातला 211 धावांत रोखल्यावर तमिळनाडूने 45 चेंडू बाकी ठेवूनच विजय मिळविला. प्रथम फलंदाजी करण्याच्या निर्णयाचा फायदा गुजरातला उठवता आला नाही. एकवेळ 5 बाद 110 अशा कठीण परिस्थितीतून रुजूल भटच्या (83) अर्धशतकामुळे त्यांना दोनशेचा टप्पा ओलांडता आला. त्यानंतर राजूचा संयमी खेळ आणि त्याने कौशिक गांधी, बाबा अपराजित आणि दिनेश कार्तिक यांच्यासोबत केलेल्या तीन छोट्या भागीदारीमुळे तमिळनाडूचा विजय सुकर झाला.

संक्षिप्त धावफलक -
कर्नाटक 48.5 षटकांत 233 (पवन देशपांडे 54, आर. समर्थ 44, मयांक अगरवाल 40, कृणाल पंड्या 3-32) पराभूत वि. बडोदा 45.5 षटकांत 3 बाद 234 (केदार देवधर 78, कृणाल पंड्या 70, दीप हुडा नाबाद 34, एस. अरविंद 2-42)

Web Title: vijay hajare karandak one day cricket