विराट कोहलीचे शतक; भारताचे वर्चस्व 

वृत्तसंस्था
शनिवार, 8 ऑक्टोबर 2016

न्यूझीलंडविरुद्ध 3-0 असा विजय मिळवितास भारताचे कसोटी क्रमवारीतील अव्वल स्थान अधिक भक्कम होईल. दुसरीकडे, संयुक्त अरब अमिरातीमध्ये पाकिस्तान विरुद्ध वेस्ट इंडीज ही कसोटी मालिकाही सुरू होणार असल्याने त्या मालिकेत यश मिळवून पुन्हा पहिल्या क्रमांकावर येण्यास पाकिस्तानही उत्सुक आहे.

इंदूर : न्यूझीलंडच्या वेगवान गोलंदाजांची अचूकता, कर्णधार विराट कोहली आणि अजिंक्‍य रहाणेची शैलीदार फलंदाजी आणि पहिल्या दोन सत्रांमधील गोलंदाजांच्या वर्चस्वानंतर तिसऱ्या सत्रात भारतीयांनी राखलेली हुकूमत यामुळे भारत विरुद्ध न्यूझीलंड या तिसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात पहिल्याच दिवशी रंगत आली. हा सामना म्हणजे इंदूरमधील पहिलीच आंतरराष्ट्रीय कसोटी असल्याने 20 हजारांहून अधिक प्रेक्षक उपस्थित होते. पहिल्या दिवसअखेर खेळ थांबला, तेव्हा भारताने तीन गडी गमावून 267 धावा केल्या होत्या. कोहली 103, तर रहाणे 79 धावांवर खेळत आहेत. 

पहिल्या दोन सत्रांमध्ये 75 आणि 70 अशाच धावा झाल्या. पण तिसऱ्या सत्रामध्ये मात्र 34 षटकांत 119 धावा चोपत दिवसअखेर भारताने वर्चस्व प्रस्थापित केले. पहिल्या सत्रात न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांना रोखून धरले होते. न्यूझीलंडच्या आक्रमक गोलंदाजीसमोर भारतीय फलंदाज पहिल्या सत्रात 75 धावाच करू शकले. दुसऱ्या सत्रातही धावगती वाढविता आली नाही. पुनरागमन करणाऱ्या गंभीरने आक्रमक सुरवात केली. त्याने मॅट हेन्रीला सलग दोन चेंडूंवर दोन षटकार खेचले. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने पाचव्याच षटकापासून फिरकी गोलंदाजीला सुरवात केली. मात्र, भारतीय फलंदाजांना रोखण्याचे काम मुख्यत: वेगवान गोलंदाजांनीच केले. आक्रमक सुरवात केलेल्या गंभीरने पहिल्या 22 चेंडूंत 26 धावा केल्या. मात्र, त्यानंतरच्या 30 चेंडूंमध्ये त्याला केवळ तीनच धावा करता आल्या. तसेच, पहिल्या 12 षटकांत भारताने 50 धावा केल्या; पण पुढील 10 षटकांत केवळ 15 धावाच केल्या. पाचव्या षटकात फिरकी गोलंदाजी सुरु करण्याचा विल्यमसनचा निर्णय जीतन पटेलने योग्य ठरविला. त्याने याच षटकात मुरली विजयला बाद केले. त्यानंतर ट्रेंट बोल्टने गंभीरला बाद केले. 

त्यानंतर कोहली-पुजाराने न्यूझीलंडच्या दर्जेदार वेगवान गोलंदाजीला खेळून काढणेच पसंत केले. सूर गवसलेल्या पुजाराने आणखी एका अर्धशतकाकडे दमदार वाटचाल सुरू केली होती. पण 41 धावांवर असताना मिशेल सॅंटनरने त्याचा त्रिफळा उडविला. त्यानंतर मैदानात आलेल्या रहाणेने नेहमीप्रमाणे आत्मविश्‍वासाने सुरवात केली. पण ट्रेंट बोल्ट आणि मॅट हेन्रीने काही वेळा रहाणेला अडचणीत आणले. उंच उडालेला चेंडूचा अंदाज क्षेत्ररक्षकाला न आल्याने रहाणेला जीवदानही मिळाले. या खेळीदरम्यान रहाणेने कसोटी क्रिकेटमधील दोन हजार धावांचा टप्पा ओलांडला. उसळत्या चेंडूंसमोर रहाणे चाचपडत खेळत होता; पण दिवसातील अखेरच्या सत्रात त्यालाही सूर गवसला. 

कसोटी क्रमवारीमध्ये अव्वल क्रमांक मिळविल्यानंतर न्यूझीलंडला 'व्हाईट वॉश' देण्यासाठी सज्ज असलेल्या भारतीय संघाने आज नाणेफेक जिंकत फलंदाजी स्वीकारली. अनुभवी गौतम गंभीरचे दीर्घ कालावधीनंतर भारतीय संघात पुनरागमन झाले; तर गेल्या सामन्यात जखमी झालेल्या भुवनेश्‍वर कुमारच्या जागी उमेश यादवला संधी मिळाली आहे. इंदूरच्या मैदानावर होणारी ही पहिलीच कसोटी आहे. 

तीन सामन्यांच्या मालिकेमध्ये भारताने यापूर्वीच 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. त्यामुळे या कसोटीमध्येही विजय मिळवून न्यूझीलंडला 'व्हाईट वॉश' देण्याचे भारतीय संघाचे लक्ष्य आहे. भारतात झालेल्या गेल्या 13 कसोटींपैकी 11 सामन्यांत भारताने विजय मिळविला आहे. तसेच, यंदाच्या मोसमामध्ये भारतात 11 कसोटी सामने होणार आहेत. त्यामुळे मनोधैर्य उंचावण्याच्या दृष्टीने भारतीय संघ या सामन्यातही विजयासाठीच प्रयत्नशील असेल. न्यूझीलंडविरुद्ध 3-0 असा विजय मिळवितास भारताचे कसोटी क्रमवारीतील अव्वल स्थान अधिक भक्कम होईल. दुसरीकडे, संयुक्त अरब अमिरातीमध्ये पाकिस्तान विरुद्ध वेस्ट इंडीज ही कसोटी मालिकाही सुरू होणार असल्याने त्या मालिकेत यश मिळवून पुन्हा पहिल्या क्रमांकावर येण्यास पाकिस्तानही उत्सुक आहे. 

तापामुळे गेल्या सामन्यात न खेळलेला न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन तंदुरुस्त झाला आहे. त्यामुळे हेन्री निकोल्सच्या जागी त्याचा समावेश करण्यात आला. नील वॅग्नरला वगळून त्याच्या जागी अष्टपैलू जिमी निशॅमला संधी देण्यात आली. 

भारतीय संघ : 
गौतम गंभीर, मुरली विजय, चेतेश्‍वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्‍य रहाणे, रोहित शर्मा, आर. आश्‍विन, वृद्धिमान साहा (यष्टिरक्षक), रवींद्र जडेजा, महंमद शमी, उमेश यादव. 

न्यूझीलंडचा संघ : 
टॉम लॅथम, मार्टिन गुप्टील, केन विल्यमसन (कर्णधार), रॉस टेलर, ल्युक रॉंची, जिमी निशॅम, मिशेल सॅंटनर, बीजे वॉटलिंग (यष्टिरक्षक), जीतन पटेल, मॅट हेन्री, ट्रेंट बोल्ट. 

संक्षिप्त धावफलक : 
भारत : 90 षटकांत 3 बाद 267 (पहिल्या दिवशी उपाहारापर्यंत) 

मुरली विजय 10, गौतम गंभीर 29, चेतेश्‍वर पुजारा 41, विराट कोहली खेळत आहे 103, अजिंक्‍य रहाणे खेळत आहे 79 
अवांतर : 5 
गोलंदाजी : 
ट्रेंट बोल्ट 1-54, मॅट हेन्री 0-65, जीतन पटेल 1-65, मिशेल सॅंटनर 1-53, जिमी निशॅम 0-27

Web Title: Virat Kohli Century and Ajinkya Rahane half century guides India to decent total against New Zealand