कोहली म्हणजे क्रिकेट विश्वातील डोनाल्ड ट्रम्प!

वृत्तसंस्था
बुधवार, 22 मार्च 2017

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याप्रमाणे विराट कोहलीने प्रत्येक गोष्टीसाठी मीडियाला दोषी ठरवायला सुरुवात केली आहे. विराटने आमच्या खेळाडूंबद्दल खोट्या बातम्या पसरविल्या

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याच्याविरोधात ऑस्ट्रेलियन माध्यमांकडून गरळ ओकण्याचे काम सुरुच असून, आता विराट कोहली हा क्रिकेट विश्वातील डोनाल्ड ट्रम्प असल्याचे ऑस्ट्रेलियन माध्यमांनी म्हटले आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चार सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. तिसऱ्या सामन्यानंतर दोन्ही संघ 1-1 बरोबरीवर आहेत. धर्मशाला येथे होणाऱ्या चौथ्या कसोटी सामन्यानंतर मालिकेचा निकाल लागणार आहे.

बंगळूरमध्ये झालेल्या दुसऱ्या कसोटी दरम्यान डीआरएस घेण्यावरून विराट आणि स्मिथ यांच्यात वाद झाला होता. 

'द डेली टेलिग्राफ' या वृत्तपत्रातील स्तंभात ऑस्ट्रेलियन खेळाडूंविषयी चुकीच्या बातम्या पसरवत असल्याचा आरोप विराटवर करण्यात आला आहे.

'अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याप्रमाणे विराट कोहलीने प्रत्येक गोष्टीसाठी मीडियाला दोषी ठरवायला सुरुवात केली आहे. विराटने आमच्या खेळाडूंबद्दल खोट्या बातम्या पसरविल्या, पण 'बीसीसीआय'च नव्हे तर 'आयसीसी'नेही त्याच्यावर कोणतीही कारवाई केली नाही. 

विराटने प्रसारमाध्यमांना दोषी धरत स्वतःचा चेहरा लपविण्याचा प्रयत्न केला आहे. विराटने खेळातील खिलाडूवृत्तीच संपुष्टात आणली आहे. कसोटीचे कर्णधार खरे तर खिलाडुवृत्तीचे ध्वजवाहक असतात, पण इथे तर 'आयसीसी'नेच क्रिकेटचा हा पाया उद्ध्वस्त करण्यास प्रोत्साहन दिले आहे. एकप्रकारे क्रिकेट प्रशासकांच्या या धोरणामुळे ‘ट्रम्प’चा उदय होत आहे,' असे त्या स्तंभात लिहिले आहे.

'विराटने ड्रेसिंग रुममध्ये रागाच्या भरात फेकलेली बाटली ऑस्ट्रेलियाच्या संघ व्यवस्थापनातील सदस्याला लागली' असा आरोपही या लेखातून करण्यात आला आहे.

विराटला विजेता मानण्यासाठी आभार : अमिताभ
ऑस्ट्रेलियन माध्यमांकडून विराट कोहलीवर जोरदार टीका होत असताना बॉलिवूड महानायक अमिताभ बच्चन यांनी विराटच्या समर्थनार्थ ट्विट केले आहे. अमिताभ यांनी लिहिले आहे, की ऑस्ट्रेलियन माध्यमे विराटला क्रीडाविश्वातील डोनाल्ड ट्रम्प म्हणत आहेत. त्याला विजेता आणि अध्यक्ष मानण्यासाठी आभार!

Web Title: Virat Kohli is the Donald Trump of Cricket, accuses Australian Media