फलंदाजीच्या क्रमवारीत कोहली चौथ्या क्रमांकावर

वृत्तसंस्था
मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016

विशाखापट्टणम कसोटीतील कामगिरीमुळे कोहलीला 97 गुण मिळाले. मोहाली येथे 26 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या तिसऱ्या कसोटीतही चांगली कामगिरी करून अव्वल स्थान मिळविण्याचीही त्याला संधी आहे. कसोटी क्रमवारीत सध्या अव्वल स्थानी असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथचे 897 गुण आहेत. चौथ्या क्रमांकावरील कोहलीचे 822 गुण आहेत.

नवी दिल्ली: यंदाच्या वर्षी भन्नाट सूर गवसलेल्या विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) कसोटीमधील फलंदाजांच्या क्रमवारीत चौथ्या स्थानी झेप घेतली आहे. कसोटीमधील हे विराटचे आतापर्यंतचे सर्वोत्तम मानांकन आहे.

इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेमध्ये विराटने पुन्हा एकदा अफलातून कामगिरी केली आहे. विशाखापट्टणम येथे झालेल्या दुसऱ्या कसोटीत विराटने 167 आणि 81 धावा केल्या होत्या. त्याच्या कामगिरीला गोलंदाजांचीही साथ लाभल्याने भारताने या कसोटीत दणदणीत विजय मिळविला. फलंदाजीतील या कामगिरीमुळे विराटच्या क्रमवारीत एकदम 10 स्थानांची सुधारणा झाली. 'आयसीसी'च्या क्रमवारीतील गुणांमध्ये 800 चा टप्पा ओलांडणारा कोहली भारताचा अकरावा खेळाडू ठरला आहे.

विशाखापट्टणम कसोटीतील कामगिरीमुळे कोहलीला 97 गुण मिळाले. मोहाली येथे 26 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या तिसऱ्या कसोटीतही चांगली कामगिरी करून अव्वल स्थान मिळविण्याचीही त्याला संधी आहे. कसोटी क्रमवारीत सध्या अव्वल स्थानी असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथचे 897 गुण आहेत. चौथ्या क्रमांकावरील कोहलीचे 822 गुण आहेत. गोलंदाजीमध्ये भारताचा आर. आश्‍विन अव्वल स्थानी कायम आहे. आश्‍विनचे 895 गुण आहेत.

कसोटीमधील फलंदाजांची क्रमवारी:
1. स्टीव्ह स्मिथ (ऑस्ट्रेलिया) : 897 गुण
2. ज्यो रूट (इंग्लंड) : 844 गुण
3. केन विल्यम्सन (न्यूझीलंड) : 838 गुण
4. विराट कोहली (भारत) : 822 गुण
5. हाशिम आमला (दक्षिण आफ्रिका) : 809 गुण
6. युनूस खान (पाकिस्तान) : 790 गुण
7. एबी डिव्हिलर्स (दक्षिण आफ्रिका) : 786 गुण
8. डेव्हिड वॉर्नर (ऑस्ट्रेलिया) : 784 गुण
9. चेतेश्‍वर पुजारा (भारत) : 768 गुण
10. ऍलिस्टर कूक (इंग्लंड) : 760 गुण

भारताचे इतर खेळाडू आणि त्यांची क्रमवारी:
- अजिंक्‍य रहाणे (11 वे स्थान, 756 गुण)
- मुरली विजय (23 वे स्थान, 635 गुण)
- रोहित शर्मा (41 वे स्थान, 539 गुण)
- आर. आश्‍विन (43 वे स्थान, 524 गुण)
- रवींद्र जडेजा (गोलंदाजीत सहावे स्थान, 795 गुण)
- महंमद शमी (गोलंदाजीत 21 वे स्थान, 572 गुण)
- ईशांत शर्मा (गोलंदाजीत 26 वे स्थान, 556 गुण)
- भुवनेश्‍वर कुमार (गोलंदाजीत 32 वे स्थान, 486 गुण)
- उमेश यादव (गोलंदाजीत 34 वे स्थान, 450 गुण)

Web Title: Virat Kohli gets career-based ranking in tests after Vizag test heroics