विराट कर्णधार; युवीचे पुनरागमन; रैनाला वगळले 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 जानेवारी 2017

या मालिकेपूर्वी दोन सराव सामने होणार आहेत. त्यातील एका सामन्यात धोनी नेतृत्व करणार आहे, तर दुसऱ्या सामन्यात अजिंक्‍य रहाणेकडे कर्णधारपद सोपविण्यात आले आहे. या दोन सामन्यांमध्ये प्रामुख्याने तरुण आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर फार न खेळलेल्या खेळाडूंचा समावेश आहे. 

मुंबई : इंग्लंडविरुद्धच्या आगामी एकदिवसीय आणि ट्‌वेंटी-20 सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघाच्या कर्णधारपदी अपेक्षेप्रमाणे विराट कोहलीची निवड झाली. कर्णधारपदाच्या जबाबदारीतून मुक्त झाल्यानंतर महेंद्रसिंह धोनीही या मालिकेत खेळणार आहे. अनुभवी डावखुरा फलंदाज युवराजसिंगला एकदिवसीय आणि ट्‌वेंटी-20 मालिकेसाठी संघात स्थान मिळाले आहे. रोहित शर्मा आणि सुरेश रैना यांना एकदिवसीय संघात स्थान मिळालेले नाही. 

इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघाची निवड आज (शुक्रवार) जाहीर झाली. संघनिवडीपूर्वी दोन दिवस धोनीने कर्णधारपद सोडण्याचा निर्णय जाहीर करून 2019 मधील विश्‍वकरंडक स्पर्धेसाठीच्या संघबांधणीच्या दृष्टीने पहिले पाऊल टाकले होते. निवड समितीनेही याच दिशेने प्रयत्न केल्याचे संघ निवडीवरून दिसत आहे. धडाकेबाज फलंदाज आणि तरुण यष्टिरक्षक ऋषभ पंतला ट्‌वेंटी-20 साठी संघात स्थान मिळाले आहे. ऋषभ पंत हा यष्टिरक्षकही आहे. त्यामुळे आगामी काळात महेंद्रसिंह धोनीनंतरचा पर्याय म्हणून पंतकडे पाहिले जाऊ शकते. 

निवड समितीने ट्‌वेंटी-20 साठी संघात अनुभवी युवराजसिंग आणि डावखुरा वेगवान गोलंदाज आशिष नेहरालाही स्थान दिले आहे. याशिवाय, कसोटी मालिकेत इंग्लंडचे फलंदाज भारतीय फिरकी गोलंदाजांसमोर झगडत असल्याचे स्पष्ट चित्र दिसले होते. त्यामुळे एकदिवसीय आणि ट्‌वेंटी-20 या दोन्ही संघांमध्ये भारताने फिरकी गोलंदाजांवर भर दिले आहे. एकदिवसीय संघात आर. आश्‍विन, रवींद्र जडेजा, अमित मिश्रा हे नियमित गोलंदाज आणि युवराजसिंग, केदार जाधव हे पार्ट-टाईम फिरकी गोलंदाज निवडले आहेत. विशेष म्हणजे, अनुभवी सुरेश रैनाला एकदिवसीय संघातून वगळण्यात आले आहे. के. एल. राहुल आणि केदार जाधव यांच्यासह मनीष पांडेला या संघात स्थान मिळाले आहे. ट्‌वेंटी-20 साठीच्या संघात आश्‍विन, जडेजा यांच्यासह युझवेंद्र चहल या तरुण गोलंदाजाला संधी देण्यात आली आहे. यांच्यासह युवराजसिंग आणि सुरेश रैना हे पार्ट-टाईम गोलंदाज असतील. 

इंग्लंडविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांसाठीचा संघ : 
विराट कोहली (कर्णधार), महेंद्रसिंह धोनी (यष्टिरक्षक), के. एल. राहुल, शिखर धवन, मनीष पांडे, केदार जाधव, युवराजसिंग, अजिंक्‍य रहाणे, हार्दिक पंड्या, आर. आश्‍विन, रवींद्र जडेजा, अमित मिश्रा, जसप्रित बुमराह, भुवनेश्‍वर कुमार, उमेश यादव. 

इंग्लंडविरुद्धच्या तीन ट्‌वेंटी-20 सामन्यांसाठीचा संघ : 
विराट कोहली (कर्णधार), महेंद्रसिंह धोनी (यष्टिरक्षक), मनदीपसिंग, के. एल. राहुल, युवराजसिंग, सुरेश रैना, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, आर. आश्‍विन, रवींद्र जडेजा, युझवेंद्र चहल, मनीष पांडे, जसप्रित बुमराह, भुवनेश्‍वर कुमार, उमेश यादव.

भारत विरुद्ध इंग्लंड, एकदिवसीय मालिका : 
- रविवार, 15 जानेवारी : पहिला सामना, पुणे : दुपारी 1.30 पासून 
- गुरुवार, 19 जानेवारी : दुसरा सामना, कटक : दुपारी 1.30 पासून 
- रविवार, 22 जानेवारी : तिसरा सामना, कोलकाता : दुपारी 1.30 पासून 

भारत विरुद्ध इंग्लंड, ट्‌वेंटी-20 मालिका : 
- गुरुवार, 26 जानेवारी : पहिला सामना, कानपूर : सायंकाळी 4.30 पासून 
- रविवार, 29 जानेवारी : दुसरा सामना, नागपूर : सायंकाळी 7.00 पासून 
- बुधवार, 1 फेब्रुवारी : तिसरा सामना, बंगळूर : सायंकाळी 7.00 पासून 

Web Title: Virat Kohli to lead Team India; Yuvraj Singh back in the side; Raina dropped from ODI team