फोर्ब्स्‌च्या यादीत विराट कोहलीची लक्षणीय प्रगती 

वृत्तसंस्था
Thursday, 7 June 2018

स्त्री तसेच पुरुष खेळाडूंना समान बक्षिसाची मागणी होत असली तरी महिला क्रीडापटूंवर बक्षीस; तसेच पुरस्कार रकमेच्याबाबतीत अन्यायच होत असल्याचे सिद्ध झाले. सर्वाधिक श्रीमंत क्रीडापटूंच्या क्रमवारीत पहिल्या शंभर खेळाडूंत एकही महिला खेळाडू नाही.

वॉशिंग्टन - स्त्री तसेच पुरुष खेळाडूंना समान बक्षिसाची मागणी होत असली तरी महिला क्रीडापटूंवर बक्षीस; तसेच पुरस्कार रकमेच्याबाबतीत अन्यायच होत असल्याचे सिद्ध झाले. सर्वाधिक श्रीमंत क्रीडापटूंच्या क्रमवारीत पहिल्या शंभर खेळाडूंत एकही महिला खेळाडू नाही. 
अर्थात महिला क्रीडापटू या यादीत क्वचितच दिसत असत. गतवर्षी केवळ सेरेना विल्यम्स या यादीत होती; पण बाळंतपणामुळे तिने ब्रेक घेतला; त्यामुळे ती अव्वल शंभरमधून बाहेर गेली. या यादीतील आघाडीचे खेळाडू लक्षात घेतल्यास त्या खेळात महिला स्टारच नाहीत हे लक्षात येते. फ्लॉईड मेवेदर या यादीत आघाडीवर आहे. त्याची कमाई 28 कोटी 50 लाख डॉलर आहे. 
भारतीयांसाठी जमेची बाब म्हणजे विराट कोहलीने या यादीत प्रगती केली आहे. तो 89 व्या क्रमांकावरून 83 व्या स्थानी गेला आहे. त्याची कमाई दोन कोटी 40 लाख डॉलर (161 कोटी रुपये) आहे; पण त्यातही जास्त रक्कम जाहिरात करारातूनच आहे. त्याला खेळल्याबद्दल मिळालेला वाटा केवळ 40 लाख डॉलर आहे. गतवर्षीची विराटची कमाई 143 कोटी रुपये होती. केवळ जाहिरात करार लक्षात घेतल्यास कोहलीची कमाई आघाडीवर असलेल्या फ्लॉईड मेवेदरपेक्षाही (1 कोटी डॉलर) जास्त आहे. 
श्रीमंत खेळाडूंच्या यादीत अमेरिकेतील एनबीए स्टारचा सहभाग 40 टक्के आहे. त्यापाठोपाठ अमेरिकन फुटबॉल खेळणारे आहेत, बास्केटबॉलमध्ये मोठ्या प्रमाणावर बक्षिसेही आहेत, त्याचा फायदा त्यांना होतो. टेनिस, गोल्फ, क्रिकेटमधील स्टारची जास्त कमाई जाहिरात करारातून असते. 

टॉप टेन श्रीमंत खेळाडू 
1 फ्लॉईड मेवेदर (बॉक्‍सिंग) 28 कोटी 50 लाख 
2 लिओनेल मेस्सी (फुटबॉल) 11 कोटी 10 लाख 
3 ख्रिस्तियानो रोनाल्डो (फुटबॉल) 10 कोटी 80 लाख 
4 कॉरन मॅकग्रेगॉर (मिक्‍स्ड मार्शल आर्ट) 9 कोटी 90 लाख 
5 नेमार (फुटबॉल) 9 कोटी 
6 लेब्रॉन जेम्स (बास्केटबॉल) 8 कोटी 55 लाख 
7 रॉजर फेडरर (टेनिस) 7 कोटी 72 लाख 
8 स्टीफन करी (बास्केटबॉल) 7 कोटी 69 लाख 
9 मॅट रायन (अमेरिकन फुटबॉल) 6 कोटी 73 लाख 
10 मॅथ्यू स्टॅफोर्ड (अमेरिकन फुटबॉल) 5 कोटी 95 लाख 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Virat Kohli Only Indian On This Forbes List, No Women In Top 100