esakal | वर्कलोडमुळे विराट कोहलीला विश्रांती 
sakal

बोलून बातमी शोधा

Virat Kohli rests with workload

वर्कलोडमुळे विराट कोहलीला विश्रांती 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई : इंग्लंडच्या प्रदीर्घ दौऱ्यातील वर्कलोडनंतर वर्षअखेरीस होणाऱ्या प्रतिष्ठेच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी विराट कोहलीची तंदुरुस्ती कायम राहावी म्हणून या महिन्यात होणाऱ्या आशिया करंडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेतून विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली आहे. त्याच्या अनुपस्थितीत रोहित शर्मा नेतृत्व करेल. या स्पर्धेसाठी अंबाती रायुडू आणि केदार जाधवसह भुवनेश्‍वर कुमारला पुनरागमनाची संधी देण्यात आली आहे. 

इंग्लंड दौऱ्यातील अखेरचा पाचवा एकदिवसीय सामना 7 ते 11 सप्टेंबरदरम्यान होत आहे, तर आखातामधली आशिया करंडक 15 सप्टेंबरपासून सुरू होत आहे. इंग्लंडमध्ये खेळत असलेल्या आणि आशिया करंडक स्पर्धेसाठी निवड झालेल्या खेळाडूंना लंडनहून थेट दुबईच गाठावी लागणार आहे. 

एमएसके प्रसाद यांच्या निवड समितीने आज मुंबई आशिया करंडक स्पर्धेसाठी 16 जणांचा संघ निवडताना बराच ऊहापोह केला. तंदुरुस्त ठरलेल्या रायुडू आणि केदार जाधव यांना पुनरागमनाची संधी देताना राजस्थानचा डावखुरा वेगवान गोलंदाज खलील अहमद या नव्या चेहऱ्याला संधी दिली. त्याच वेळी इंग्लंडमध्ये एकदिवसीय मालिका खेळलेल्या सुरेश रैनासह श्रेयस अय्यर, गोलंदाजीत सिद्धार्थ कौल आणि उमेश यादव यांना वगळले आहे. 

इंग्लंड दौऱ्यातील मर्यादित षटकांच्या सामन्यांसाठी अंबाती रायुडूची निवड झाली होती; परंतु योयो चाचणीत तो नापास झाल्यामुळे रैनाला संधी देण्यात आली होती. तसेच आयपीएलमध्ये झालेल्या दुखापतीमुळे केदार जाधवही संघाबाहेर होता. या दोन्ही खेळाडूंनी बंगळूरमध्ये नुकत्याच झालेल्या चौरंगी स्पर्धेतून तंदुरुस्ती सिद्ध केली आहे. 

विराटवरील वर्कलोडचा विचार करून आम्ही त्याला विश्रांती दिली आहे. आयपीएलपासून तो सातत्याने खेळत आहे. या सर्वांचा विचार करून आम्ही त्याच्या विश्रांतीला अधिक प्राधान्य दिले. आम्ही सर्व प्रमुख खेळाडूंवर पडणाऱ्या ताणावर लक्ष देऊन आहोत. त्यानुसार प्रत्येकाला आलटून-पालटून विश्रांती देण्यात येईल. 
- एमएसके प्रसाद, निवड समितीचे अध्यक्ष 

तिसऱ्या कसोटी सामन्यापासून मी काही दिवस इंग्लंडमध्ये होतो. खेळाडूंवरील वर्कलोडबाबत मी संघ व्यवस्थापनाबरोबर चर्चा केली. तिन्ही प्रकारात खेळत असलेल्या खेळाडूंची काळजी घेण्यावर आम्ही भर देत आहोत आणि याची सुरुवात विराटला आशिया करंडक स्पर्धेत विश्रांती देण्यातून केली आहे, असे प्रसाद यांनी सांगितले. 

खलील अहमदबाबत... 
खलील अहमद या नव्या खेळाडूबाबत विचारले असता, प्रसाद म्हणाले, राजस्थानच्या या 20 वर्षीय गोलंदाजाने प्रथम श्रेणीच्या 17 सामन्यांतून 28 विकेट घेतल्या आहेत. त्याची सरासरी 4.74 अशी आहे. त्याची गोलंदाजी भेदक आहे. 2016 मधील 19 वर्षीय विश्‍वकरंडक स्पर्धेपासून राहुल द्रविड त्याच्या कामगिरीवर लक्ष ठेवून आहेत. भारत "अ' संघातून तो नुकताच इंग्लंड दौऱ्यावर गेला होता. 

जयदेव उनाडकट आणि बरिंदर श्रण यांना संधी दिल्यानंतर निवड समिती नवा पर्याय शोधत होती. संघातील 2-3 जागांसाठी आम्ही विचार करत होतो आणि डावखुऱ्या वेगवान गोलंदाजाच्या जागेसाठी आम्ही आग्रही होतो. त्यासाठी खलीलची निवड केली. विश्‍वकरंडक स्पर्धेपर्यंत आम्ही या उर्वरित जागांसाठीही पर्याय शोधू, असेही प्रसाद म्हणाले. 

भारत "अ' संघातून सातत्यपूर्ण कामगिरी करत असलेल्या मयांक अगरवालबाबत विचारले असता, प्रसाद यांनी सांगतले, नजीकच्या काळात त्याला निश्‍चितच संधी मिळू शकते. वर्षभरातील त्याच्या सातत्यपूर्ण फलंदाजीची आम्ही नोंद घेतली आहे. 

संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, केएल राहुल, महेंद्रसिंह धोनी (यष्टीरक्षक), मनीष पांडे, केदार जाधव, अंबाती रायुडू, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक, यझुवेंदर चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्‍वर कुमार, शार्दुल ठाकूर आणि खलील अहमद. 
 

loading image
go to top