कोहलीच धोनीचा खरा वारसदार - गांगुली

वृत्तसंस्था
शनिवार, 7 जानेवारी 2017

एकदिवसीय आणि ट्वेंटी-20 मध्ये कोहलीच कर्णधार म्हणून धोनीचा खरा वारसदार आहे. त्याची कामगिरी अप्रतिम राहिलेली आहे, त्यामुळे त्याची निवड होण्यात शंकाच नव्हती.

कोलकता - विराट कोहलीच महेंद्रसिंह धोनीचा कर्णधार म्हणून खरा वारसदार असल्याचे भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने म्हटले आहे.

इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय आणि ट्वेंटी-20 मालिकेसाठी भारताच्या कर्णधारपदी विराट कोहलीची निवड करण्यात आली आहे. तसेच अष्टपैलू युवराजसिंगचे भारतीय संघात पुनरागमन झाले आहे. या निवडीपूर्वी धोनीने कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे त्याच्याजागी कर्णधारपदी कोणाची निवड होईल, याची उत्सुकता होती. अखेर कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहलीचीच तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये भारतीय संघाच्या कर्णधारपदी निवड झाली.

संघ निवडीबद्दल गांगुली म्हणाला, की एकदिवसीय आणि ट्वेंटी-20 मध्ये कोहलीच कर्णधार म्हणून धोनीचा खरा वारसदार आहे. त्याची कामगिरी अप्रतिम राहिलेली आहे, त्यामुळे त्याची निवड होण्यात शंकाच नव्हती. कोहली आता कसोटीप्रमाणे एकदिवसीय आणि ट्वेंटी-20 सामन्यातही भारताला यशाच्या शिखरावर नेईल. युवराजसिंग संघात निवड होणे, योग्यच आहे. मला विश्वास आहे, की तो नक्कीच धावा करून यश मिळवेल.

Web Title: Virat Kohli Right Successor to Mahendra Singh Dhoni, Says Sourav Ganguly