esakal | कोहलीचे शतक; धोनीचेही चक्क अर्धशतक; भारताचा विजय
sakal

बोलून बातमी शोधा

Virat Kohli

कोहलीचे शतक; धोनीचेही चक्क अर्धशतक; भारताचा विजय

sakal_logo
By
टीम ई सकाळ

ऍडलेड : कर्णधार विराट कोहलीची भन्नाट शतकी खेळी आणि महेंद्रसिंह धोनीच्या संयमी अर्धशतकाच्या जोरावर दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर सहा गडी राखून विजय मिळविला. पहिल्या सामन्यात अनपेक्षितरित्या पराभवाचा धक्का बसलेल्या भारतीय संघाने आज मालिकेत पुनरागमन केले. या विजयासह तीन सामन्यांच्या मालिकेत आता 1-1 बरोबरी झाली आहे. 

ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करत भारतासमोर 299 धावांचे आव्हान ठेवले होते. पहिल्या सामन्यातील भारताच्या फलंदाजांची हाराकिरी पाहता हे आव्हान आजही अवघड वाटत होते. पण शिखर धवन आणि रोहित शर्मा या दोघांनी सुरवातीची काही षटके सावधगिरीने खेळून काढत पाठलागाचा पाया रचला. धवन-रोहितने 47 धावांची सलामी दिली. धवन 32, तर रोहित 43 धावा करून बाद झाला. 

यानंतर कोहली आणि अंबाती रायडू यांनी भारताचा डाव थोडा सावरला. रायडूही 24 धावा करून बाद झाला. त्यानंतर कोहली-धोनीची जोडी जमली. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 82 धावांची भागीदारी केली. या भागीदारीदरम्यान कोहलीने त्याचे एकदिवसीय क्रिकेटमधील 39 वे शतक झळकाविले. शतक झळकाविल्यानंतर लगेचच कोहली बाद झाला. 

त्यानंतर मैदानात उतरलेल्या दिनेश कार्तिकने आक्रमक खेळी केली. त्याच्या खेळीमुळे भारताचा विजय आवाक्‍यात आला. 

तत्पूर्वी, लागोपाठ दुसर्‍या सामन्यात शॉन मार्शने भक्कम खेळी करून संघाला मोठी धावसंख्या उभारायला मदत केली. 131 धावांची सुंदर खेळी उभारताना मार्शने ग्लेन मॅक्सवेल सोबत केलेली 94 धावांची वेगवान भागीदारी मोठा परिणाम साधून गेली.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने 50 षटकांच्या अखेरीला 9 बाद 298 धावसंख्या उभारली.

40 डिग्री पेक्षा कडक उन्हात भारतीय गोलंदाजांना प्रथम गोलंदाजी करावी लागली कारण विराट कोहली दुसर्‍यांदा नाणेफेक हरला. भारतीय संघात एक बदल केला जात असताना ऑस्ट्रेलियाने पहिल्या सामन्यातील विजयी संघ कायम ठेवला. भारतीय संघाने मोंहमद सिराजला एक दिवसीय क्रिकेटचे पदार्पण करायची संधी दिली. भुवनेश्वर कुमारने अ‍ॅरॉन फिंचच्या स्टंप हलवल्या आणि शमीने अलेक्स केरीला बाउन्सर टाकून चकवले. 2 बाद 26 धावसंख्येवर शॉन मार्श फलंदाजीला आला. 

मार्शने उस्मान ख्वाजा बरोबर अर्धशतकी भागीदारी करून डाव सावरला. ख्वाजा तंबूत परतला तो केवळ रवींद्र जडेजाच्या अफलातून क्षेत्ररक्षणामुळे. चपळाईने पळून एका हातात चेंडू अडवून जडेजाने गोलंदाजा समोरील स्टंपवर चेंडू इतक्या अचूकतेने फेकला की ख्वाजा धावबाद झाला. त्यानंतर खेळाची सूत्र मार्शने आपल्या हाती ठेवली.

पदार्पण करणार्‍या सिराजच्या पोटात दडपणाने होत असलेली गुरगुर मार्शने ओळखली आणि फटक्यांचा हल्ला चढवला. सिराज थोडा गडबडला आणि बर्‍याच वेळा त्याने मार्शला पायावर मारा करायची चूक केली. भागीदारी रंग दाखवू लागली असताना हॅडस्कोंम्बला धोनीने चपळता दाखवत स्टंप केले.  

स्टॉयनीस बरोबर परत एक भागीदारी रचताना शॉन मॉने केलेली फलंदाजी लक्षणीय होती. चौकारांच्या मागे न लागता मार्शने मोकळ्या जागेत चेंडू मारून पळून धावा जमा करायचा सपाटा लावला. कडक उन्हामुळे गोलंदाज चांगलेच थकत होते आणि मोठ्या सीमारेषांमुळे पळून काढल्या जाणार्‍या धावा रोखणे कठीण जात होते.

फलंदाजीला पोषक खेळपट्टी उन्हाने थकलेले गोलंदाज याचा फायदा घेत मार्शने शतक पूर्ण केल्यावर ग्लेन मॅक्सवेलसह मोठ्या फटक्यांची माळ लावली. कुलदीप यादवच्या शेवटच्या षटकात दोन षटकार मारले गेले.

कुलदीपला एकही फलंदाजाला बाद करता सिराजचे नशीबही साथीला नव्हते. मॅक्सवेलला पायचित असल्याचा पंचांनी दिलेला निर्णय टीव्ही रिप्लेमधे बदलला गेला. सिराजला पदार्पणाच्या सामन्यातील 10 षटकात 76 धावांचा मार पडला. 

मॅक्सवेल - मार्शने मिळून 65 चेंडूत 94 धावांची भागीदारी केल्याने ऑस्ट्रेलियाला 9 बाद 298चा धावफलक रचता आला. मॅक्सवेल 48 आणि मार्श 131 धावा काढून भुवनेश्वरच्या एकाच षटकात बाद झाले. बाकी गोलंदाजांना मार पडत असताना भुवनेश्वर कुमारने 10 षटकात 45 धावा देत चार फलदांजांना बाद केले.

loading image