कोहली, स्मिथ आयसीसीचे 'जावई' आहेत का? : प्लेसिस

वृत्तसंस्था
सोमवार, 13 मार्च 2017

गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियामधील कसोटी सामन्यादरम्यान च्युईंग गम चघळत असतानाच त्या लाळेने चेंडू चमकावित असल्याचे चित्रिकरण पाहून प्लेसिसवर 'आयसीसी'ने कारवाई केली.

ड्युनेडिन : भारत आणि ऑस्ट्रेलियामधील बंगळूर कसोटीमध्ये 'डीआरएस'वरून झालेल्या वादानंतरही आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीने (आयसीसी) कुणावरही शिस्तभंगाची कारवाई न केल्याने दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने आश्‍चर्य व्यक्त केले. 'च्युईंगगम तोंडात असताना त्या लाळेने चेंडू चमकविण्यापेक्षा विराट कोहली आणि स्टीव्ह स्मिथ यांची कृती नक्कीच जास्त गंभीर होती,' अशी प्रतिक्रिया प्लेसिसने व्यक्त केली. 

बंगळूर येथे झालेल्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ पायचीत असल्याचा निर्णय पंचांनी दिला. त्याविरोधात 'डीआरएस'द्वारे दाद मागायची की नाही, याच्या संकेतासाठी स्मिथ आणि त्याचा सहकारी फलंदाज पीटर हॅंड्‌सकोम्ब यांनी ऑस्ट्रेलियाच्या ड्रेसिंग रूममधून मदत घेण्याचा प्रयत्न केला. हे लक्षात येताच भारताचा कर्णधार विराट कोहली आणि पंच नायजेल लॉंग यांनी तातडीने हस्तक्षेप केला आणि पंचांनी स्मिथला मैदानावरून बाहेर जाण्याचे आदेश दिले. या सामन्यानंतर कोहली आणि भारतीय संघ व्यवस्थापनाने स्मिथवर अखिलाडू वृत्तीचा आणि फसवणुकीचा आरोप केला होता. या प्रकरणी 'आयसीसी'ने कुणावरही कारवाई केलेली नाही. 

गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियामधील कसोटी सामन्यादरम्यान च्युईंग गम चघळत असतानाच त्या लाळेने चेंडू चमकावित असल्याचे चित्रिकरण पाहून प्लेसिसवर 'आयसीसी'ने कारवाई केली. विशेष म्हणजे, तो सामना संपल्यानंतर हरकती किंवा आक्षेप नोंदविण्याची मुदत संपल्यानंतर काही वृत्तवाहिन्यांनी प्रसारित केलेल्या या चित्रिकरणाच्या आधारे 'आयसीसी'ने हे पाऊल उचलले होते. 

स्मिथने यापेक्षा गंभीर चूक केली असल्याने त्याच्यावर कारवाई कशी झाली नाही, याविषयी प्लेसिसने आश्‍चर्य व्यक्त केले. तो म्हणाला, 'माझी कृती यापेक्षा कितीतरी बिन-महत्त्वाची होती. तरीही मला कारवाईला सामोरे जावे लागले. त्यामुळे कोहली किंवा स्मिथवर कारवाई का झाली नाही, याचाच विचार करत होतो. यावेळी 'आयसीसी'नी प्रतिक्रिया वेगळी होती. त्यामुळे माझ्यावर झालेली कारवाई जास्तच कडक होती, असेही पुन्हा वाटू लागले आहे.'' 

Web Title: Virat Kohli Steve Smith DRS India versus Australia faf du plesis