कोहलीला शाब्दिक प्रत्युत्तर देऊ : ऑस्ट्रेलिया 

वृत्तसंस्था
मंगळवार, 14 फेब्रुवारी 2017

मुंबई : 'भारताचा संघ बलाढ्य आहे. पण आमच्याकडेही काही बलस्थाने आहेत. या दौऱ्यासाठी आम्ही कसून तयारी केली आहे. भारतासमोर कडवे आव्हान उभे करण्यास आम्ही सज्ज आहोत. या मालिकेत विराट कोहली आणि भारतीय खेळाडूंना आम्ही मैदानावरच आक्रमक प्रत्युत्तर देऊ,' अशा शब्दांत ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने आज (मंगळवार) रणशिंग फुंकले. चार कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ भारतात दाखल झाला आहे. 

गेल्या काही महिन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाला आशिया खंडात सतत पराभवाचाच सामना करावा लागत आहे. भारतामध्येही ऑस्ट्रेलियास लक्षणीय यश मिळालेले नाही. आशिया खंडात झालेल्या गेल्या नऊ कसोटींमध्ये ऑस्ट्रेलियाचा पराभवच झाला आहे. दुसरीकडे, सलग 19 कसोटींमध्ये अजिंक्‍य राहिलेला आणि सलग सहा मालिका जिंकलेला विराट कोहलीचा भारतीय संघ भन्नाट फॉर्ममध्ये आहे. दक्षिण आफ्रिकेकडून झालेल्या मानहानीकारक पराभवानंतर ऑस्ट्रेलियाच्या निवड समितीने कठोर निर्णय घेतले. पुनर्बांधणीच्या प्रक्रियेतून जात असलेल्या ऑस्ट्रेलिया संघात आता प्रामुख्याने नवोदित आणि तरुण खेळाडूंचा समावेश आहे. येत्या 23 फेब्रुवारीपासून या दोन संघांमध्ये कसोटी मालिका सुरू होत आहे. 

यापूर्वी ऑस्ट्रेलियात झालेल्या कसोटी मालिकेमध्ये दोन्ही संघांतील खेळाडूंमध्ये शाब्दिक चकमकी झाल्या होत्या. यावेळीही मैदानावर अशाच चकमकी होतील, असे संकेत स्मिथने दिले. "माझ्या मते, प्रत्येक खेळाडूची मैदानावर वावरण्याची आणि खेळण्याची स्वत:ची पद्धत असते. प्रतिस्पर्ध्याने डिवचल्यानंतर काही जणांचा खेळ सुधारतो. तसे होणार असेल, तर माझ्या खेळाडूंनी मैदानावर असे वागण्यासही हरकत नाही,'' असे मत स्मिथने व्यक्त केले. 

आगामी मालिकेविषयी स्मिथ म्हणाला, "ही मालिका खडतर असणारच आहे. हे आव्हान स्वीकारण्यास आम्ही उत्सुक आहोत. आम्ही आमच्या कामगिरीत सातत्य राखले, तर मालिकाही जिंकू शकतो. भारतामध्ये फलंदाजी करताना धावा करण्याचे लक्ष्य बाळगावेच लागते; पण बचावाच्या तंत्राचीही परीक्षा पाहिली जात असते. कारण संघ अडचणीत असतो, तेव्हा तंत्रशुद्ध फलंदाजीच मदतीस धावून येते.'' या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाने चार फिरकी गोलंदाजांना संघात स्थान दिले आहे. 

ऑस्ट्रेलियाचा संघ : 
स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, ऍश्‍टन ऍगर, जॅक्‍सन बर्ड, पीटर हॅंड्‌सकोम्ब, जोश हेझलवूड, उस्मान ख्वाजा, नॅथन लिऑन, मिचेल मार्श, शॉन मार्श, ग्लेन मॅक्‍सवेल, स्टीव्ह ओकफी, मॅट रेन्शॉ, मिचेल स्टार्क, मिशेल स्वेप्सन, मॅथ्यू वेड (यष्टिरक्षक).

Web Title: Virat Kohli Steve Smith India versus Australia Test Cricket sledging