लाहोरच्या रस्त्यांवरून फिरतोय 'विराट'

वृत्तसंस्था
Tuesday, 11 June 2019

पाकिस्तानी क्रिकेट संघाचा माजी कर्णधार युनिस खान याने विराट कोहलीची स्तुती केली असून, 'विराट'ची छायाचित्रे अपलोड केली आहेत.

लाहोर (पाकिस्तान) : लाहोरमधील रस्त्यांवरून 'विराट' दुचाकीवरून फिरत असून, त्याची छायाचित्र सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. पाकिस्तानी क्रिकेट संघाचा माजी कर्णधार युनिस खान याने विराट कोहलीची स्तुती केली असून, 'विराट'ची छायाचित्रे अपलोड केली आहेत.

विराट व 18 क्रमांक असे लिहीण्यात आलेली जर्सी घालून एक युवक दुचाकीवरून फिरत आहे. या छायाचित्रामुळे लाहोरच्या रस्त्यांवर विराट अवतरला आहे की काय? अशीच चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. दुचाकीवरून जाणाऱ्या आणि 'विराट' असे लिहिलेली जर्सी घातलेल्या व्यक्तीचे पाठमोरे छायाचित्र व्हायरल होत आहे. पण, यामुळे पाकिस्तानमध्येही विराट कोहलीचे चाहते आहेत, हे समोर आले आहे.

लंडन येथील एका कार्यक्रमात युनिस खानने गेल्या आठवड्यात विराट कोहलीची स्तुती केली होती. तो म्हणाला होता की, भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीचे चाहते भारताप्रमाणेच पाकिस्तानातही आहेत. त्याचाच प्रत्यय या व्हायरल होणाऱ्या छायाचित्रांमुळे येत आहे. दरम्यान, अनेकांनी ही छायाचित्रे रिट्विट केली आहेत. परंतु, लाहोरमध्ये ही जर्सी घालून फिरणारी व्यक्ती कोण आहे? त्याचे नाव काय? हे समजू शकलेले नाही.

रविवारी (ता. 16) भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना रंगणार आहे. एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेले हे संघ विश्वचषकातला सामना खेळणार आहेत. या सामन्याच्या पार्श्वभूमीवर 'विराट' पाकिस्तानमध्ये चर्चेत आला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: virat kohlis fan found in lahore wearing pakistan jersey written virat and no 18 on it scj 81