पाकिस्तानने वरचढ खेळ केला : विराट कोहली

सोमवार, 19 जून 2017

फखर झमन संपूर्ण खेळीत मारत सुटला होता. त्याने मारलेल्या फटक्‍यातील 80% फटके अत्यंत धोकादायक होते ज्यावर त्याची विकेट जाऊ शकत होती. पण त्याला क्रिकेटने वाचवले. नेमका तो बाद झाला तेव्हाचा चेंडू नो बॉल होता. पण मला अतिरिक्त धावांचा आकडा खरच खटकतो आहे.

लंडन - "मला कल्पना आहे की पाठीराख्यांना भारतीय संघाने अंतिम सामना जिंकावा असेच वाटत होते. आम्हीसुद्धा प्रयत्न केले. पण समोरचा संघाने वरचढ खेळ केला हे मान्य करण्यात काहीच लाज वाटण्यासारखे नाही. क्रिकेटच्या खेळात नेहमी तुम्ही जिंकू शकत नाही. समोरचा संघ त्या देशाचे प्रतिनिधित्व करत असो आणि जिंकण्याच्या इराद्याने मैदानात उतरत असतो. आमचे प्रयत्न आमच्या योजना लागू पडल्या नाहीत. पाकिस्तान संघाने आमच्यापेक्षा चांगला खेळ केला'', असे भारताचा कर्णधार विराट कोहलीने सामन्यानंतर बोलताना सांगितले. 

"फखर झमन संपूर्ण खेळीत मारत सुटला होता. त्याने मारलेल्या फटक्‍यातील 80% फटके अत्यंत धोकादायक होते ज्यावर त्याची विकेट जाऊ शकत होती. पण त्याला क्रिकेटने वाचवले. नेमका तो बाद झाला तेव्हाचा चेंडू नो बॉल होता. पण मला अतिरिक्त धावांचा आकडा खरच खटकतो आहे. इतक्‍या अतिरिक्त धावा अंतिम सामन्यात देणे म्हणजे पायावर धोंडा पाडणे आहे. त्या क्षेत्रात सुधारणा होणे गरजेचे आहे'', असे कोहलीने गोलंदाजांच्या बेशिस्त माऱ्याबद्दल नाराजी व्यक्त करताना सांगितले. 

फलंदाजीत झालेल्या पडझडीबद्दल बोलताना विराट कोहली म्हणाला, "मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना सुरुवात चांगली होणे गरजेचे असते. अंतिम सामन्यात तसे झाले नाही. महंमद आमीरने फारच अचूक आणि भेदक स्पेल टाकला. ज्यांनी धावा जास्त केल्या होत्या त्या शिखर धवन, रोहित शर्मा आणि माझी विकेट पटापट गेली तिथेच गणीत चुकले. हार्दिकने दाखवून दिले की त्याची काय क्षमता आहे. तो धावबाद झाल्यावर मग आव्हान उरले नाही.'' 

दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर भारतीय संघ लगेच वेस्ट इंडीज दौऱ्याला करता पोर्ट ऑफ स्पेनला उड्डाण करणार आहे. 

हसन अलीची अजब कहाणी 
पाकिस्तान प्रिमीयर लीगमधील पेशावर संघाचा सामना झाल्यावर एक खेळाडू पत्रकारांना भेटायला आला. त्यातील नामांकित पत्रकाराला नवखा खेळाडू संघव्यवस्थापनाने पाठवल्याचा राग आला. अनुभवी खेळाडू का नाही पाठवला म्हणून त्याने तक्रार केली. तेव्हा माजी वेगवान गोलंदाज मोहंमद अक्रमने त्या पत्रकाराची समजून काढताना सांगितले की, "सर आत्ताच या खेळाडूशी बोलून घ्या. दोन महिन्यांनंतर हा खेळाडू महान होणार आहे आणि मग त्याची मुलाखत घ्यायला तुम्हाला विनंती करावी लागेल. त्या खेळाडूचे नाव होते हसन अली. चॅंपियन्स करंडक स्पर्धेत हसन अलीच्या गळ्यात सर्वांत मानाचे स्पर्धेचा मानकऱ्याचे पदक घातले गेले. 

चार महिन्यांपूर्वी स्थानिक स्पर्धेत गोलंदाजी टाकताना हसन अलीला मोहंमद अक्रमने बघितले आणि पेशावर संघाच्या सरावात त्याला बोलावले. प्रतिष्ठित फलंदाजांना हसन अलीचा मारा खेळताना त्रास होत होता. मोहंमद अक्रमने योग्य गोलंदाज शोधून काढला होता. त्याने मग पाकिस्तान प्रिमीयर लीगच्या पेशावर संघात हसन अलीला घेतले. त्यानंतर हसन अलीला पाकिस्तान संघाचे दरवाजे उघडले जायला वेळ लागला नाही. 

"माझ्याकरता गेले चार महिने स्वप्नापेक्षा मोठे आहेत. उपरवालेकी और क्रिकेटकी मेहरबानी आहे माझ्यावर बहुतेक. भारतासमोर पहिला सामना खेळताना माझी गोलंदाजी चांगली झाली होती ज्याने माझा विश्‍वास वाढला होता. अंतिम सामन्याचे दडपण काय असते याचा अनुभव मला मिळाला. नेमकी आमची पहिली फलंदाजी आली ज्याने वातावरणाशी जुळवून घ्यायला आणि मन शांत करायला वेळ मिळाला. मोहंमद अमीरने भन्नाट स्पेल टाकून तीन मुख्य फलंदाजांना बाद केल्यावर आम्हांला विजयापासून कोणी रोखू शकणार नव्हते. आम्ही कोणाच्या ध्यानीमनी नसताना सरळ विजेते झालो. कमाल भावना आहेत. आम्ही सर्व देशवासीयांना ईदची भेट दिली आहे'', हसन अली खास "सकाळ'शी बोलताना म्हणाला.

Web Title: Virat Kohli's Remarks After Crushing Loss Resonate Across Pakistan