विराट वन-डेचा कर्णधार होताच युवीचे पुनरागमन

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 जानेवारी 2017

इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी संघ निवड, रैनाला वनडेतून वगळले
मुंबई - दोन वर्षांपूर्वी आयपीएलमधील आपल्या बंगळूर संघात युवराजला सर्वाधिक बोली लावून घेण्याचा हट्ट धरणारा विराट कोहली एकदिवसीय संघाचा कर्णधार होताच युवराजचे पुनरागमन झाले आहे. "युवी' तीन वर्षांनंतर वन डे, तर वर्षानंतर टी-20 संघात परतला आहे. दुसरीकडे धोनीने कर्णधारपद सोडल्यानंतर सुरेश रैनाने वन-डे संघातील स्थान गमावले.

इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी संघ निवड, रैनाला वनडेतून वगळले
मुंबई - दोन वर्षांपूर्वी आयपीएलमधील आपल्या बंगळूर संघात युवराजला सर्वाधिक बोली लावून घेण्याचा हट्ट धरणारा विराट कोहली एकदिवसीय संघाचा कर्णधार होताच युवराजचे पुनरागमन झाले आहे. "युवी' तीन वर्षांनंतर वन डे, तर वर्षानंतर टी-20 संघात परतला आहे. दुसरीकडे धोनीने कर्णधारपद सोडल्यानंतर सुरेश रैनाने वन-डे संघातील स्थान गमावले.

बीसीसीआयचे माजी अध्यक्ष अनुराग ठाकूर आणि सचिव अजय शिर्के यांना सर्वोच्च न्यायालयाने पदावरून दूर केल्यानंतर आणि धोनीने एकदिवसीय संघाचे कर्णधारपद सोडल्यानंतर झालेल्या निवड समितीच्या बैठकीत पहिल्या कर्णधारची छाप असल्याचे दिसून आले. न्यूझीलंडविरुद्ध धोनीच्या नेतृत्वाखाली खेळलेल्या संघात फार बदल झाले नाहीत.

अश्‍विन आणि रवींद्र जडेजा यांचे पुनरागमन अपेक्षित होते; परंतु युवीला प्रदीर्घ कालावधीनंतर पुन्हा खेळण्याची संधी देण्यात आली. तो याअगोदरचा वन-डे सामना 11 डिसेंबर 2013 रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला होता, तर टी-20 विश्‍वकरंडक स्पर्धेत मोहालीतही खेळला होता.
रैनाची न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी निवड झाली होती; परंतु आजारी पडल्यामुळे तो खेळू शकला नव्हता. आता वन-डे संघात युवीला संधी देताना रैनाला वगळण्यात आले; मात्र टी-20साठी रैनाची निवड झाली.

धवन, रहाणेचे पुनरागमन
दुखापतीमुळे इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेतून बाहेर गेलेले शिखर धवन, अजिंक्‍य रहाणे परतले आहेत. या दोघांना टी-20 संघात मात्र स्थान नाही. यंदाच्या मोसमात टी-20 सामन्यांची मालिका किंवा स्पर्धा नसल्यामुळे आम्ही नवोदितांना संधी दिली आहे, असे प्रसाद म्हणाले. या संघात विराट कोहलीच्या आयपीएल संघातील यजुवेंद्र चाहलला अमित मिश्राऐवजी निवडण्यात आले.

सराव सामन्यात धोनी कर्णधार
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतला पहिला सामना पुण्यात 15 जानेवारी होणार आहे. त्याअगोदर मुंबईत 10 आणि 12 जानेवारीला दोन सराव सामने आहेत. त्यातील पहिल्या सामन्यासाठी धोनी कर्णधारपदी असेल. धोनीने नेतृत्व सोडले असले, तरी तो वरिष्ठ खेळाडू आहे. या सामन्यात तो मार्गदर्शकाची भूमिका बजावेल, असे प्रसाद म्हणाले. दुसऱ्या सराव सामन्यात रहाणे कर्णधार असेल.

वन-डे मालिकेसाठी संघ - के. एल. राहुल, शिखर धवन, विराट कोहली (कर्णधार), महेंद्रसिंह धोनी, मनीष पांडे, केदार जाधव, युवराज सिंग, अजिंक्‍य रहाणे, हार्दिक पंड्या, आर. अश्‍विन, रवींद्र जडेजा, अमित मिश्रा, जसप्रित बुमराह, भुवनेश्‍वर कुमार, उमेश यादव.

टी-20 - राहुल, मनदीप सिंग, विराट (कर्णधार), धोनी, युवराज, सुरेश रैना, रिषभ पंत, हार्दिक, अश्‍विन, यजुवेंद्र चाहल, मनीष पांडे, बुमराह, भुवनेश्‍वर आणि आशिष नेहरा.

पहिला सराव सामना - धवन, मनदीप, अंबाती रायडू, युवराज, धोनी (कर्णधार), हार्दिक, संजू सॅमसन, कुलदीप यादव, चाहल, नेहरा, मोहित शर्मा, सिद्धार्थ कौल.

दुसरा सराव सामना - पंत, रहाणे (कर्णधार), रैना, दीपक हुडा, इशान किशन, शेल्टडन जॅकसन, विजय शंकर, शाहबाझ नदीम, परवेझ रसुल, विनय कुमार, प्रदीप संगवान आणि अशोक दिंडा

देशांतर्गत स्पर्धेतील कामगिरीनुसार आम्ही संघात बदल केले आहेत. युवराजने यंदाच्या रणजी स्पर्धेत चांगल्या धावा केल्या आहेत, म्हणून आम्ही त्याची निवड केली.
- एमएसके प्रसाद, निवड समितीचे अध्यक्ष

Web Title: Virat one-day captain after yuvraj singh is back