मालिका विजयासाठी विराटसेना सज्ज

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 फेब्रुवारी 2017

बंगळूरमध्ये आज अखेरचा ट्‌वेंटी-२० सामना; पंचाचीही लागणार कसोटी

बंगळूर - इंग्लंडविरुद्धची कसोटी आणि एकदिवसीय मालिका जिंकल्यानंतर विराटसेना आता ट्‌वेंटी-२० मालिकेचेही लक्ष्य पार करण्यासाठी सज्ज झाली आहे. दुसऱ्या सामन्यातील पंचांच्या चुकीच्या निर्णयाने संतापलेला इंग्लंडचा कर्णधार मॉर्गनही दुसऱ्या बाजूने भारतात एका तरी मालिका विजयाचे स्वप्न बाळगून आहे. दोन्ही कर्णधारांवर दडपण असताना पंचांचीही कसोटी लागणार आहे.

बंगळूरमध्ये आज अखेरचा ट्‌वेंटी-२० सामना; पंचाचीही लागणार कसोटी

बंगळूर - इंग्लंडविरुद्धची कसोटी आणि एकदिवसीय मालिका जिंकल्यानंतर विराटसेना आता ट्‌वेंटी-२० मालिकेचेही लक्ष्य पार करण्यासाठी सज्ज झाली आहे. दुसऱ्या सामन्यातील पंचांच्या चुकीच्या निर्णयाने संतापलेला इंग्लंडचा कर्णधार मॉर्गनही दुसऱ्या बाजूने भारतात एका तरी मालिका विजयाचे स्वप्न बाळगून आहे. दोन्ही कर्णधारांवर दडपण असताना पंचांचीही कसोटी लागणार आहे.

नागपूरमध्ये अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेला सामना भारताने जिंकला आणि तीन सामन्यांच्या मालिकेतील आव्हान कायम ठेवले. त्या सामन्यात भारतीय पंच शमशुद्दीन यांनी ज्यो रूटला बाद देणारा निर्णय इंग्लंडच्या मुळावर आल्याची जाहीर टीका मॉर्गनने केली. आयसीसीकडे तक्रारही करण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे उद्याच्या सामन्यात शमशुद्दीन यांच्या कामगिरीवरही लक्ष असेल.

ट्‌वेंटी-२० हा प्रकार बेभरवशाचा असला तरी कानपूर येथे झालेल्या पहिल्या सामन्यात भारताची कामगिरी खालावली होती. नागपूरमध्येही विजयासाठी अखेरच्या क्षणापर्यंत लढावे लागले होते. नेहरा आणि बुमरा यांनी अखेरच्या दोन षटकांत केलेल्या कल्पक गोलंदाजीमुळे विजय शक्‍य झाला होता. 

कानपूर असो नागपूर भारतीय फलंदाजांनी निराशा केली आहे. विराट कोहली, सुरेश रैना, युवराजसिंग आणि महेंद्रसिंह धोनी असे एकापेक्षा एक धुरंधर फलंदाज असतानाही दोन्ही सामन्यांत भारताला धावांसाठी झगडावे लागले. राहुलने दुसऱ्या सामन्यात अडखडळत्या सुरवातीनंतर सर्वाधिक ७१ धावांची खेळी केल्यानंतरही भारताला दीडशे धावांचा टप्पा गाठता आला नव्हता. रैना, युवराज आणि धोनी यांना नागपूरमध्ये दुहेरी धावसंख्याही पार करता आली नव्हती.

रैना आणि युवराजसाठी उद्याचा सामना महत्त्वाचा आहे. नजीकच्या काळात भारत ट्‌वेंटी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळणार नसल्यामुळे या दोघांना आपला फॉर्म दाखवण्याची ही चांगली संधी आहे. ज्यो रूटला बाद देण्याच्या निर्णयामुळे संतापलेला इंग्लंड कर्णधार त्याचा संघ भारतावर पलटवार करण्यासाठी अधिक आक्रमक खेळ करू शकतो. कागदावर तरी त्यांची फलंदाजी भारतापेक्षा उजवी आहे. जेसन रॉय, रूट, मॉर्गन आणि बटलर यांच्यानंतर इंग्लंडकडे बेन स्ट्रोक, मोईन अली असे अष्टपैलू आहेत; परंतु यांचा सामना करण्यासाठी भारताकडे आशिष नेहरा आणि बुमराह ही अस्त्रे आहेत.

नो बॉलची समस्या
मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये नो बॉल गुन्हा समजला जातो; परंतु भारतीय गोलंदाज बुमरा आणि अमित मिश्रा यांनी अनुक्रमे एकदिवसीय आणि नागपूरमधील ट्‌वेंटी-२० सामन्यांत हा गुन्हा केला होता. त्यांनी विकेट मिळवल्या; परंतु ते नो बॉल ठरले होते. बंगळूरमधील उद्याच्या सामन्यात भारतीय गोलंदाजांची नो बॉलची समस्या सुटेल, अशी आशा असेल. कोहलीने नागपूर सामन्यानंतर या समस्येवर मार्ग काढावा लागेल, असे मत व्यक्त केले होते.

मैदानाची पुनर्रचना
चिन्नास्वामी स्टेडियमच्या मैदानाची पुनर्रचना केल्यानंतर तेथे होणारा उद्याचा पहिला सामना आहे. साडेचार कोटी खर्च करून कर्नाटक क्रिकेट संघटनेने नेक्‍स्ट जनरेशन मैदान तयार केले आहे. मैदानावर साचणाऱ्या पाण्याचा निचरा करण्यासाठी हवेच्या दाबाची ड्रेनेज पद्धत बसवण्यात आली आहे. त्यामुळे सर्वसाधारण ड्रेनेजच्या तुलनेत ३६ पटीच्या वेगात पाण्याचा निचरा होतो. अशी पद्धत जगभरातील प्रसिद्ध मैदान विम्बर्ली (इंग्लंड), न्यू यॉर्क मेटस्‌, बीएमओ फिल्ड (कॅनडा), इतेहाद स्टेडियम (मॅंचेस्टर सिटी) अशा मैदानांवर आहे.

Web Title: viratsena ready for series win