'सबबी सांगणारे आम्ही नाहीत'

वृत्तसंस्था
Thursday, 26 July 2018

खेळपट्टीवर हिरवे गवत होते. हे गवत कापयचे का, असा प्रश्‍न आम्हाला ग्राउंडस्‌मनने विचारला; परंतु आम्ही अजिबात हिरवे गवत कापायचे नाही, असे सांगितले. जी खेळपट्टी आम्हाला देण्यात येईल त्यावर खेळण्याची आमची तयारी आहे. त्यामुळे जेव्हा तुमचा संघ आमच्या देशात येईल तेव्हा ते त्यांना कशी खेळपट्टी हवी याची मागणी करणार नाही. - रवी शास्त्री, भारताचे मुख्य प्रशिक्षक 

चेल्म्सफोर्ड - तक्रारींचा पाढा वाचत नाही आणि तयार करण्यात येणाऱ्या आव्हानात्मक परिस्थितीच्या सबबी पुढे करत नाही. या टीम इंडियाची बातच न्यारी आहे, असे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी ठणकावून सांगितले. एकीकडे इसेक्‍सविरुद्धच्या सराव सामन्यासाठी खराब मैदान आणि खेळपट्टी तयार करणाऱ्या इंग्लंडला शास्त्री यांच्या टीमने झुकवले आणि दुसरीकडे ठणकावूनही सांगितले. 

इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी विराट सेनेला चांगला सराव करता येऊ नये म्हणून एकमेव सराव सामन्यासाठी असलेले मैदान निकृष्ट दर्जाचे असल्याने भारतीय संघ व्यवस्थापन नाराज असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. आम्ही सबबी देत नाही, असे रवी शास्त्री यांनी आपल्या स्टाइलमध्ये उत्तर दिले. 

आमचा हा संघ जेथे जेथे खेळतो तेथे तेथे आम्ही परिस्थिती आणि खेळपट्टी यांच्या सबबी देत नाही. प्रतिस्पर्ध्यांना हरविणे हेच आमचे ध्येय असते. परदेशातही जिंकणारा संघ असा आम्हाला ठसा उमटवायचा आहे, असे रोखठोक मत व्यक्त करणाऱ्या शास्त्री यांनी इसेक्‍सचे मैदान खडकाळ आणि मध्येच हिरवळ असल्याचे स्पष्ट केले. 

उष्ण हवामान आणि मैदानाची अवस्था याचा विचार करून हा चार दिवसांचा सामना तीन दिवसांचा करण्यात आला असला तरी रवी शास्त्री यांनी याचे खुबीने उत्तर दिले. ""जर आम्ही येथे चार दिवस खेळलो असतो तर आमचा एक दिवस प्रवासात वाया गेला असता. परदेश दौऱ्यातील सराव सामना दोन, तीन किंवा चार दिवसांचा खेळायचा हे ठरवण्याचा अधिकार पाहुण्या संघाचा असतो.'' 

या सराव सामन्यासाठी सराव करत असताना हा सामना तीन दिवसांचाच करण्याचा विचार आम्ही मंगळवारी केला. इसेक्‍स संघाच्या प्रशासनाशी आम्ही चर्चा केली. प्रत्येक दिवसाची ते तिकीट विक्री करणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे सामन्याचा एक दिवस कमी करण्यात आम्हाला अडचण आली नाही. खरे तर हा सामना दोन दिवसांचाच करून सरावासाठी आणखी एका दिवसाचा उपयोग करण्याचाही आमचा विचार होता, असे शास्त्री यांनी स्पष्ट केले. 

खेळपट्टीवर हिरवे गवत होते. हे गवत कापयचे का, असा प्रश्‍न आम्हाला ग्राउंडस्‌मनने विचारला; परंतु आम्ही अजिबात हिरवे गवत कापायचे नाही, असे सांगितले. जी खेळपट्टी आम्हाला देण्यात येईल त्यावर खेळण्याची आमची तयारी आहे. त्यामुळे जेव्हा तुमचा संघ आमच्या देशात येईल तेव्हा ते त्यांना कशी खेळपट्टी हवी याची मागणी करणार नाही. - रवी शास्त्री, भारताचे मुख्य प्रशिक्षक 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: We are not complaint everyone says ravi shastri