चॅम्पियन ब्राव्होची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

वृत्तसंस्था
Thursday, 25 October 2018

वेस्ट इंडीजचा अष्टपैलू क्रिकेटपटू ड्वेन ब्राव्होने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, त्याने जगभरातील ट्वेंटी-20 लीगमध्ये खेळणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

बार्बाडोस : वेस्ट इंडीजचा अष्टपैलू क्रिकेटपटू ड्वेन ब्राव्होने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, त्याने जगभरातील ट्वेंटी-20 लीगमध्ये खेळणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

35 वर्षीय ब्राव्होने 2004 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याने 40 कसोटी, 164 एकदिवसीय आणि 66 ट्वेंटी-20 सामन्यांमध्ये वेस्ट इंडीजचे प्रतिनिधित्व केले होते. गेल्या दोन वर्षांपासून तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. त्याने सप्टेंबर 2016 मध्ये पाकिस्तानविरुद्ध अखेरचा आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20 सामना खेळला होता. विंडीज मंडळाबरोबर झालेल्या वादानंतर त्याने विंडीजकडून न खेळण्याचा निर्णय घेतला होता आणि तो लीग स्पर्धांमध्ये खेळत आहे.

ब्राव्होने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे, की आज मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. क्रिकेटच्या तिन्ही प्रकारातून मी बाहेर पडत आहे. जुलै 2004 मध्ये इंग्लंडविरुद्ध लॉर्डस क्रिकेट मैदानावर पदार्पणावेळी स्वीकारलेली टोपी स्वीकारतानाचा क्षण आजही मला आठवतो. माझ्या कारकिर्दीबद्दल मी समाधानी आहे. क्रिकेटमधील योगदानाबद्दल मी आनंदी आहे.

ब्राव्होने 2010 मध्ये अखेरचा कसोटी सामना खेळला होता. त्यानंतर तो टी-20 स्पेशालिस्ट म्हणून ओळखला जाऊ लागला. त्याने भारत, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान आणि स्थानिक टी-20 लीगमध्ये सहभाग घेतला आणि अष्टपैलू खेळाचे प्रदर्शन केले. आता ब्राव्होची हीच ओळख झाली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: West Indies all rounder Dwayne Bravo retires from international cricket