सहा वर्षांनी विंडीजचा तोफखाना बरसला 

वृत्तसंस्था
शनिवार, 6 मे 2017

सांघिक कामगिरीचे यश असले तरी, दुसऱ्या डावात शई होपने धोकादायक खेळपट्टीवर केलेली फलंदाजी महत्त्वाची होती. 170 पेक्षा अधिक धावांचे लक्ष्य ठेवण्यात यशस्वी झालो, तेव्हाच आशा पल्लवित झाल्या. त्यानंतर आमच्या गोलंदाजांनी आव्हानाचा यशस्वी बचाव केला. 
- जेसन होल्डर, विंडीजचा कर्णधार 

बार्बाडोस : वेस्ट इंडीजची वेगवान गोलंदाजी खेळायची म्हटली की अनेकांच्या पोटात गोळाच यायचा. त्यांची ओळखच तशी होती. 'तोफखाना' असेच त्यांच्या गोलंदाजीबाबत बोलले जायचे; पण अलीकडे हा तोफखाना थंडावला होता. मात्र, येथे सुरू असलेल्या कसोटी सामन्याच्या मालिकेतील दुसऱ्या कसोटीत विंडीजच्या वेगवान गोलंदाजांनीच पाकिस्तानचा धुव्वा उडवला, तेव्हा सहा वर्षांपूर्वीच्या त्या तोफखान्याची आठवण झाली. 

विजयासाठी 188 धावांचे आव्हान पाकिस्तानला कठीण नव्हते. विंडीजचे गोलंदाजही तसे अनोळखी होते. मात्र, शॅनन गॅब्रिएल आणि जेसन होल्डर यांनी जाणकारांना तोंडात बोटे घालायला लावली. अवघ्या 34 षटकांत त्यांनी पाकिस्तानचा दुसरा डाव केवळ 81 धावांत गुंडाळला. दुसरी कसोटी 108 धावांनी जिंकून त्यांनी मालिकेत बरोबरी साधली. 
एखाद्या कसोटीत चौथ्या डावात प्रतिस्पर्ध्यांचे दहाही फलंदाज वेगवान गोलंदाजांनी टिपण्याची कामगिरी विंडीजने सहा वर्षांनी केली. यापूर्वी 2011 मध्ये प्रोव्हिडन्स येथील सामन्यात त्यांनी पाकिस्तानविरुद्धच अशी कामगिरी केली होती. विशेष म्हणजे क्रिकेट विश्‍वात दहा वर्षांत प्रथमच पाचव्या दिवशी वेगवान गोलंदाजांनी प्रतिस्पर्ध्यांचा पूर्ण डाव गुंडाळला आहे. 

पहिल्या डावात 4 बाद 316 अशा भक्कम स्थितीतून आम्ही नंतर केवळ 81 धावांच करूच शकलो. हाच फरक पराभवासाठी कारणीभूत आहे. अर्थात, विंडीजच्या गोलंदाजांचे श्रेय हिरावून घ्यायचे नाही. अचूक दिशा आणि टप्पा काय असतो, याचे मूर्तिमंत उदाहरण त्यांनी ठेवले. 
- मिस्बा उल हक, पाकिस्तानचा कर्णधार 

निष्प्रभ पाकिस्तान 

  • विंडीजविरुद्ध पाकिस्तानची दुसरी निचांकी धावसंख्या. यापूर्वी 1986-87 मध्ये 77. पाकिस्तानची एकूण दहावी निचांकी धावसंख्या 
  • दोन वर्षांनी पहिल्या डावातील पिछाडीनंतर विंडीजचा कसोटी विजय. 2015 मध्ये ब्रिजटाउन कसोटीत इंग्लंडविरुद्ध. पहिल्या डावातील पिछाडीनंतर विजय मिळविण्याची विंडीजची विसावी वेळ 
  • पहिल्या डावात 99 आणि दुसऱ्या डावात शून्यावर बाद होणारा मिस्बा क्रिकेट विश्‍वातील तिसरा फलंदाज. यापूर्वी असा दुर्दैवी विक्रम पाकिस्तानच्याच मुश्‍ताक महंमदचा इंग्लंडविरुद्ध 1972-73 आणि पंकज रॉय यांचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध 1959-60 मध्ये.
Web Title: West Indies beat Pakistan in second test