World Cup 2019 : अफगाणिस्तानची पाटी कोरीच; विंडीज 23 धावांनी विजयी 

वृत्तसंस्था
Friday, 5 July 2019

विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत अफगाणिस्तानची पाटी अखेर कोरीच राहिली. अखेरच्या साखळी सामन्यात वेस्ट इंडीजने त्यांचा 23 धावांनी पराभव करून स्वतःचा दुसरा विजय मिळवला. अखेरचा विश्‍वकरंडक सामना खेळत असलेला ख्रिस गेल फलंदाजीत अपयशी ठरला असला तरी गोलंदाजीत मात्र त्याने एक विकेट मिळवली. 

वर्ल्ड कप 2019 : लीडस्‌ :  विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत अफगाणिस्तानची पाटी अखेर कोरीच राहिली. अखेरच्या साखळी सामन्यात वेस्ट इंडीजने त्यांचा 23 धावांनी पराभव करून स्वतःचा दुसरा विजय मिळवला. अखेरचा विश्‍वकरंडक सामना खेळत असलेला ख्रिस गेल फलंदाजीत अपयशी ठरला असला तरी गोलंदाजीत मात्र त्याने एक विकेट मिळवली. 

प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडीजने 6 बाद 311 धावा उभारल्या. पहिल्या विजयाच्या शोधात असलेल्या अफगाणिस्तानने या आव्हानाचा सुरुवातीला जोरदार पाठलाग केला. 2 बाद 189 अशी प्रगतीही केली होती, पण सातत्य राखता आले नाही आणि त्यांचा डाव 288 धावांत संपुष्टात आला. 

सर्वाधिक 86 धावांची खेळी करणाऱ्या इकराम अलिखिलने रेहमत शहासह दुसऱ्या विकेटसाठी 133 आणि झदरानसह तिसऱ्या विकेटसाठी 51 धावांची भागीदारी केली तेव्हा सामन्यातील चुरस कायम होती, पण गेलने कमाल केली प्रथम त्याने अलिखिलची विकेट मिळवली त्याच षटकात झदरान धावचीत झाला आणि सामन्याला कलाटणी मिळाली. 

तत्पर्वी, अखेरचा विश्‍वकरंडक सामना खेळत असल्याने "युनिव्हर्सल बॉस' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ख्रिस गेलच्या फलंदाजीची उत्सुकता होती. सहकाऱ्यांच्या शुभेच्छा स्वीकारत तो मैदानात उतरला. एरवी तुफानी टोलेबाजी करणाऱ्या गेलला गुरुवारी (ता. 4) 18 चेंडूंत एका षटकारासह केवळ सातच धावा करता आल्या. 
गेल अपयशी ठरला तरी एविन लुईस, शाय होप, निकोलस पूरन यांनी अर्धशतके केली; तर हेटमायर व जेसन होल्डर यांनीही आक्रमक फलंदाजी केली.

स्पर्धेतल्या पहिल्या एकमेव विजयाच्या शोधात असलेल्या अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी सुरुवातीला चांगला मारा केला; परंतु सुमार क्षेत्ररक्षणाने त्यांच्या प्रयत्नांवर पाणी फेरले. अर्धशतके करणाऱ्या होप व पूरन यांचे सोपे झेल सोडण्यात आले. झेल सोडूनही विंडीजला 300 धावांच्या आत रोखण्याची संधी अफगाणिस्तानला मिळाली होती; परंतु अंतिम 10 षटकांत विंडीजने तब्बल 111 धावा कुटल्या. अखेरचे चार चेंडू शिल्लक असताना फलंदाजीस आलेल्या ब्राथवेटने एक षटकार व दोन चौकार मारून संघाला 300 धावांचा टप्पा पार करून दिला. 

संक्षिप्त धावफलक ः वेस्ट इंडीज ः 50 षटकांत 6 बाद 311 (ख्रिस गेल 7, एविन लुईस 58- 78 चेंडू, 6 चौकार, 2 षटकार, शाय होप 77- 92 चेंडू, 6 चौकार, 2 षटकार, हेटमायर 39- 31 चेंडू, 3 चौकार, 2 षटकार, निकोलस पूरन 58- 43 चेंडू, 6 चौकार, 1 षटकार, जेसन होल्डर 45- 34 चेंडू, 1 चौकार, 4 षटकार; दवलत झदरान 9-1-73-2, महम्मद नबी 10-0-56-1, रशीद खान 10-0-52-1) वि. वि. अफगाणिस्तान 50 षटकांत सर्वबाद 288 ः (रेहमत शहा 62, इकराम अलिखिल 86 -93 चेंडू, 8 चौकार, अशगर अफगाण 40 -32 चेडू, 4 चौकार, 1 षटकार, केमार रोच 10-0-37-3, ब्राथवेट 9-0-63-4 ख्रिस गेल 6-0-28-1)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: West Indies wins against afghanisfan by 23 runs in world cup 2019