राजकोटमध्ये कोण करणार ‘राज’?

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 नोव्हेंबर 2016

भारत-इंग्लंड पहिली कसोटी आजपासून; डीआरएसचीही उत्सुकता
राजकोट - कसोटी पदार्पण करणाऱ्या राजकोटच्या मैदानावर उद्यापासून भारत-इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या मालिकेतला पहिला कसोटी क्रिकेट सामना सुरू होत आहे. सलग दोन मालिका जिंकून कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या भारताला या मालिकेत हे अव्वल स्थान कायम ठेवण्याचेही आव्हान असणार आहे. त्याचबरोबर चार वर्षांपूर्वी मायदेशात गमावलेल्या कसोटी मालिकेतील अपयशाचीही परतफेड विराट कोहलीच्या संघाला करावी लागणार आहे. या मालिकेद्वारे भारतात प्रथमच डीआरएस प्रणालीचा वापर होणार आहे. त्यामुळे त्याचीही उत्सुकता आहे.

पाच वर्षांत भारताला इंग्लंडविरुद्ध भारतात किंवा इंग्लंडमध्ये मालिका जिंकण्यात अपयश आले आहे. २०११ मध्ये तर धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने कसोटी क्रमवारीतील अव्वल स्थानही गमावले होते. २०१२ मध्ये भारतातील मालिकेत पहिला सामना जिंकल्यानंतर मालिका गमावण्याची वेळ भारतावर आली होती. या पार्श्‍वभूमीवर उद्यापासून सुरू होणारी पाच सामन्यांची मालिका ‘विराट सेने’चे कौशल्य पणास लावणारी ठरणार आहे.
इंग्लंडचा कर्णधार ॲलिस्टर कूक आणि त्याचा संघही सावध आहे. गतवेळची मालिका जिंकलेली असली तरी या वेळी त्या कामगिरीची पुनरावृत्ती करणे सोपे जाणार नाही, याचीही त्यांना जाणीव आहे तसेच गतवेळेस माँटी पानेसर व स्वान यांनी भारतभूमीवर भारतीय फिरकी गोलंदाजांपेक्षा सरस कामगिरी केली होती; परंतु ते दोन्ही फिरकी गोलंदाज आता संघात नाहीत. फिरकीस साथ देणारी खेळपट्टी मिळाली, तर मोईन खान हाच त्यांच्याकडे अनुभवी फिरकी गोलंदाज आहे.

भारतासाठी आर. अश्‍विन व रवींद्र जडेजा ही हुकमी अस्त्रे ठरणार आहेत. न्यूझीलंडविरुद्ध नुकत्याच झालेल्या मालिकेत अश्‍विनने फिरकीची जादू दाखवली होती. याच कामगिरीची पुनरावृत्ती अश्‍विनने केली, तर भारताला वर्चस्व राखणे जड जाणार नाही आणि जडेजासाठी तर हे घरचेच मैदान आहे. त्यामुळे तो अधिक आत्मविश्‍वासाने गोलंदाजी करू शकेल.

न्यूझीलंडच्या तुलनेत इंग्लंडची गोलंदाजी अधिक उजवी आहे. स्टुअर्ट ब्रॉडचा हा शंभरावा कसोटी सामना आहे; त्यामुळे अनुभवात ते पुढे आहेत. शिखर धवनसह रोहित शर्माच्या अनुपस्थितीमुळे फलंदाजीत कर्णधार विराट व उपकर्णधार रहाणे यांच्यावरची जबाबदारी अधिक वाढत आहे; परंतु त्यांच्या साथीला गौतम गंभीरसारखा अनुभवी फलंदाजही आहे. न्यूझीलंडविरुद्ध त्याने पुनरागमन केले असले तरी संघातले स्थान भक्कम करण्याची ही त्याच्यासाठी सुवर्णसंधी असेल.

नायर की पंड्या?  
रोहितच्या रिकाम्या झालेल्या जागेवर करुण नायर या फलंदाजाला की हार्दिक पंड्या या अष्टपैलू खेळाडूला खेळवायचे, हा प्रश्‍न संघ प्रशासनाला सोडवायचा आहे. पंड्याला संधी देऊन फलंदाजी आणि गोलंदाजीतला समतोल साधण्याचा प्रयत्न असेल. त्यामुळे तीन फिरकी गोलंदाज खेळवण्याचा पर्याय भारतासमोर खुला राहील.

खेळपट्टी फिरकीस साथ देणारी?
राजकोटमध्ये प्रथमच कसोटी सामना होत असल्याने अंदाज बांधणे कठीण आहे; परंतु येथे झालेल्या सर्व प्रथम श्रेणी सामन्यांत फिरकी गोलंदाजांचे वर्चस्व राहिलेले आहे. गेल्या १६ सामन्यांत २० गोलंदाजांनी एकाच डावात पाच बळी मिळवण्याची कामगिरी केलेली आहे. येथे खेळलेल्या अखेरच्या प्रथमश्रेणी सामन्यात ३९ विकेट फिरकी गोलंदाजांनी मिळवले होते, यातील १३ बळी जडेजाने बाद केलेले आहेत. खेळपट्टीवर काही भेगा दिसत असल्या तरी काही ठिकाणी हिरवे गवतही आहे.

Web Title: who will rajkot test match?