इंग्लंड-भारत लढतीने सुरवात

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 मार्च 2017

महिला विश्‍वकरंडक स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर
लंडन - या वर्षी जून महिन्यात होणाऱ्या महिला विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत यजमान इंग्लंड आणि भारत यांच्यात सलामीची लढत 24 जून रोजी होणार आहे. या स्पर्धेचे वेळापत्रक बुधवारी जाहीर करण्यात आले.

महिला विश्‍वकरंडक स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर
लंडन - या वर्षी जून महिन्यात होणाऱ्या महिला विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत यजमान इंग्लंड आणि भारत यांच्यात सलामीची लढत 24 जून रोजी होणार आहे. या स्पर्धेचे वेळापत्रक बुधवारी जाहीर करण्यात आले.

महिला विश्‍वकरंडक स्पर्धेत ऑस्ट्रेलिया गतविजेते असून, त्यांची सलामीची लढत 26 जून रोजी टी- 20 विश्‍वविजेत्या वेस्ट इंडीज संघाशी होईल. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी न्यूझीलंड आणि श्रीलंका या संघातही सामना होईल. या स्पर्धेसाठी भारत, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका संघांनी अलीकडेच झालेल्या पात्रता फेरीतून मुख्य स्पर्धेत प्रवेश मिळविला आहे. एकूण आठ संघ सहभागी होणार आहेत.

भारताच्या पाकिस्तानविरुद्धच्या लढतीसह एकंदर चार लढती डर्बीत होतील. त्याचबरोबर भारताचे सामने टॉंटन (वेस्ट इंडीज), ब्रिस्टॉल (ऑस्ट्रेलिया) आणि लिस्टर (दक्षिण आफ्रिका) येथे होतील. पाकच्या सातपैकी पाच लढती लिस्टरला होतील. ते त्यांचे होम ग्राऊंड मानण्यात येईल, पण त्यांची भारताविरुद्धची लढत तिथे होणार नाही.

एक महिना कालावधी
महिनाभर चालणाऱ्या या स्पर्धेतील सामना राउंड रॉबिन पद्धतीने खेळविण्यात येणार आहेत. त्यानंतर उपांत्य फेरीच्या लढती ब्रिस्टॉल आणि डर्बीशायर येथे खेळविण्यात येतील. अंतिम सामना 23 जुलैस लॉर्डस येथे होईल. महिला विश्‍वकरंडक स्पर्धेची अंतिम लढत 1993 नंतर प्रथमच लॉर्डसवर खेळविण्यात येणार आहे. या कालावधीत दोन रविवार येणार असून, त्या वेळी सहभागी आठही संघ सहभागी असतील. यातील ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड आणि भारत-पाकिस्तान या शेजारील देशांमधील सामने लक्षवेधक ठरतील.

तिकीट विक्रीस प्रारंभ
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आजपासूनच या स्पर्धेच्या तिकीट विक्रीस सुरवात करण्यात आली. तिकीट विक्रीस चांगला प्रतिसाद मिळेल अशी आशा व्यक्त करताना "आयसीसी'चे मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्हिड रिचर्डसन यांनी अंतिम सामन्याची यापूर्वीच 9 हजार तिकिटे विकली गेल्याची माहिती या वेळी दिली.

स्पर्धेतील भारताचे सामने
24 जून - वि. इंग्लंड
29 जून - वि. वेस्ट इंडीज
2 जुलै - वि. पाकिस्तान
5 जुलै - वि. श्रीलंका
8 जुलै - वि. दक्षिण आफ्रिका
12 जुलै - वि. ऑस्ट्रेलिया
15 जुलै - वि. न्यूझीलंड
उपांत्य फेरी - 18 आणि 20 जुलै
अंतिम लढत - 23 जुलै

Web Title: women worldcup competition time table declare