इंग्लंडच्या महिलांचा ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये विश्वविक्रम

वृत्तसंस्था
Thursday, 21 June 2018

''आम्ही किवी मुलींना जुना विक्रम मोडताना पाहिले. तेव्हा सामन्यापूर्वी कोच रॉबिनसन यांनी आम्हाला विक्रम मोडण्याचा प्रयत्न न करण्याचे सुचविले. मात्र काही मुलींना यात आव्हान वाटले.''

लंडन : इंग्लंडच्या महिला क्रिकेटपटूंनी ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये तब्बल 250 धावा करत महिला क्रिकेटमधील विश्वविक्रम नोंदविला. इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ट्वेंटी-20 सामन्यात 20 षटकात 250 धावा करत दक्षिण आफ्रिकेचा 121 धावांनी पराभव केला.

इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड महिला संघांमध्ये सुरु असलेल्या तिरंगी मालिकेत बुधवारी (ता.20) इंग्लंडने हा विश्वविक्रम नोंदविला. न्यूझीलंडच्या संघानेही बुधवारीच 216 धावा करत सर्वाधिक धावांचा विक्रम केला होता. मात्र, काही वेळातच इंग्लंडच्या संघाने 250 धावा करत हा विक्रम मोडीत काढला.

या तिरंगी मालिकेत प्रत्येक संघाला एकाच दिवशी दोन सामने खेळावे लागणार आहेत. (डबल हेडर) या पद्धतीनुसार दक्षिण आफ्रिकेने बुधवारी दोन सामने खेळले. त्या दोन्ही सामन्यात न्यूझीलंड आणि इंग्लंडने अनुक्रमे सर्वाधिक धावांचा विश्वविक्रम दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध केला. 

न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात झालेल्या पहिल्या सामन्यात न्युझीलंडच्या महिलांनी 20 षटकांत 216 धावा केल्या. मात्र हा विक्रम जास्त वेळ टिकून न राहता त्याच दिवशी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या दुसऱ्या सामन्यात इंग्लंडने 250 धावा करत नवा विश्वविक्रम रचला. टॅमी बेमाँट आणि डॅनी वॅट या दोघींनी पहिल्या विकेटसाठी 147 धावांची भागीदारी केली, त्यात बेमॉंटने 116 तर वॅटने 56 धावांचे योगदान दिले. 

आम्ही किवी मुलींना जुना विक्रम मोडताना पाहिले. तेव्हा सामन्यापूर्वी कोच रॉबिनसन यांनी आम्हाला विक्रम मोडण्याचा प्रयत्न न करण्याचे सुचविले. मात्र काही मुलींना यात आव्हान वाटले. एकाच दिवसात दक्षिण आफ्रिकेला आपल्या विरुद्ध दोन विश्वविक्रम पाहावे लागले याबद्दल मला त्यांचे वाईट वाटते परंतू टी20 स्पर्धा याच स्वरुपाची असते, असे सलामीवीर टॅमी बेमाँटने सांगितले.

त्यापूर्वी न्युझीलंडची कर्णधार सुझी बेट्सने 66 चेंडूमध्ये 124, तर सोफी डेव्हिन हीने 73 धावा करत पहिल्या विकेटसाठी 182 धावांची भागीदारी नोंदविली होती. न्युझीलंडने ऑस्ट्रेलियाचा मार्चमधील 209 धावांचा विक्रम मोडला होता. त्यानंतर लगेच इंग्लंडने न्यूझीलंडचा विक्रम मोडला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Women's England team set world record of 250 for 3