प्रदर्शनीय लढतीसाठी महिला सज्ज 

वृत्तसंस्था
Tuesday, 22 May 2018


आयपीएलमध्ये आज ट्रेलब्लेझर्स-सुपरनोव्हाजमध्ये सामना 

मुंबई - आयपीएलला सुरवात झाल्यापासून अनेक नवे अध्याय क्रिकेटमध्ये जोडले गेले. आता उद्या होणाऱ्या महिलांच्या प्रदर्शनीय सामन्याने यामध्ये नवा अध्याय जोडला जाईल. 

ट्रेलब्लेझर्स आणि सुपरनोव्हाज या दोन संघांत हा सामना होणार असून, अनुक्रमे स्मृती मानधना आणि हरमनप्रीत कौर या भारतीय खेळाडू संघाचे नेतृत्व करणार आहेत. देशात महिलांच्या "आयपीएल'ला सुरवात करण्याच्या उद्देशाने हे उचललेले पहिले पाऊल असेल, असे मानले जात आहे. 

या सामन्यातून सुझी बेट्‌स, ऍलिसा हिली, बेथ मुनी, एलिसे पेरी, मेगन शट, डॅनियल विट अशा आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा खेळ बघायला मिळणार आहे. चेन्नई सुपर किंग्ज वि. सनरायझर्स हैदराबाद या पहिल्या क्वालिफायर सामन्यापूर्वी ही महिला लढत खेळविली जाणार आहे. 

महिला क्रिकेटचा प्रसार आणि खेळाडूंची उपलब्धता लक्षात घेता महिलांची "आयपीएल' आठ संघात होण्यात अडचण असेल, असे मत मानधना हिने व्यक्त केले. ती म्हणाली, ""महिला क्रिकेटचा प्रसार अजून म्हणावा तेवढा झालेला नाही. महिला क्रिकेटपटूदेखील थोड्याच आहेत. त्यामुळे आठपेक्षा चार किंवा पाच संघांत महिलांची "आयपीएल' होऊ शकेल. अर्थात, भविष्यात ही संख्या वाढण्यासाठी "आयपीएल'चा वाटा मोठा असेल.'' 

मानधनाच्या चार संघांच्या "आयपीएल'चा मुद्दा धरून हरमनप्रीत म्हणाली, ""चार संघ होतील इतक्‍या महिला खेळाडू भारतात नक्कीच आहेत. आता 20 खेळाडू भारताचे प्रतिनिधित्व करतात. क्रिकेटमध्ये संधी शोधणाऱ्या 30 ते 35 मुली आपल्याकडे तयार आहेत. आता उद्याच्या सामन्याला कसा प्रतिसाद मिळतो, यावर बरेच काही अवलंबून आहे.'' 

संघ - ट्रेलब्लेझर्स  - स्मृती मानधना (कर्णधार), ऍलिसा हिली (यष्टिरक्षक), सुझी बेट्‌स, दीप्ती शर्मा, बेथ मुनी, जेमिमा रॉड्रिग्ज, डॅनियल हेझल, शिखा पांडे, ली ताहूहू, झूलन गोस्वामी, एकता बिश्‍त, पूनम यादव, दयालन हेमलता 

सुपरनोव्हाज - हरमनप्रीत कौर (कर्णधार), डॅनियल विट, मिताली राज, मेग लॅनिंग, सोफी डिव्हाईन, एलिसे पेरी, वेदा कृष्णमूर्ती, मोना मेश्राम, पूजा वस्त्रकार, मेगन शट, राजेश्‍वरी गायकवाड, अनुजा पाटील, तानिया भाटिया (यष्टिरक्षक) 

आम्ही सर्वच महिला खेळाडू या सामन्यासाठी उत्सुक आहोत. आयपीएलमध्ये या सामन्याचे आयोजन केल्याने "बीसीसीआय'चे आभारी आहोत. सर्वच खेळाडू चांगली कामगिरी करून चाहत्यांचे मनोरंजन करतील. त्याच वेळी "बीसीसीआय' भविष्यात महिला आयपीएलचा विचार मार्गी लावतील, अशी आशा आहे.  -स्मृती मानधना 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: womens Ready for practice match