World Cup 2019 : विश्‍वकरंडकावर पावसाचे गडद सावट; भारत-न्यूझीलंड सामनाही रद्द

सुनंदन लेले
Thursday, 13 June 2019

विश्‍वकरंडक स्पर्धेवरील पावसाचे संकट गडद होऊ लागले आहे. भारत-न्यूझीलंड दरम्यान गुरुवारी होणारा सामनाही नाणेफेक न होताच रद्द करावा लागला. यामुळे दोन्ही संघांना एकेक गुण देण्यात आला. 

वर्ल्ड कप 2019 : नॉटिंगहॅम : विश्‍वकरंडक स्पर्धेवरील पावसाचे संकट गडद होऊ लागले आहे. भारत-न्यूझीलंड दरम्यान गुरुवारी होणारा सामनाही नाणेफेक न होताच रद्द करावा लागला. यामुळे दोन्ही संघांना एकेक गुण देण्यात आला. 

साखळी सामन्याच्या दिवशी राखीव दिवस न ठेवण्यावरून "आयसीसी'वर टिकेची झोड उठत असतानाच आज आणखी एक सामना रद्द झाला. यंदाच्या स्पर्धेत अशा पद्धतीने रद्द करावा लागलेला हा तिसरा सामना ठरला. एका विश्‍वकरंडक स्पर्धेत नाणेफेक न होता इतके सामने रद्द होण्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे. एकेक गुणाच्या विभागणीमुळे न्यूझीलंडचे आघाडीचे स्थान कायम राहिले, तर भारतीय संघ इंग्लंडला मागे टाकून तिसऱ्या स्थानावर आला आहे. 

नॉटिंगहॅम येथे गेले दोन दिवस पाऊस पडत होता. आजही त्याने ठराविक अंतराने हजेरी लावली. पंचांनी भारतीय प्रमाणवेळे नुसार संध्याकाळी 7.30 वाजता मैदानाची पहाणी केली. पण, त्यानंतर पुन्हा पावसाने हजेरी लावली. बाह्य मैदानही खेळण्यायोग्य नव्हते. त्यामुळे अखेरीस सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. 

पण, त्यांचे काय ?
सामन्यात एकही चेंडू खेळला गेला नाही, तर आयसीसी तिकिट धारकांना त्यांचे सगळे पैसे परत करते. पण, भारताच्या ज्या चाहत्यांनी तिसऱ्या व्यक्तीकडून अधिक रकम देऊ करून तिकिटे खरेदी केले त्यांचे काय ? त्यांना मोठा तोटा सहन करावा लागणार आहे. त्यांना त्यांचे पैसे परत मिळणार नाही. या सामन्यासाठी अनेक भारतीय चाहते स्कॉटलंड, आयर्लंडपासून ते अगदी मलेशिया, सिंगापूर, भारतातून येथे आले होते. त्यांच्या पदरी निराशाच पडली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: World Cup 2019 IND vs NZ match washed away due to rain