World Cup 2019 : मोठी धावसंख्या उभारण्यात भारताला अपयश

सुनंदन लेले
Thursday, 27 June 2019

भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना विराट कोहलीच्या 72 धावा आणि तळात धोनी (56 धावा) -पंड्याने (46 धावा) केलेल्या भागीदारीमुळे धावसंख्येला थोडा आकार आला.

वर्ल्ड कप 2019 : मँचेस्टर : ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर वेस्ट इंडियन गोलंदाजांचा कडवा प्रतिकार मोडून काढत भारतीय फलंदाजांनी कष्टाने 7 बाद 268 धावांचा फलक उभारला. भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना विराट कोहलीच्या 72 धावा आणि तळात धोनी (56 धावा) -पंड्याने (46 धावा) केलेल्या भागीदारीमुळे धावसंख्येला थोडा आकार आला. थोडी मदत करणार्‍या खेळपट्टीवर विंडीज गोलंदाजांनी टप्पा आणि दिशेवर नियंत्रण ठेवत मारा केला, ज्याने खूप मोठा धावफलक उभारणे शक्य झाले नाही. सलग दुसर्‍या सामन्यात विजय मिळवण्याकरता भारतीय गोलंदाजांना प्रभावी मारा करावा लागणार आहे.

नाणेफेकीचा कौल परत एकदा विराट कोहलीच्या बाजूने लागला. संघात एकही बदल न करता कोहलीने फलंदाजीचा निर्णय घेतला. विंडीज संघात दोन नवीन खेळाडूंना संधी दिली गेली. चांगली सुरुवात करणार्‍या रोहित शर्माला मैदानावरील पंचांनी नाबाद ठरवले असताना तिसर्‍या पंचांनी अत्यंत घाईने झेलबाद ठरवले, तो निर्णय कोणालाच पटला नाही. चेंडूने बॅटची कड घेतली नव्हती, हे टीव्ही रिप्लेमध्ये दिसत असून पंचांनी घेतलेल्या निर्णयाला क्रिकेटच्या भाषेत ‘पंचांनी राखी बांधली’ म्हणतात. 

लोकेश राहुलने आश्वासक फलंदाजी केली. विराट कोहलीबरोबर राहुलने 69 धावांची भागीदारी रचली. अर्धशतकाच्या उंबरठ्यावर असलेल्या राहुलने जम बसलेला असताना पाय न हलवता खेळायचा केलेला प्रयत्न वाईट ठरला. मधल्या फळीत भारतीय फलंदाजी गडबडताना परत एकदा दिसली. विजय शंकरला निवड समितीने चौथ्या क्रमांकाचा फलंदाज म्हणून निवडले असले तरी तो त्या ताकदीचा फलंदाज दिसत नाहीये. विजय शंकर आणि केदार जाधव जास्त छाप न पाडता बाद झाले. केमार रोशला दोघेही विकेट किपरकडे झेल देऊन बाद झाले. चांगली गोष्ट इतकीच होती की एव्हाना विराट कोहली अर्धशतक करून स्थिरावला होता.

अवघ्या 8 धावांवर महेंद्र सिंह धोनीला मोठे जीवदान लाभले. अ‍ॅलनच्या फिरकीला पुढे येऊन खेळताना धोनी साफ चकला असताना विकेट किपर शेय होपने यष्टिचीत करायची अत्यंत सोपी संधी गमावली. जम बसलेल्या कोहलीवर भारतीय संघाच्या आशा विसंबल्या होत्या. जेसन होल्डरच्या जास्त डंख नसलेल्या आखूड टप्प्याच्या चेंडूवर कोहलीने ब्राव्होकडे सोपा झेल दिला तो धक्का मोठा होता. 40 षटकांनंतर 186 धावाच जमा झाल्या होत्या.

250च्या पुढे धावसंख्या नेण्याकरता धोनी - हार्दिक पंड्याला भागीदारी करणे गरजेचे होते. दोघांनी चांगल्या गोलंदाजीला मान देत कष्टाने धावफलकाला आकार दिला. पंड्या 46 धावा करून कॉटरेलला बाद झाला. त्याच षटकात कॉटरेलने शमीला शून्यावर तंबूत परत पाठवले. धोनीने नाबाद 56 धावा केल्या पण त्याच नेहमीची तडफ नव्हती. सलग दुसर्‍या सामन्यात भारतीय फलंदाजांना मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले. विजयाकरता भारतीय गोलंदाजांना खास प्रयत्न करावे लागणार आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: World Cup 2019 India fails to build big score