World Cup 2019 : पाकचे फॅन्स म्हणतायत इंग्लंडला हरवाच!

सुनंदन लेले
Sunday, 30 June 2019

आज (रविवार) या सामन्याकडे इंग्लंड आणि भारताशिवाय पाकिस्तानचे पाठीराखे डोळे लावून बसलेले असतील. आपले आव्हान कायम राहावे यासाठी खुन्नस बाजूला ठेवून पाकिस्तानी प्रेक्षक भारतीय संघ जिंकावा म्हणून प्रार्थना करत आहेत.

वर्ल्ड कप 2019 : बर्मिंगहॅम : मैदानावरील प्रत्यक्ष आणि मैदानाबाहेरील अप्रत्यक्ष प्रतिस्पर्ध्यांच्या मोहिमेबाबत काहीही समीकरण असले तरी आज (रविवार) इंग्लंडला हरवून विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेतील अपराजित मालिका कायम राखण्याच्याच उद्देशाने टीम 'इंडिया' मैदानावर उतरेल. 

'भारत विरुद्ध इंग्लंड' सामना स्पर्धेत खूप महत्त्वाचा ठरणार, अशी चर्चा आधापीसून सुरू होती. मात्र, आता यास वेगळे वळण आले आहे. भारत जिंकला तर विजयी धडाका कायम राहील, तसेच पाकिस्तानचे आव्हानही कायम राहील. हेच जर भारत हरला, तर इंग्लंडला पुनरागमनाची संधी मिळेल आणि पाकचा मार्ग कठीण होईल. भारतीय खेळाडू आणि संघ व्यवस्थापन मात्र सर्वोत्तम खेळ करून विजय मिळविण्याशिवाय दुसरा कोणताही विचार करत नाहीत. 

बर्मिंगहॅम आणि जवळ असलेले लिस्टर गाव भारतीय वंशाच्या लोकांनी भरलेले आहे. बर्मिंगहॅमला पाकिस्तानी नागरिकही भरपूर असल्याचे चित्र पाकिस्तान आणि न्यूझीलंड सामन्यादरम्यान दिसले होते. आज (रविवार) या सामन्याकडे इंग्लंड आणि भारताशिवाय पाकिस्तानचे पाठीराखे डोळे लावून बसलेले असतील. आपले आव्हान कायम राहावे यासाठी खुन्नस बाजूला ठेवून पाकिस्तानी प्रेक्षक भारतीय संघ जिंकावा म्हणून प्रार्थना करत आहेत. 

इंग्लंडसाठी सामना जिंकणे जास्त गरजेचे आहे. पाकिस्तान आणि श्रीलंकेनंतर ऑस्ट्रेलियाकडून हरल्याने यजमान संघाच्या मोहिमेला मोठा धक्का लागला आहे. भारत विरुद्ध इंग्लंड एकदिवसीय सामना नेहमीच रंगतो. दोन्ही संघांतील फलंदाज चांगल्या लयीत असल्याने एजबस्टनच्या पोषक खेळपट्टीवर मोठी खेळी करून दाखवायची संधी फलंदाजांना साद घालत आहे. इंग्लंडचा सपोर्ट स्टाफ आक्रमक सलामीवीर जेसन रॉयला तंदुरुस्त करून मैदानात उतरवायला धडपड करत आहे. पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध इंग्लंडच्या फलंदाजांना आलेले अपयश टीकेचा विषय होता. 

भारतीय संघाकरिता 'डॉट बॉल्स'ची संख्या आणि चौथ्या क्रमांकाचा फलंदाज हे दोन मुद्दे चिंतेचे नसले तरी बारकाईने लक्ष देण्याचे विषय नक्कीच आहेत. सलग दोन सामन्यांत डॉट बॉल्सची संख्या खूप जास्त होती. निवड समितीच्या आग्रहाने विजय शंकरला चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करायची संधी विराट देत आहे. अजून एखादा सामना त्याला मिळेल आणि योग्य परिणाम साधला गेला नाही, तर दिनेश कार्तिक किंवा रिषभ पंतला संधी मिळेल असे वाटते. बाकी संघात बदल होण्याची शक्‍यता दिसत नाही. 

भारतीयांच्या स्वागताला अनुकूल हवामान 
एका आठवड्यात तीन सामने बघायचा घाट घालून भारतीय संघाचे पाठीराखे मायदेशातून तसेच ऑस्ट्रेलिया, युरोप आणि अमेरिकेतून इंग्लंडला दाखल झाले आहेत. भारत वि. पाक लढतीनंतर या सामन्याच्या तिकिटांना जास्त मागणी असल्याचे संयोजक आनंदाने सांगत आहेत. रविवारी हवामान आल्हाददायक असल्याचा अंदाज वर्तवला गेला आहे. म्हणजेच उत्तम क्रिकेटसाठी सगळ्या गोष्टी जमून येत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: World Cup 2019 Pakistan supporters says that defeat England today