World Cup 2019 : श्रीलंकेला विजय आवश्‍यकच; आव्हान संपलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आज लढत

वृत्तसंस्था
Friday, 28 June 2019

कर्णधार दिमुथ करुणारत्ने याने सुरवातीला आपल्या फलंदाजीने श्रीलंकेला सावरण्यास सुरवात केली. त्यानंतर अनुभवी वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाला लय गवसली आणि त्यांचे विजयाचे काम जणू सोपे झाले.

वर्ल्ड कप 2019 : चेस्टर ली स्ट्रीट : यजमान इंग्लंडविरुद्ध विजय मिळवून श्रीलंकेने विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत आपले आव्हान जिवंत ठेवले होते. आता हा जिवंतपणा कायम ठेवण्यासाठी त्यांना आज (शुक्रवार) दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विजय आवश्‍यक असेल. दुसरीकडे आव्हान संपुष्टात आलेला दक्षिण आफ्रिका संघ आता केवळ औपचारिकता नाही, तर प्रतिष्ठा जपण्यासाठी खेळेल. 

श्रीलंका संघाच्या सुरवातीच्या कामगिरीवरून त्यांची आगेकूच कुणीच गृहीत धरली नव्हती. मात्र, कर्णधार दिमुथ करुणारत्ने याने सुरवातीला आपल्या फलंदाजीने श्रीलंकेला सावरण्यास सुरवात केली. त्यानंतर अनुभवी वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाला लय गवसली आणि त्यांचे विजयाचे काम जणू सोपे झाले. आता आज दक्षिण आफ्रिकेविरुद्ध श्रीलंकेला विजय मिळवायचा असेल, तर त्यांना मलिंगाकडून पुन्हा एका भेदक कामगिरीची अपेक्षा असेल. तीच त्यांची ताकद राहील, असे म्हटल्यास चूक ठरणार नाही. 

मलिंगाकडून जशी अपेक्षा श्रीलंका संघाला असेल, तशीच अपेक्षा त्यांच्या गोलंदाजांना फलंदाजांकडून चांगले पाठबळ मिळण्याची असेल. श्रीलंकेची फलंदाजी यावेळेस सातत्य दाखवू शकलेली नाही. कर्णधार दिमुथ करुणारत्ने आणि कुशल परेरा या सलामीच्या जोडीनंतर जणू त्यांचा डाव संपायला लागतो, अशी त्यांच्या फलंदाजीची अवस्था आहे. एंजेलो मॅथ्यूज, लाहिरू थिरीमन्ने असे क्षमता असलेले फलंदाज त्यांच्याकडे असले तरी, त्यांना गुणवत्ता दाखवण्यात फारसे यश आलेले नाही. एकूणच श्रीलंकेला उद्या जिंकायचे असेल, तर त्यांच्या फलंदाजांनी धावांची जबाबदारी उचलण्याची आवश्‍यकता आहे. मलिंगा, नुआन प्रदीप, इसुरू उदाना हे गोलंदाज त्याचा फायदा उठविण्यास नक्कीच सज्ज असतील. 

दुसरीकडे या सामन्यातून दक्षिण आफ्रिकेसाठी विश्‍वकरंडक स्पर्धा म्हणून काही राहिलेले नाही. त्यांच्यासाठी राहिली आहे ती फक्त त्यांची प्रतिष्ठा. विश्‍वकरंडक स्पर्धेतून मायदेशात जाताना तोंड दाखवता यावे, यासाठी खेळाडू आपले सर्वस्व पणाला लावून खेळतील. त्यांचे गोलंदाज या स्पर्धेत चांगली कामगिरी करत असले, तरी त्यांच्या अपयशास फलंदाजीच कारणीभूत ठरली आहे. एकाही सामन्यात फलंदाजांना ठोस कामगिरी दाखवता आलेली नाही. त्यामुळे आता प्रतिष्ठा जपण्यासाठी दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंना आपल्या गुणवत्तेचे किमान प्रदर्शन दाखवावे लागेल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: World Cup 2019 Sri Lanka need victory today