World Cup 2019 : शमीला वगळल्याने रंगले ट्‌विटर युद्ध

वृत्तसंस्था
Tuesday, 9 July 2019

भारताचा प्रमुख गोलंदाज आणि विश्वकरंडकात हॅट्ट्रिक घेणाऱ्या महंमद शमीला न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात संघातून वगळण्यात आल्याने ट्विटरवर संघ निवडीवर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत.

नवी दिल्ली ः विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या लढतीत वेगवान गोलंदाज महंमद शमीला वगळल्याने सोशल मिडीयावरून भारतीय संघ व्यवस्थापनावर सडकून टिका करण्यात आली. माजी खेळाडू, समालोचकांसह चाहत्यांमध्ये या निर्णयावरुन ट्‌विटर युद्धच सुरू होते. 

शमी स्पर्धेत आतापर्यंत केवळ चार सामने खेळला असून, त्याने 14 गडी बाद केले आहेत. लेगस्पीन गोलंदाज युजवेंद्र चहलला संघात स्थान देताना त्यांनी कुलदीपला वगळले. मात्र, शमीला स्थान देण्यात आले नाही. शमीला श्रीलंकेविरुद्धच्या अखेरच्या साखळी लढतीसाठी देखील वगळण्यात आले होते. समालोचन करणाऱ्या सौरभ गांगुलीने कोहलीच्या या निर्णयावर प्रश्‍न उपस्थित केला. मात्र, त्याचा सहकारी आकाश चोप्रा याने चहलच्या निवडीचे आणि पाच गोलंदाज खेळविणे तसे जिकरीचे होते. पण, प्रथम गोलंदाजी करण्याची संधी मिळाल्यामुळे हा निर्णय योग्य वाटतो. यामुळे भारतीय फलंदाजीला खोली मिळेल, असे ट्‌विट केले. 

हर्षा भोगले यांनीही ट्‌विटरवरून शमीला वगळण्याबाबत आश्‍चर्य व्यक्त केले. "शमी विकेट घेत असताना त्याला वगळणे धक्कादायक होते. जडेजाच्या समावेशामुळे भारतीय फलंदाजीची खोली वाढली हे ठीक आहे. पण, न्यूझीलंडविरुद्ध यापूर्वी ज्याने चांगली कामगिरी केली, त्या कुलदीपला वगळण्याचे कारण कळत नाही.'असे भोगले यांनी म्हटले आहे. 
 

भारताने सर्वोत्तम गोलंदाजाऐवजी अष्टपैलू खेळाडूंना पसंती दिली अशी देखील टिका सोशल मिडीवरून करण्यात आली. विकेट घेणाऱ्या शमीला भुवीसाठी वगळणे न पटण्यासारखे आहे, असेही एकाने म्हटले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: World Cup 2019 Twitterati questions Mohammed Shami's exclusion from playing 11