आठ वर्षांनी पार्थिव पटेलचे भारतीय संघात पुनरागमन

वृत्तसंस्था
बुधवार, 23 नोव्हेंबर 2016

पार्थिव पटेल 31 वर्षांचा आहे. आतापर्यंत तो 20 कसोटी, 38 एकदिवसीय आणि दोन ट्‌वेंटी-20 सामने खेळला आहे. यापूर्वी ऑगस्ट 2008 मध्ये श्रीलंकेविरुद्धच्या कसोटीत पार्थिवने यष्टिरक्षण केले होते.

मोहाली: भारतीय कसोटी क्रिकेट संघाचा नियमित यष्टिरक्षक वृद्धिमान साहाला दुखापत झाल्याने इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यासाठी पार्थिव पटेल याची संघात निवड झाली आहे. विशेष म्हणजे, पार्थिव पटेल तब्बल आठ वर्षांपूर्वी शेवटची कसोटी खेळला होता.

विशाखापट्टणम येथे झालेल्या दुसऱ्या कसोटीमध्ये साहाच्या डाव्या पायाला दुखापत झाली होती. या दुखापतीचे स्वरूप पाहता त्याला तिसऱ्या कसोटीतून विश्रांती देण्याचा निर्णय संघ व्यवस्थापनाने घेतला आहे. त्यामुळे पार्थिवला पाचारण करण्याचा निर्णय झाला. तिसरी कसोटी 26 नोव्हेंबरपासून मोहाली येथे सुरू होणार आहे. इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या मालिकेत भारत 1-0 अशा आघाडीवर आहे. मालिकेतील पहिला सामना अनिर्णित राहिला होता.

पार्थिव पटेल 31 वर्षांचा आहे. आतापर्यंत तो 20 कसोटी, 38 एकदिवसीय आणि दोन ट्‌वेंटी-20 सामने खेळला आहे. यापूर्वी ऑगस्ट 2008 मध्ये श्रीलंकेविरुद्धच्या कसोटीत पार्थिवने यष्टिरक्षण केले होते. तसेच, 2012 मध्ये श्रीलंकेविरुद्धच तो शेवटचा एकदिवसीय सामना खेळला होता. महेंद्रसिंह धोनीने कसोटीतून निवृत्ती घेतल्यानंतर भारतीय संघाचा कसोटीतील नियमित यष्टिरक्षक म्हणून वृद्धिमान साहाची निवड झाली आहे.

Web Title: Wriddhiman Saha injured; Parthiv Patel to keep wickets against England in Mohali Test