युनूस खान दसहजारी मनसबदार 

वृत्तसंस्था
मंगळवार, 25 एप्रिल 2017

विंडीजविरुद्धच्या या मालिकेतील उर्वरित सर्व डावांत मी शतक केले. तरी या मालिकेनंतर मी निवृत्त होणार आहे. मी विचारपूर्वकच हा निर्णय घेतला आहे. यात कोणताही बदल होणार नाही. माझ्या विश्‍वासार्हतेबाबत कोणीही शंका घेऊ नये. 
- युनूस खान

किंगस्टन - युनूस खानने कसोटीत 10 हजार धावा पूर्ण करणाऱ्या दिग्गज फलंदाजांच्या पंक्तीत स्थान मिळवले. वेस्ट इंडीजविरुद्धच्या कसोटीत अर्धशतक करीत त्याने हा पराक्रम केला. 

युनूसने सहावा वेगवान फलंदाज म्हणून 10 हजार धावांचा टप्पा गाठलेल्या 13 जणांत स्थान मिळवले. त्याने 208 डावांत ही कामगिरी केली. युनूसच्या या कामगिरीची नोंद केवळ काही तुरळक प्रेक्षकांसमोर झाली. दीड वर्षापासून पाकतर्फे सर्वाधिक कसोटी धावा करणाऱ्या युनूसने 14 कसोटी सामन्यांत 47 ची सरासरी राखली आहे. ही पाक फलंदाजांची सर्वोत्तम धावसंख्या आहे. त्याने आपल्या या कामगिरीचे श्रेय कुटुंबाबरोबरच बॉब वूल्मर यांना दिले. 

माझ्या निवृत्तीने पाक संघाच्या कामगिरीवर काही परिणाम होईल, असे मला वाटत नाही. 2003 मध्ये मी संघात आलो, त्या वेळी अनेक दिग्गज निवृत्त झाले होते. तरीही संघाची कामगिरी होत राहिली, असे सांगतानाच त्याने 10-15 मिनिटे नियमितपणे व्यायाम केला तरी तंदुरुस्ती राखता येते, असेही सांगितले. 

दृष्टिक्षेपात 
- पाकिस्तान जिंकलेल्या कसोटीतील सरासरी 77.30. 
- अर्धशतकाचे शतकात रूपांतर करण्याची सरासरी 52 टक्के. 10 हजार धावा केलेल्यांत सर्वोत्तम. 
- चौथ्या डावात पाच शतके, तसेच सर्वोत्तम सरासरी 53.85. 
- दहा हजार धावा पूर्ण केलेला सर्वांत बुजुर्ग खेळाडू वय 39 वर्षे 145 दिवस. यापूर्वी शिवनारायण चंदरपॉल (37 वर्षे 254 दिवस). 
- सुनील गावसकर, ऍलन बोर्डर, स्टीव वॉ यांनीही हा टप्पा 37 वा वाढदिवस साजरा केल्यानंतरच गाठला. 
- युनूसची 34 शतके, 10 हजार धावांचा टप्पा गाठताना असलेल्या शतकात सर्वाधिक शतके रिकी पॉंटिंगची (35). 
- युनूसची 32 अर्धशतके. शतकांपेक्षा अर्धशतके कमी असलेला 10 हजार क्‍लबमधील एकमेव फलंदाज. 
- 2005 ते 2015 दरम्यान युनूसची सरासरी 60.41. किमान दोन हजार धावा केलेल्या फलंदाजांत संगकारापाठोपाठ (61.22). याच कालावधीत युनूसची 25 शतके व 20 अर्धशतके. 
- पदार्पणानंतर 10 हजार धावा पूर्ण करण्यास युनूसला 17 वर्षे 54 दिवस लागले. चंदरपॉलला सर्वाधिक 18 वर्षे 37 दिवस. 
- दहा हजार धावांत त्रिशतक असलेला तिसराच फलंदाज. यापूर्वी लारा व जयवर्धने. 
- युनूसची एकंदर 11 देशांत शतके. सर्वाधिक देशांत शतके करणारा फलंदाज. 
- युनूसने भारताविरुद्ध 17 डावांत 88.06 च्या सरासरीने 1321 धावा केल्या आहेत; त्यात पाच शतके व चार अर्धशतके. 
- युनूसचे कसोटीत 70 षटकार. लारास (69) मागे टाकले. 10 हजार कसोटी धावा असतानाच्या क्रमवारीत आघाडीवर. 

विंडीजविरुद्धच्या या मालिकेतील उर्वरित सर्व डावांत मी शतक केले. तरी या मालिकेनंतर मी निवृत्त होणार आहे. मी विचारपूर्वकच हा निर्णय घेतला आहे. यात कोणताही बदल होणार नाही. माझ्या विश्‍वासार्हतेबाबत कोणीही शंका घेऊ नये. 
- युनूस खान

Web Title: Younis Khan sets Pakistan record with 10000 Test runs