#MeToo मुळे लोकांना जबाबदारीची जाणीव : सिंधू

वृत्तसंस्था
रविवार, 20 जानेवारी 2019

विदेशात प्रवास करत असताना मला महिलांचा आदर आणि खासगीपणा जपला जात असल्याचे आढळून येते. भारतातही महिलांचा आदर करावा, असे सांगितले जात असले तरी याची अंमलबजावणी कमी प्रमाणात होते. भारतीय समाजात अनेक चांगले बदलही घडून येत आहेत. 

- पी. व्ही. सिंधू, बॅडमिंटनपटू 

हैदराबाद : "#MeToo' हिमेमुळे लोकांच्या मनोवृत्तीत मोठा बदल झाला असून, महिला आणि पुरुषांना त्यांच्या समाजाप्रती असलेल्या जबाबदारीची जाणीव झाली आहे,' असे मत भारताची बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिने व्यक्त केले आहे. 

हैदराबाद पोलिसांनी एका सामाजिक संस्थेच्या सहकार्याने "लैंगिक अत्याचारातून मुक्ती' असा कार्यक्रम सुरू केला असून, सिंधूच्या हस्ते याचे उद्‌घाटन करण्यात आले. "कामाच्या ठिकाणी महिलांवर होणारे लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी पोलिसांनी हे चांगले पाऊल उचलले आहे. लैंगिक अत्याचार हे दुसऱ्याला कमीपणा आणण्याचा, अवमान करण्याचा प्रकार आहे. दुसऱ्या व्यक्तीच्या नको असलेल्या वागणुकीतून एखाद्याला असुरक्षित वाटू शकते.

सध्या सुरू असलेल्या "#MeToo' हिमेमुळे महिलांवर होणाऱ्या अत्याचारांना वाचा फुटली आहे. या मोहिमेमुळे स्त्री-पुरुषांना त्यांच्या सामाजिक जबाबदारीची जाणीव झाली आहे,' असे मत सिंधूने या वेळी व्यक्त केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MeToo people realize responsibility says P V Sindhu