esakal | यंदा सर्व संघांना समान संधी - ॲमेडेऊ
sakal

बोलून बातमी शोधा

यंदा सर्व संघांना समान संधी - ॲमेडेऊ

यंदा सर्व संघांना समान संधी - ॲमेडेऊ

sakal_logo
By
पीटीआय

मुंबई - यंदाच्या १७ वर्षांखालील विश्‍वकरंडक स्पर्धेत विजेतेपदासाठी खुली स्पर्धा असून, बहुतेक सर्व संघांमध्ये विजेतेपद मिळविण्याची क्षमता असल्याचे मत ब्राझील संघाचे प्रशिक्षक कार्लोस ॲमेडेऊ यांनी व्यक्त केले आहे. 

फुटबॉलमधील ताकदवान देश आणि तीन वेळचे विजेते या पार्श्‍वभूमीवर फुटबॉल तज्ज्ञांची विजेतेपदासाठी ब्राझीलला पसंती मिळत आहे. मात्र, ब्राझीलचे प्रशिक्षक ॲमेडेऊ यांनी हे मत खोडून काढले. ते म्हणाले,‘‘मुळात या स्पर्धेत सर्व संघांना विजेतेपदाची समान संधी आहे. युरोपमधील सर्व संघ तुल्यबळ आहेत. दक्षिण अमेरिकन मेक्‍सिको, अमेरिका आणि दक्षिण आफ्रिकेचे देशही वयोगटाच्या स्पर्धेत आपला ठसा उमटवून आहेत. त्यामुळेच अनेक संघांमध्ये विजेतेपदाची क्षमता आहे.’’

नायजेर, स्पेन, उत्तर कोरियासह ब्राझीलचा ‘ड’ गटात समोवश आहे. ब्राझील उद्या अंधेरीत न्यूझीलंडशी सराव सामना खेळणार आहेत. या सामन्यात त्यांना त्यांचा स्टार खेळाडू व्हिनिसियस ज्युनि. शिवाय खेळावे लागणार आहे. प्रशिक्षक म्हणाले,‘‘व्हिनिसियस सध्या स्पॅनिश लीगमध्ये रेयाल माद्रिदकडून खेळत आहे. वयाच्या १५व्या वर्षांपासूनच त्याने फुटबॉल विश्‍वाचे लक्ष वेधून घेतले आहे. त्याला या स्पर्धेसाठी बोलावून घेण्यात आले असून, तो शनिवारी (ता. ३०) आम्हाला येऊन मिळणार आहे.’’

ब्राझील म्हटले की आक्रमकता आणि वेगवान चाली समोर येतात; पण हा संघ बचावात अधिक भक्कम असल्याचे ॲमेडेऊ यांचे मत आहे. ते म्हणाले,‘‘ब्राझीलची आक्रमकता नेहमीच डोळ्यांत भरत असते; पण या वेळी आमचा बचाव कमालीचा भक्कम आहे. गोलरक्षक आणि चार बचावपटूंच्या जोरावर आम्ही अवलंबून आहोत. आक्रमकता असणार यात शंकाच नाही; पण या वेळी ब्राझीलचा बचावही डोळ्यांत भरेल.’’

तब्बल तेरा वर्षांनी ब्राझीलकडे १७ वर्षांखालील विजेतेपद खेचून आणण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. आमची आक्रमकता नेहमीच दिसून येते; पण या वेळी आमचा बचाव डोळ्यांत भरेल.
- कार्लोस ॲमेडेऊ, ब्राझीलचे प्रशिक्षक

loading image