नशीबवान अर्जेंटिना बाद फेरीत 

Argentina goes in the next round
Argentina goes in the next round

सेंट पीटसबर्ग - प्रयत्नांची पराकाष्ठा केल्यानंतरही त्याला नशिबाची साथ हवीच या उक्तीचा प्रत्यय अर्जेंटिनाने विश्‍वकरंडक लढतीत घेतला. नायजेरियाचा कडवा प्रतिकार मोडण्यात वेळ निघून जात असताना मिळालेल्या नशिबाच्या साथीने त्यांना विजयाला गवसणी घालता आली. अर्जेंटिनाने नायजेरियाचा 2-1 असा प्रतिकार मोडत बाद फेरी गाठली. 

नायजेरिया आणि अर्जेंटिना दोघांसाठी ही लढत प्रतिष्ठेची होती. सामन्याचे पारडे कधीही समान दिसत नव्हते. कधी नायजेरियाकडे, तर कधी अर्जेंटिनाकेड ते झुकत होते. नशीब मात्र अर्जेंटिनाच्या बाजूने होते. अखेरच्या टप्प्यात नायजेरियाची पेनल्टीची मागणी पंचांनी "वार'ची मदत घेत फेटाळून लावली. लगोलग मोकळ्या गोलपोस्टसमोर गोल करण्याची संधी त्यांच्या आक्रमकाने दवडली. त्यांतर अर्जेंटिनाचे आक्रमण मोडताना गोलकक्षात एकत्र राहणाऱ्या नायजेरियाच्या बचावफळीच्या याच कडीतून रोजोने जाळीचा वेध घेत अर्जेंटिनाचा विजय सुकर केला. 

सामन्यानंतर मेस्सीची प्रतिक्रिया यापेक्षा वेगळी राहिली नाही. तो म्हणाला, ""दैव आमच्या बाजूने आहे हे माहित होते. तो आम्हाला असा विश्‍वकरंडकातून अर्ध्यावरून बाहेर काढणार नाही याची खात्री होती. इतका तणाव आणि दडपण कारकिर्दीत कधी अनुभवले नव्हते.'' 

महत्त्वाच्या सामन्यासाठी अर्जेंटिना प्रशिक्षक सॅम्पोली यांनी संघात पाच बदल केले. पण, त्यापैकी केवळ बनेगाच आपल्या निवडीला न्याय देऊ शकला. त्याच्याच खोलवर पासने मेस्सीला 14व्या मिनिटाला खाते उघडता आले. हा पास वगळता अर्जेंटिनाच्या खेळात नायजेरियाच्या तुलनेत कमालीचा विस्कळितपणा होतो. आकडेवारीत भलेही चेंडूवरील ताबा त्यांच्याकडे अधिक दिसत असला, तरी त्यांच्या खेळाडूंत समन्वय नव्हता. बहुतेक खेळाडू आपली जागा सोडून दुसऱ्याच जागेवर खेळत होते. त्यांचे पास आपल्या खेळाडूंऐवजी नायजेरियन खेळाडूंकडेच जात होते. 

विजयासाठी काही पण असाच खेळ दोन्ही संघांकडून झाला. त्यामुळेच सामन्यात फाऊल आणि यलो कार्डची संख्यादेखील अधिक होती. याच धसमुसळ्या खेळात पूर्वार्धात नायजेरिया दडपणाखाली राहिला. पण उत्तरार्धात अर्जेंटिनाच्या मॅश्‍चरॅनोची चूक त्यांच्या पथ्यावर पडली. बॅलागनला कुस्ती शैलीत रोखण्याचा मॅश्‍चरॅनोचा प्रयत्न नायजेरियाला पेनल्टी देऊन गेला. व्हिक्‍टर मोझेसने पेनल्टी साधत नायजेरियाला बरोबरी साधून दिली. त्यानंतर अर्जेंटिनाने नायजेरियाच्या गोलपोस्टमध्ये अनेक धडका मारल्या पण, अचूकतेच्या अभावाने त्या कुचकामीच ठरल्या. अखेरीस 86व्या मिनिटाला आलेला क्रॉस पास रोजोने जाळीत मारला आणि अर्जेंटिनासह जगभरातील चाहत्यांनी त्यांच्या विजयाचा जल्लोष केला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com