क्रोएशिया सहायक प्रशिक्षकाची हकालपट्टी

वृत्तसंस्था
बुधवार, 11 जुलै 2018

विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेत क्रोएशियाने रशियास पराजित केल्यानंतर क्रोएशियाच्या काही खेळाडूंनी ग्लोरी टू युक्रेन असे म्हटले असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन क्रोएशिया महासंघाने यासंदर्भात सहायक मार्गदर्शक ऑग्नेजेन वुकोजेविच यांची हकालपट्टी केली आहे. 

झॅग्रेब : विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेत क्रोएशियाने रशियास पराजित केल्यानंतर क्रोएशियाच्या काही खेळाडूंनी ग्लोरी टू युक्रेन असे म्हटले असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन क्रोएशिया महासंघाने यासंदर्भात सहायक मार्गदर्शक ऑग्नेजेन वुकोजेविच यांची हकालपट्टी केली आहे. 

वुकोजेविच आणि क्रोएशियाचा बचावपटू दॉमॅगाज विदा यांनी खेळाडू रशियास हरवल्यानंतर ग्लोरी टू युक्रेन म्हणत असल्याचा व्हिडिओ पोस्ट केला होता. अर्थात रशियात यावर टीका झाली आणि जागतिक फुटबॉल महासंघाच्या शिस्तपालन समितीने याबाबत ताकीद दिली होती. युक्रेन आणि रशियात चांगलाच तणाव आहे. रशियाने चार वर्षांपूर्वी युक्रेनच्या ताब्यातील भागावर ताबा घेतला होता. हे सर्व लक्षात घेऊन क्रोएशियाने प्रकरण चिघळण्यापूर्वीच कारवाई केली आहे. 
क्रोएशियाने वुकोजेविच यांची हकालपट्टी करतानाच रशियाची माफी मागत असल्याचेही म्हटले आहे. वुकोजेविक तसेच विदा यांनी याबाबत माफी मागितली आहे. हे दोघेही यापूर्वी युक्रेनमधील डायनामो किएव या क्‍लबकडून खेळले आहेत. त्यामुळेच आपण युक्रेनचा जयजयकार केला, असा त्यांचा दावा आहे. 

क्रोएशियाचे खेळाडूंवर निर्बंध 
क्रोएशियाने इंग्लंडविरुद्धच्या सामन्यापूर्वीच्या पत्रकार परिषदेत युक्रेनबाबतचे प्रश्‍न टाळले. या प्रकरणाबाबत खेळाडूंनी नव्हे तर महासंघानेच टिप्पणी करणे योग्य होईल. खेळाडू त्याबाबत काहीही बोलणार नाहीत, असे क्रोएशिया संघाच्या प्रवक्‍त्यांनी सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले होते. वुकोजेविक यांनी जागतिक महासंघाने पंधरा हजार स्वीस फ्रॅंक्‍सचा दंड केल्याचे क्रोएशियाकडून सांगण्यात आले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Croatia sacked assistant coach