नेमारविरुद्धच्या सर्वाधिक फाऊलने ब्राझील झाले लंगडे

वृत्तसंस्था
Tuesday, 19 June 2018

ब्राझीलविरुद्धचा गोल वादग्रस्त असेल, पण विजय त्यामुळे हुकला अशी हाकाटी करण्याऐवजी आपले काय चुकले, हे पाहणे जास्त योग्य होईल. नेमार खूप काही करू शकतो, त्याच्याविरुद्ध फाऊल झालेही; पण तो जरा जास्तच शोबाजी करीत होता. विश्‍वकरंडक स्पर्धेत संयमाचा कस लागतो, हे नेमारला सांगायला हवे. 
- टीम विकरी, ब्राझीलमधील फुटबॉल समीक्षक 

सोची -  ख्रिस्तियानो रोनाल्डो पोर्तुगालच्या स्पेनविरुद्धच्या बरोबरीचा स्टार झाल्यानंतर लिओनेल मेस्सी सलामीला अपयशी ठरला, आता हीच वेळ धसमुसळा खेळ करणाऱ्या स्वित्झर्लंडने नेमारवर आणली. स्वित्झर्लंडने नेमारविरुद्ध यशस्वीपणे फाउलची खेळी करीत ब्राझीलला विजयापासून रोखले. 

गतस्पर्धेत कोलंबियाविरुद्ध नेमार जखमी झाला होता आणि ब्राझीलचे जर्मनीने शिरकाण केले होते, त्या आठवणी पुसून काढण्याची काही प्रमाणात संधी नेमारला होती, पण तो संघासाठी प्रेरणादायक खेळ करू शकला नाही. स्पर्धेपूर्वी दोन सराव सामन्यात गोल करणारा नेमार फेब्रुवारीनंतरच्या पहिल्या स्पर्धात्मक लढतीत अपयशी ठरला. सराव सामन्यातील गोलमुळे त्याच्याकडून जरा जास्तच आशा बाळगल्या गेल्या. तो अपयशी ठरल्यावर संघही कोलमडला. 

नेमार आव्हानास पुरेसा तयार नव्हता असेच एकंदरीत म्हणावे लागत आहे. दोन किंवा तीन बचावपटूंना सहज गुंगारा देणारा, त्यांना वेगात चकवणारा आणि बचावपटूंना काही कळण्यापूर्वीच गोल करणारा ही नेमारची ओळख. कदाचित दुखापतीतून परतत असल्यामुळे नेमार सावध असावा. त्याच्याविरुद्ध स्वित्झर्लंड जास्तच आक्रमक होते. ब्राझीलविरुद्ध एकूण 19 फाऊल झाले. त्यातील 10 नेमारविरुद्ध होते. वेलरॉन बेहरामी हा 70 मिनिटे मैदानात होता. त्याने नेमारला चेंडूपासून जास्तीत जास्त दूर ठेवण्यात यश मिळवले. त्याचे 93 टक्के यशस्वी पास हेच दाखवतात. 

नेमारभोवती ब्राझीलचा संघ फिरतो हे सत्य आहे. तो संघास आगामी लढतीत किती प्रेरणा देणार हाच महत्त्वाचा प्रश्‍न आहे. ब्राझीलवासीयांनी यापूर्वीच जे क्‍लबसाठी करतो, ते देशासाठी करावे हीच आमची अपेक्षा असल्याचे ब्राझील प्रशिक्षकांनी सांगितले आहे. 

नेमारविरुद्ध विक्रमी फाऊल 
1998 च्या लढतीत इंग्लंडच्या ऍलन शिअररविरुद्ध ट्युनिशियाचे 11 फाऊल झाले होते, त्यानंतर विश्‍वकरंडकात एकाच खेळाडूविरुद्ध एवढे फाऊल होण्याची ही पहिलीच वेळ आहे. 

ब्राझीलविरुद्धचा गोल वादग्रस्त असेल, पण विजय त्यामुळे हुकला अशी हाकाटी करण्याऐवजी आपले काय चुकले, हे पाहणे जास्त योग्य होईल. नेमार खूप काही करू शकतो, त्याच्याविरुद्ध फाऊल झालेही; पण तो जरा जास्तच शोबाजी करीत होता. विश्‍वकरंडक स्पर्धेत संयमाचा कस लागतो, हे नेमारला सांगायला हवे. 
- टीम विकरी, ब्राझीलमधील फुटबॉल समीक्षक 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: due to faoul vs neymar Brazil Fail