मेस्सीपाठोपाठ रोनाल्डोही बाहेर; उरुग्वेकडून पोर्तुगालचा पराभव

वृत्तसंस्था
Sunday, 1 July 2018

मध्यंतराला एका गोलच्या पिछाडीवर राहिलेल्या पोर्तुगालला पेपे याने 55व्या मिनिटाला बरोबरी साधून दिली. ग्युर्रेरो याने दिलेल्या पासवर त्याने चपळाईने उडी घेत हेडींग केले. उरुग्वेविरुद्ध हा स्पर्धेतील पहिलाच गोल ठरला. गटसाखळीत उरुग्वेने एकही गोल पत्करला नव्हता. बरोबरी निर्माण झाल्यानंतरही उरुग्वेने पोर्तुगालला मोकळीक दिली नाही.

सोची : उरुग्वेने युरोपीय विजेत्या पोर्तुगालला 2-1 असे चकवित विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. एडिन्सन कवानी याने दोन गोल करीत विजयात सिंहाचा वाटा उचलला. 

मध्यंतराला एका गोलच्या पिछाडीवर राहिलेल्या पोर्तुगालला पेपे याने 55व्या मिनिटाला बरोबरी साधून दिली. ग्युर्रेरो याने दिलेल्या पासवर त्याने चपळाईने उडी घेत हेडींग केले. उरुग्वेविरुद्ध हा स्पर्धेतील पहिलाच गोल ठरला. गटसाखळीत उरुग्वेने एकही गोल पत्करला नव्हता. बरोबरी निर्माण झाल्यानंतरही उरुग्वेने पोर्तुगालला मोकळीक दिली नाही. त्याचवेळी चाली सुरु ठेवत पोर्तुगालची मध्य फळी विस्कळीत केली. यामुळे आणखी एक संधी निर्माण झाली. कवानी याने रॉड्रीगो बेंटॅन्करच्या पासवर उजव्या पायाने ताकदवान फटका मारत गोल केला. त्यानंतर पोर्तुगालला अपेक्षा असूनही निर्णायक प्रयत्न करता आले नाहीत. 

तत्पूर्वी, मध्यंतरास उरुग्वेकडे एका गोलची आघाडी होती. त्यांनी सनसनाटी प्रारंभ केला. सातव्या मिनिटाला लुईस सुआरेझने डावीकडून घोडदौड केली. त्याच सुमारास कवानीने उजवीकडून मुसंडी मारली. सुआरेझने दिलेल्या अचूक क्रॉस पासवर कवानी याने दमदार हेडिंग करीत चेंडू नेटमध्ये घालविला. या वेगवान चालीमुळे पोर्तुगालचा गोलरक्षक रुई पॅट्रीसिओ चकला, तर रोनाल्डो स्तब्ध झाला. सुआरेझने कवानी याला ऍसिस्ट केलेला हा 12वा गोल होता. नोव्हेंबर 2016 नंतर मात्र प्रथमच या जोडीचे संयुक्त प्रयत्न यशस्वी ठरले. 

पोर्तुगालने पहिल्या सत्रात सुरवात चांगली केली. चेंडूवर त्यांचे वर्चस्व जास्त होते, पण गोल करण्याच्या संधी त्यांना निर्माण करता आल्या नाहीत. हुकमी स्ट्रायकर रोनाल्डो याने मारलेला फटका थेट उरुग्वेचा गोलरक्षक फर्नांडो मुस्लेरा याच्याकडे गेला. पूर्वार्धात चेंडूवरील वर्चस्वाच्या टक्केवारीत पोर्तुगाल 60-40 असा पुढे होता. 

रशियावर 3-0 असा विजय मिळविलेल्या संघात उरुग्वेने एक बदल केला. बचाव फळीत सेबॅस्टियन कोटेस याच्याऐवजी ज्योस जिमेनेझ याला पाचारण करण्यात आले. पोर्तुगालने तब्बल तीन बदल केले. आंद्रे सिल्वा, रिकार्डो करीस्मा व सेड्रीक सॉरेज यांच्याऐवजी बर्नार्डो सिल्वा, गोन्कॅलो ग्युईडेस व रिकार्डो परेरा यांना संधी देण्यात आली. 

निकाल 
उरुग्वे 2 ः (एडिन्सन कवानी 7-62) 
विवि पोर्तुगाल ः 1 (पेपे 55) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Edinson Cavani scored doubled Uruguay beats Portugal in Football world cup