पराभवानंतर कोलंबियात कमालीची शांतता

वृत्तसंस्था
Thursday, 5 July 2018

विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आल्यामुळे कोलंबियात जीवघेणी शांतता होती. विश्‍वकरंडक लढतीनंतर कोलंबिया चाहत्यांच्या जल्लोषाने, तसेच कारच्या हॉर्नने दणाणून जाणारे रस्ते शांत होते. इंग्लंडविरुद्धचा पराभव त्यांना चांगलाच झोंबला होता. 
 

बोगोटा - विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आल्यामुळे कोलंबियात जीवघेणी शांतता होती. विश्‍वकरंडक लढतीनंतर कोलंबिया चाहत्यांच्या जल्लोषाने, तसेच कारच्या हॉर्नने दणाणून जाणारे रस्ते शांत होते. इंग्लंडविरुद्धचा पराभव त्यांना चांगलाच झोंबला होता. 

येरी मीना याने भरपाई वेळेत कोलंबियास हेडरवर बरोबरी साधून दिल्यावर कोलंबियात उत्साहाचे वातावरण होते. पेनल्टी शूटआउटमधील इंग्लंडचा खराब इतिहास कोलंबियाचा उत्साह वाढवत होता. प्रत्यक्षात कोलंबियाच शूटआउटमध्ये निष्प्रभ ठरले. चाहते त्याचबरोबर संघाच्या धसमुसळ्या खेळावरही नाराज होते. इंग्लंडचा आक्रमक कार्लोस सॅंचेझ याला अवैधरीत्या रोखल्यामुळेच इंग्लंडला निर्धारित वेळेत पेनल्टी किक लाभली होती. 

इंग्लंड-कोलंबिया लढत सुरू झाली, त्या वेळी देशात उत्साहाचे वातावरण होते. देशातील प्रमुख शहरांतील जायंट स्क्रीनवरील प्रक्षेपणाचा आनंद घेण्यासाठी सर्व देश सर्व भेद विसरून एकत्र आला होता. ऑफिसमधून लढतीसाठी सूट न मिळालेले अनेक जण बॉसची नजर चुकवून खिडकीतून लढत बघत होते. लढत चांगली झाली, जिंकलो असतो, तर जास्त आनंद झाला असता, असे बूट पॉलिश करणाऱ्या मॉरिसिओ सॅंचेझ याने सांगितले. त्याच्यासह अनेकांनी संघाचा निर्धारित वेळेतील एकमेव गोल करणाऱ्या मीनाला सोन्याच्या खाणीची उपमा दिली. पण, त्याच वेळी अनेकांनी पेनल्टी किक दवडलेल्या खेळाडूंवर टीका करणे टाळले. 

जर... तरला आता काय अर्थ 
पेनल्टीवर लढत गेल्यावर काहीच सांगता येत नाही. तिथे खेळाचे कौशल्य कुठे पणास लागते. या योग मार्गदर्शक लिंकॉन यांच्या मताशी अनेक जण सहमत होते. जेम्स रॉड्रिगुएझ असता, तर वेगळे चित्र दिसले असते, याची प्रत्येकास खात्री होती, पण जर तरला आता काय अर्थ आहे; असेच सांगत प्रत्येक जण आपले समाधान करून घेत होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Extreme calm in Colombia after the defeat of football match