माली संघ 17 नव्हे; तर 23 वर्षांखालील

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 19 October 2017

हरल्यावरच खेळाडू कसे मोठे झाले
इराक संघाने सामन्याच्या आदल्या दिवशी माली संघास सराव करताना बघितले होते. त्यानंतर त्यांची पत्रकार परिषद झाली होती. त्या वेळी त्यांना या संघातील खेळाडू वयाने मोठे वाटले नाहीत. पराभवानंतरच 17 वर्षांखालील खेळाडू 23 वर्षांखालील कसे झाले. या स्पर्धेपूर्वी जागतिक महासंघाने खेळाडूंच्या वयाची कसून तपासणी केली आणि स्पर्धेदरम्यानही होत आहे, असे जागतिक फुटबॉल महासंघाच्या एका पदाधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितल्याचे वृत्त आहे.

नवी मुंबई : विश्वकरंडक 17 वर्षांखालील फुटबॉल स्पर्धेत वयचोरी होऊ नये, यासाठी जागतिक फुटबॉल महासंघाने प्रत्येक संघातील दोन खेळाडूंची सामन्यानंतर वयाची तपासणी करण्याचे ठरवले आहे; पण वयचोरीच्या आरोपापासून ही स्पर्धा दूर राहण्यास तयार नाही. माली संघातील खेळाडू 17 नव्हे; तर तेवीस वर्षांखालील वाटतात, असे इराकच्या मार्गदर्शकांनी सांगत नवा वाद निर्माण केला.

विश्वकरंडकाच्या गोव्यातील उपउपांत्यपूर्व लढतीत मालीने इराकचा 5-1 असा धुव्वा उडवला होता. त्यानंतरच्या पत्रकार परिषदेत क्वाहतान चितेर यांनी माली संघातील खेळाडूंचे वय जास्त असल्याचे सूचित केले. ते म्हणाले, मालीचे खेळाडू खूपच चांगले आहेत. खेळाडूंच्या शारीरिक क्षमतेचा कस लागतो, त्या वेळी काही वेळा अन्याय होतो असेच वाटते. आफ्रिकन आणि अन्य संघांत खूपच फरक आहे. त्यांचा संघ 17 नव्हे; तर तेवीस वर्षांखालीलच वाटतो. त्यांचा खेळ पाहून ते सहज लक्षात येते. त्यांची चेंडू मारण्याची ताकद हेच तर दाखवते. ते पाहिल्यास त्यांची 17 वर्षांखालील संघाबरोबर स्पर्धा कशी होणार, अशी विचारणा त्यांनी केली.

माली संघातील खेळाडूंच्या वयाबद्दल थेट आक्षेप घेतलेल्या इराकच्या मार्गदर्शकांनी याबाबत तक्रार करणार का? असे विचारल्यावर वेगळीच सारवासारव केली. फुटबॉल म्हणजे फेअरप्ले आहे, असे सांगत आम्ही कोणत्याही संघाविरुद्ध कोणतीही तक्रार करणार नसल्याचे सांगत विषय झटपट संपुष्टात आणला.

माली मार्गदर्शक योनास कोरमला यांनी त्यास उत्तर दिले नसते, तरच नवल होते. वयोगटाची स्पर्धा असते, त्या वेळी काही नियम असतात. खेळाडूंच्या वयाची चाचणी जागतिक महासंघ करत असतो. फुटबॉल या खेळातील नियम, त्यातील खेळभावना आपण समजून घ्यायला हव्यात. पराभवही स्वीकारण्याची तयारी हवी, असे त्यांनी सांगितले.

हरल्यावरच खेळाडू कसे मोठे झाले
इराक संघाने सामन्याच्या आदल्या दिवशी माली संघास सराव करताना बघितले होते. त्यानंतर त्यांची पत्रकार परिषद झाली होती. त्या वेळी त्यांना या संघातील खेळाडू वयाने मोठे वाटले नाहीत. पराभवानंतरच 17 वर्षांखालील खेळाडू 23 वर्षांखालील कसे झाले. या स्पर्धेपूर्वी जागतिक महासंघाने खेळाडूंच्या वयाची कसून तपासणी केली आणि स्पर्धेदरम्यानही होत आहे, असे जागतिक फुटबॉल महासंघाच्या एका पदाधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितल्याचे वृत्त आहे.
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: FIFA U-17 World Cup 2017: With Iraq's debris in their wake, prolific Mali march ahead