esakal | नेमारचे फुटबॉल कौशल्य तसेच नाटकही प्रभावी
sakal

बोलून बातमी शोधा

football world cup 2018 Neymars drama

नेमारच्या प्रभावी कामगिरीच्या जोरावर विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेत ब्राझीलने उपांत्यपूर्व फेरी गाठली खरी, पण या लढतीने नेमार हा जास्त नाटके करतो, या टीकेची धारही तीव्र झाली. 

नेमारचे फुटबॉल कौशल्य तसेच नाटकही प्रभावी

sakal_logo
By
वृत्तसंस्था

मॉस्को - नेमारच्या प्रभावी कामगिरीच्या जोरावर विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेत ब्राझीलने उपांत्यपूर्व फेरी गाठली खरी, पण या लढतीने नेमार हा जास्त नाटके करतो, या टीकेची धारही तीव्र झाली. 

ब्राझीलने मेक्‍सिकोला 2-0 हरवले. या दोन्ही गोलांत नेमारचा मोलाचा वाटा होता. त्याच्या चेंडूवरील अप्रतिम हुकमतीने फुटबॉलप्रेमींची मने जिंकली. त्याने उत्तरार्धाच्या सुरुवातीस मेक्‍सिको बचावफळीस चकवताना दाखवलेले पदलालित्य जबरदस्त होते. त्या वेळी त्याने दिलेला बॅकपास त्यानंतर स्वीकारलेला पास एक स्टार काय करू शकतो, हे दाखवणारेच होते. त्याचबरोबर अखेरच्या मिनिटात गोलरक्षकास गोंधळात टाकत दिलेला पासही नवोदितांना शिकवणारा होता. नेमारने गोलच्या संधी निर्माण केल्या, हे आकडेवारीही अधोरेखित करते; मात्र त्याची नाटके त्याची महानता कमी करीत आहे. 

लढतीतील 72 व्या मिनिटास जे काही घडले ते नेमारच्या चाहत्यांना नक्कीच आवडणार नाही. नेमारविरुद्ध फाऊल झाला त्या वेळी तो मैदानावर पडला होता आणि चेंडू त्याच्या दोन पायांत होता. त्या वेळी मेक्‍सिकोचा खेळाडू चेंडूवर ताबा घेण्यासाठी आला आणि त्याचा पाय नेमारच्या घोट्यावर लागला. नेमारने कळवळण्यास सुरुवात केली. आपली दुखापत खूपच गंभीर असल्याचे तो दाखवत होता. खरे तर त्या वेळी मेक्‍सिको खेळाडूच्या पायाचा केवळ स्पर्श झाल्याचे अनेकांना दिसले होते. 

जणू काही मगरीनेच आपला चावा घेतला आहे, आपला पाय गमावला आहे, अशा प्रकारे नेमार ओरडत आहे. अशी टिप्पणी बीबीसीचे समालोचक कॉरन मॅकनमारा यांनी केली. अर्थात, प्रतिस्पर्धी त्यालाच जास्त लक्ष्य करीत आहेत. त्याच्याविरुद्ध सर्वाधिक 23 फाउल्स झाले आहेत; मात्र त्याचे पडणे, उगाचच झेपावणे, याची आता चेष्टा होत आहे. 

मॅंचेस्टर युनायटेडचे माजी खेळाडू एरिक कॅंटोना यांनी तर एका चाकावर ठेवलेल्या सामानाची नेमारला उपमा दिली आहे. त्याला स्पर्श जरी केला, तरी ते सतत काही तास फिरत राहते, असेही म्हटले आहे. मेक्‍सिकन मार्गदर्शकांनी नेमारचे नाव घेतले नाही, पण काही जण खोटे फाउल दाखवत असल्याची खोचक टिप्पणी केली.