चर्चिल ब्रदर्सच्या पुनरागमनाची उत्सुकता

चर्चिल ब्रदर्सच्या पुनरागमनाची उत्सुकता

पणजी - दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने गोव्याच्या चर्चिल ब्रदर्सला महिनाभरापूर्वी आय-लीग फुटबॉल स्पर्धेत फेरप्रवेश दिला. त्यानंतर माजी विजेत्यांना आय-लीगच्या तयारीसाठी खूपच कमी वेळ मिळाला. साहजिकच त्यांच्या पुनरागमानाच्या कामगिरीबद्दल उत्सुकता आहे.

एएफसीच्या व्यावसायिक क्‍लब परवाना निकषांची पूर्तता न केल्याचे कारण देत महासंघाने 2014 मध्ये चर्चिल ब्रदर्सला आय-लीगमधून बाहेर काढले होते. त्यामुळे गोव्याच्या या संघाला 2014-15 व 2015-16 असे दोन मोसम आय-लीगमध्ये खेळता आले नव्हते. न्यायालयीन लढाईनंतर आता दक्षिण गोव्यातील या संघाला आठ डिसेंबरला आय-लीगमध्ये फेरप्रवेश मिळाला. धेंपो स्पोर्टस क्‍लब, साळगावकर एफसी व स्पोर्टिंग क्‍लब द गोवा या माघारीनंतर चर्चिल ब्रदर्स हा यंदाच्या आय-लीगमधील एकमेव गोमंतकीय संघ आहे.

चर्चिल ब्रदर्सचा यंदाच्या आय-लीगमधील पहिला सामना रविवारी (ता. 8) कोलकत्यात माजी विजेत्या मोहन बागानविरुद्ध होईल. त्या लढतीत चर्चिल ब्रदर्सला भरपूर मेहनत करावी लागेल हे स्पष्ट आहे. गोवा प्रो-लीग फुटबॉल स्पर्धा 31 डिसेंबरला संपली. अकरा संघाच्या या स्पर्धेत चर्चिल ब्रदर्सला आठवा क्रमांक मिळाला होता. त्या स्पर्धेत या संघात परदेशी खेळाडू नव्हते, तसेच नवोदित खेळाडूंचा भरणा होता. आय-लीगसाठी चर्चिल ब्रदर्सने खेळाडूंसाठी नव्याने जमवाजमव केली आहे. त्यांचा सूर कितपत जुळलाय हे पाहावे लागेल. प्रो-लीग स्पर्धेत हा संघ आल्फ्रेड फर्नांडिस यांच्या मार्गदर्शनाखाली खेळला होता, आय-लीग स्पर्धेत नायजेरियन जोसेफ अफुसी प्रशिक्षकपद सांभाळण्याचे संकेत आहेत, पण अजून त्यांनी संघाची सूत्रे हाती घेतलेली नाहीत.

सध्याचे एकंदरीत चित्र पाहता, आय-लीग स्पर्धेत दोन वेळा विजेतेपद मिळविलेल्या चर्चिल ब्रदर्सची यंदाची वाटचाल खडतर आहे. त्रिनिदाद-टोबॅगोचा अँथनी वूल्फचा अपवाद वगळता इतर परदेशी खेळाडूंना त्यांनी अजून करारबद्ध केलेले नाही. गोव्यातील ब्रेंडन फर्नांडिस, कीनन आल्मेदा, डेन्झिल फ्रान्को या अनुभवी खेळाडूंना त्यांनी करारबद्ध केलेले आहे. ""गोव्यातील बहुतेक खेळाडू 31 डिसेंबरपर्यंत संबंधित क्‍लबतर्फे प्रो-लीग फुटबॉल स्पर्धेत खेळत होते. त्यामुळे संघातील नवे खेळाडू तंदुरुस्त आणि स्पर्धात्मक सरावप्राप्त आहेत. आमच्या संघातून ते एकत्रितपणे कसे खेळतात यावर कामगिरी अवलंबून असेल,'' असे चर्चिल ब्रदर्सचे प्रशिक्षक आल्फ्रेड फर्नांडिस यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com