esakal | भारतीय कुमारांची ऐतिहासिक कामगिरी
sakal

बोलून बातमी शोधा

भारतीय कुमारांची ऐतिहासिक कामगिरी

भारतीय कुमारांची ऐतिहासिक कामगिरी

sakal_logo
By
वृत्तसंस्था

मुंबई/व्हॅलेन्सिया - भारताच्या नवोदित फुटबॉलपटूंना प्रेरणा देणारा विजय मिळविताना युवा संघाने अर्जेंटिनास पराजित केले. विश्‍वकरंडक खेळण्याचा अनुभव असलेल्या मार्गदर्शकांच्या अर्जेंटिनाला हरवल्याने भारतीय फुटबॉलची नक्कीच जागतिक स्तरावर दखल घेतली जाईल.

भारताने स्पेनमधील कॉर्टिफ स्पर्धेत अर्जेंटिनाला २-१ असे हरवले. दीपक तांगरी (चौथ्या मिनिटास) आणि अन्वर अली (६८) यांनी गोल करीत भारताच्या विजयात मोलाची कामगिरी बजावली. भारताचा स्पर्धेतील हा पहिलाच विजय आहे. 

‘‘या विजयाने भारतीय फुटबॉलकडे नक्कीच आदराने पाहिले जाईल. त्यामुळे भारतीय फुटबॉलला आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगला अनुभवही लाभू शकेल. या यशामुळे आपण जगातील सर्वोत्तम संघांना लढत देऊ शकतो, हा विश्वास नक्कीच आला आहे,’’ असे भारतीय मार्गदर्शक फ्लॉईड पिंटो यांनी सांगितले. 

दीपकने चौथ्या मिनिटास खाते उघडल्यावर भारतीय जास्त आक्रमक झाले. दोनदा अनिकेत जाधवला अचूक पास सोपवण्यात आले; पण तो ऑफसाइड ठरला. उत्तरार्धाच्या सुरवातीस अनिकेतला फाऊल केल्याने बाहेर काढण्यात आले. त्यामुळे भारतावर दहा खेळाडूंनिशी खेळण्याची वेळ आली. प्रभसुखन गिलने पाच मिनिटांच्या अंतराने अर्जेंटिनाचे दोन प्रयत्न रोखत भारतीय खेळाडूंचा आत्मविश्‍वास उंचावला. काही वेळातच अन्वर अलीने फ्री किकवर भारताची आघाडी वाढवली. सामन्याच्या अंतिम टप्प्यात अर्जेंटिनाची आक्रमणे वाढली; पण त्यांना एकच गोल करता आला. 

या स्पर्धेत आम्हाला यापूर्वीच्या लढतीत गोलच करता आले नव्हते. अर्जेंटिनाविरुद्ध हे साधले. प्रखर जिद्द काय करू शकते हे दीपकच्या गोलने दिसले, तर अन्वर अलीने भारतीय किती अचूक हल्ला करू शकतात हे दाखवले, असेही भारतीय मार्गदर्शकांनी सांगितले. 

कामगिरी सुखावणारी, पण...
भारताविरुद्धच्या लढतीपूर्वी गटविजेतेपद निश्‍चित असल्याने अर्जेंटिनाचा दुय्यम संघ
अर्जेंटिना गटात अव्वल, तर भारत गटात तळाला.
भारतीय संघ या स्पर्धेत यापूर्वी मुर्सिया, तसेच मॉरितानाविरुद्ध ०-२ पराजित झाला होता.
भारतीयांची यापूर्वी व्हेनेझुएलाविरुद्ध गोलशून्य बरोबरी.