'सॅफ' फुटबॉलचे आयोजन धोक्‍यात 

बुधवार, 17 मे 2017

भारत या स्पर्धेत गतविजेता आहे. मात्र, 'आयएसएल'मुळे अनेक खेळाडूंच्या उपलब्धतेचा प्रश्‍न निर्माण होऊ शकतो, असे भारतीय फुटबॉल महासंघाने म्हटले आहे. यावर्षी भारतात 17 वर्षांखालील विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धा होणार असल्यामुळे 'आयएसएल' पुढे ढकलावी लागली आहे.

नवी दिल्ली : 'आयएसएल' स्पर्धेमुळे भारतीय फुटबॉल संघटनेने 'सॅफ' फुटबॉल स्पर्धा रद्द करण्याची विनंती केल्यामुळे या स्पर्धेचे आयोजन धोक्‍यात आले आहे. 

बांगलादेश, भूतान, भारत, मालदिव, नेपाळ, पाकिस्तान आणि श्रीलंका या देशांचा सहभाग असलेली स्पर्धा या वर्षी 25 डिसेंबरपासून बांगलादेशात होणार आहे. याच दरम्यान 'आयएसएल' स्पर्धा असल्यामुळे भारतीय फुटबॉल महासंघाने ही स्पर्धा मे महिन्यापर्यंत पुढे ढकलण्याची विनंती केली आहे. 

भारत या स्पर्धेत गतविजेता आहे. मात्र, 'आयएसएल'मुळे अनेक खेळाडूंच्या उपलब्धतेचा प्रश्‍न निर्माण होऊ शकतो, असे भारतीय फुटबॉल महासंघाने म्हटले आहे. यावर्षी भारतात 17 वर्षांखालील विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धा होणार असल्यामुळे 'आयएसएल' पुढे ढकलावी लागली आहे. या वर्षी 'आयएसएल'मधील संघदेखील वाढणार असल्यामुळे कार्यक्रम एप्रिलपर्यंत लांबणार आहे. त्यामुळे 'सॅफ' स्पर्धा मे महिन्यात घ्यावी, अशी विनंती भारतीय फुटबॉल महासंघाने केली आहे. 

'सॅफ'ने अजून भारतीय संघाच्या विनंतीला उत्तर दिलेले नाही. पण, ते आमच्या विनंतीचा आदर करतील, असे महासंघाचे उपाध्यक्ष सुब्रत दत्ता यांनी सांगितले. ते म्हणाले, ''भारतात 17 वर्षांखालील विश्‍वकरंडक स्पर्धा होणार असल्यामुळे आमच्यासाठी हे वर्ष खास आहे. आम्ही मे महिन्यापर्यंत स्पर्धा पुढे ढकलण्याची केलेली विनंती 'सॅफ' स्वीकारेल असा विश्‍वास वाटतो.'' 

'सॅफ' स्पर्धा पुढे ढकलण्यास प्रायोजकांनी मान्यता द्यायली हवी, असे 'सॅफ'चे म्हणणे आहे. यासाठी त्यांनी 'सुझुकी'बरोबर चर्चा करण्यास सुरवात केली आहे. भारत गतविजेते आहेत आणि ते खेळणार नसतील तर, प्रायोजक पुढे येण्यास तयार नाहीत. सर्व संघांचा सहभाग असेल तरच ते प्रायोजक होण्यास तयार असल्याचे 'सॅफ'चे म्हणणे आहे. भारताने माघार घेतल्यास स्पर्धा सात संघांत होईल. आठ संघांतच खेळवायचा निर्णय झाल्यास एका नव्या संघाला आमंत्रित करावे लागेल, असेदेखील 'सॅफ'च्या वतीने स्पष्ट करण्यात आले.